ताज्या घडामोडी

एप्रिल महिन्याचा लेखाजोखा…!!!

एप्रिल महिन्याचा लेखाजोखा…!!!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

मुंबई दिनांक 15/05/2024 :

कुणीतरी म्हटलंय, आयुष्य हे एक रंगमंचावरचं नाटक आहे…
पण मला वाटतं, आयुष्य हा एक खेळ आहे. या खेळात हरणं – जिंकणं, आनंद – दुःख, आशा – निराशा, मोह – स्वार्थ – त्याग – तिरस्कार, जिद्द, उपेक्षा, तगमग, तळमळ… पुस्तकात लिहिलेल्या या सर्व भावना प्रत्येक खेळात प्रत्यक्ष अनुभवाला येतात. आयुष्य यापेक्षा काय वेगळं आहे ?
खेळामध्ये मात्र एक नियम असतो, आपल्या टीम मधल्या / कुटुंबातल्या सदस्याला आपण त्रास द्यायचा नाही, हरवायचं नाही, हरू द्यायचं नाही… मग हा खेळ क्रिकेट असो की कबड्डी…!!
दुर्दैवाने आयुष्याच्या खेळात मात्र हा नियम पाळला जात नाही…!
अनेकदा आपलेच लोक, आपल्याच माणसांचे पाय ओढून, त्याला रिंगणा बाहेर फेकून देतात, कायमचं आऊट करतात… !
ज्या लोकांना असं रिंगणाबाहेर टाकलं जातं, त्या लोकांच्या काही चुका असतीलही, मान्य … पण ज्या पानावर चूक आहे, फक्त ते पान फाडायचं ? की आख्ख पुस्तकच फाडायचं….???
चुका होणं हि प्रकृती…. चूक मान्य करणं हि संस्कृती…. आणि चुका सुधारणं हि प्रगती…!
पण एखाद्या चुकीसाठी एखाद्याला कायमचं आउट करणं ही मात्र विकृती…!!!
एकदा हि माणसं आयुष्यातून आउट झाली… बाद झाली की लवकर सावरत नाहीत….
बरोबर आहे, पाडणारे आपलेच असतील, तर सावरायला वेळ लागतोच..!!!
असो…
उन्हाळा खूप वाढलाय असं सारखं कानावर येतं…
घरात पंख्याखाली सुद्धा अंगाची लाही लाही होते… मी तर उन्हात डांबरी रस्त्यावर एखाद्या गटार /उकिरड्याशेजारी किंवा इतर मिळेल त्या जागी बसलेलो असतो. (मला लोक त्यांच्या घरासमोर किंवा दुकानासमोर किंवा इतर चांगल्या जागी बसु देत नाहीत, त्यांच्या मते हे घाणेरडे लोक आमच्या नजरेसमोर नकोत)
तर…. रस्त्यावर बसल्यावर, खालून चटके आणि वरूनही चटके…!!!
रस्त्यावर भर उन्हात दिवसभर शे दिडशे किलोच्या बॅगा सांभाळत असतानाही, उन्हाळ्याचा त्रास मला मात्र जाणवत नाही….
रणरणत्या उन्हात, मी बसलेलो असताना, दोन तीन भिक्षेकरी माझ्यामागे नुसतेच उभे असतात…. मागे उभे का रे ? असे पुढे या… असं मी दटावलं तरी माझं ते ऐकत नाहीत…. दोन तासाने माझं काम संपतं …मी बॅग आवरायला घेतो आणि मग ते पुढे येतात… ते पुढे आल्या आल्या मला उन्हाची तीव्रता जाणवू लागते… मी पुन्हा दटावून विचारतो … असे वेड्यासारखे माझ्या मागे मागे काय घुटमळत होता रे ? त्यातला एक जण मग चाचरत म्हणतो, ‘डाक्टर तूमाला उन्हाचा लय चटका बसत हुता… आमी म्हागं हुबं राहून तुमच्यावर सावली धरली हुती ओ…!!!
दोन तास स्वतः उन्हात उभे राहून यांनी माझ्यावर सावली धरली होती…. भर उन्हातही मग डोळ्यामधून पूर येतो..!
स्वतः चटका सहन करून दुसऱ्यावर सावली धरणारा फक्त एक बापच असू शकतो…
हि प्रेमळ माणसं, बाप होऊन, माझ्या वाटेवरची झाडं होतात… डोक्यावर सावली धरतात… मग माझ्यासारख्या वाटसरूला ऊन कसं लागेल ?
मला उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…?
भर उन्हाळ्यात रस्त्यावर मी बसतो तेव्हा माझ्या आज्ज्या, आया, मावश्या माझ्या डोक्यावर पदर धरतात, कुणीतरी उकिरड्यातला एखादा पुठ्ठा घेऊन येतं आणि बाजूला बसून वारा घालतं… मध्येच कुणीतरी पदरानं घाम पुसतं…. तर मध्येच कोणीतरी थंडगार पाण्याची बाटली आणून देतं…. भिकेतून मिळालेल्या पैशातून कोणी ताक विकत आणतं….तर कुणी लस्सी…. तर कुणी उसाचा रस….
प्रेमाच्या आणि मायेच्या इतक्या शितल वातावरणात मी बसलेला असतो, की मला उन्हाळा जाणवतच नाही…
उन्हाची प्रत्येक लाट, माझ्यासाठी थंडगार वाऱ्याची झुळूक बनून येते… मला मग उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…?
मी आहे साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, पण त्यांच्यात गेलो की ते मला एखाद्या देशाचा राजा असल्याचा फील देतात…
काही तासातच ते मला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवतात… रोज – रोज आणि रोजच…!
दुसऱ्याला श्रीमंत बनवणाऱ्या, आयुष्याच्या खेळात कायमस्वरूपी आऊट झालेल्या आणि रिंगणा बाहेर बसलेल्या या व्यक्तींच्या जखमांवर तुम्हा सर्वांच्याच सहकार्याने फुंकर घालत आहे आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपणास सविनय सादर !
*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा
आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*
*भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी
1. दारुड्या नवरा – मतिमंद मूल आणि अपंग आई… कंटाळून तीने शेवटी घर सोडलं; म्हणण्यापेक्षा नवऱ्यानेच तीला घराबाहेर हाकलून दिलं…!
पुण्यात आली… या तीनही पिढ्या, सातारा रोड येथील एका मंदिराबाहेर भिक मागू लागल्या…
ताई खमकी आहे पण त्यापेक्षा सुद्धा जास्त संवेदनशील…
मला भेटली आणि आपोआप भाऊ बहिणीचं नातं प्रस्थापित झालं…
तिला यानंतर नात्याचा उपयोग करून काही बाही विकण्याचा व्यवसाय रस्त्यावर टाकून दिला…. ती तो प्रामाणिकपणे करत होती… !
तिची आई पूर्णतः बहिरी आहे… ताईचा बारा वर्षांचा मुलगा मतिमंद…. दरवेळी मी मुलाला चॉकलेट घेऊन जातो…
तिच्या आईला म्हणजेच आजीला मी खूप चिडवतो…. “ए बहीरे म्हातारे” म्हटल्यावर तिला खूप राग येतो (बरोबर हे तीला कसं ऐकू जातं हे मला अजून कळलं नाही)
हि आजी मला दाद्या म्हणते… तीच्या मुलीचा ती मला मोठा भाऊ समजत असावी कदाचित… ! बऱ्याच वेळा हक्कानं शिव्याही देते…
तर, हिच बहिरी आजी तासनतास माझ्या डोक्यावर छत्री घेऊन उभी असते….
मी तीला प्रेमाने म्हणतो, ‘म्हातारे बस की आता थकली असशील…’
तीला मात्र, ‘बहिरे, मर की आता थकली असशील…’ का कोण जाणे पण, असं ऐकू येतं… मी का मरू ? असं म्हणत, यानंतर ती छत्री घेऊन मला मारण्यासाठी माझ्या पाठी लागते… !
अशा सगळ्या गंमती जमती… जे ऐकायला यायला हवं तेच ऐकायला येत नाही….
तर हि ताई आता याच मोठ्या मंदिराच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागली आहे.
अत्यंत ओंगळवाण्या, दीनवाण्या अवतारात हिला पाहिली होती… आता जेव्हा हिला रुबाबदार युनिफॉर्म मध्ये पाहतो, तेव्हा मला काय वाटतं… ? मी शब्दात सांगू शकत नाही…!
एके दिवशी म्हातारी आली आणि माझ्या कानात ओरडून म्हणाली, ‘दाद्या आता मी मरायला मोकळी झाले…’
मी पण तेवढ्याच प्रेमानं तीला कानात ओरडून सांगितलं, ‘म्हातारे मरू नको इतक्या लवकर…’
बहुतेक तीला “म्हातारे मला मारू नको” असं ऐकू आलं असावं…. ती माझ्या गालाचे, हाताचे मुके घेत म्हणाली, ‘भयनीचं इतकं करतुस दाद्या, आता मी तुला न्हायी मारणार… न्हायी मारणार…!
असं म्हणत ती माऊली अश्रूंचा अभिषेक माझ्या हातावर करते… मी तीला कानात ओरडून म्हणतो, ‘ म्हातारे, काळजी करू नकोस, तीला मी बहीण म्हणून स्वीकारलं आहे…. तीचा हात मी कधीच नाही सोडणार.. तुज्या शप्पत…’
हि संपूर्ण वाक्ये मात्र जशीच्या तशी बहिऱ्या म्हातारीला ऐकू जातात… शेवटी आईच ती….!
न्हायी सोडणार ना भयनीचा हात….? न्हायी सोडणार ना भयनीचा हात….?? माझ्या पाठीवरून खरबरीत हात फिरवत ती दहा वेळा माझ्याकडून वदवून घेते… मला तिच्या चेहऱ्यावर माय दिसते…. डोळ्यात गाय दिसते….!
*वैद्यकीय
1. रस्त्यावरच भिक्षेकर्‍यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पाय कापणे, छातीतून/ पोटातून पाणी काढणे, डोकं फुटणे, चेहऱ्यावर ब्लेड मारून गाल कापला जाणे, डोळ्यांचे /कानाचे ऑपरेशन करणे… वगैरे वगैरे…. आता याविषयी फार चर्चा करत नाही… मी याविषयी एकही फोटो कधीही शेअर केला नाही…. कारण ते वाचुन, फोटो पाहून, अनेक जणांना चक्कर येते, मळमळ होते….!
असो, तर अशांना बरं झाल्यानंतर आपण छोटा व्यवसाय टाकून देत आहोत; अर्थातच तुमच्या मदतीतून…. हा मूळ मुद्दा…!
यातून बरं झाल्यानंतर आपण अशा लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवतो. जाण्याचा खर्च, तसंच तिथे सुरुवातीला राहण्याचा आणि व्यवसाय सुरू करण्याचा खर्च आपण करता …. आपण म्हणजे “आपण” …. मी नव्हे…. !!!
करता आपणच…. मी फक्त “सांगकाम्या”….!!!
एखाद्याकडून घेतलेली गोष्ट, दुसरीकडे पोचवायला काय अक्कल लागते…. ???
2. अपंग असणाऱ्या माझ्या एका बंधूला व्हीलचेअर हवी होती…. मी मग एक मेसेज टाकला आणि 223 व्हीलचेअरच्या मला ऑफर आल्या….
एक अपंग आजी…. जिचे पती अपंग होते आणि नुकतेच ते गेले, त्यांच्या स्मरणार्थ त्या आजीने मला त्या बाबांची व्हील चेअर देऊ केली…
या आजीची भावना समजून घेऊन, त्यांच्याकडून आपण व्हीलचेअर घेतली आणि इतर सर्वांना नम्रपणे सांगितले की पुढे कधी लागली तर तुमच्याकडून घेतो…
काय म्हणू मी समाजाच्या दातृत्वाला ?
दरवेळी आम्ही समाजाच्या पायावर कपाळ टेकतो…. पण तरीही ते कमीच आहे…!
*शैक्षणिक
भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांचे आपण शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे.
मला सांगायला आनंद होतो की आपल्या सर्वांच्या मदतीमधून, ज्या मुलांचे आपण पालकत्व स्वीकारले आहे, अशी सर्व मुलं यावर्षी उत्तम गुणांनी पास झाली आहेत…. मुद्दाम मी काही गुणपत्रिका इथे शेअर करत आहे,..!
माझ्या एका मुलीला नववी मध्ये तर 92% मार्क पडले आहेत…. पहिलीपासून दहावीपर्यंतची माझ्या मार्कांची टोटल केली तरी ती 92 भरत नाही….!
*(तुम्ही घरातले म्हणून सांगतोय, बाहेर कोणाला सांगू नका…. अर्थात माझ्या पुस्तकात ते सर्व जाहीर झालंच आहे म्हणा…)
असो, मी जे माझ्या आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे, त्याच्या विक्रीतून या सर्व मुलांचा शैक्षणिक खर्च भागवत आहे….!
या सर्व मुलांच्या फीया जमेल तशा भरत आहोत.
आपण अनेक मंडळी भीक मागणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी, या एकाच हेतूने, माझ्याकडून माझं पुस्तक विकत घेत आहेत; (आवडो न आवडो )
मी आपल्यासमोर नतमस्तक आहे…. !
भीक मागणाऱ्या व्यक्तींना भीक द्यायची ? की मदत करायची ? भीक आणि मदत यात फरक काय ? त्यांच्याशी कसं वागायचं ? बिस्किट, पाणी, अन्नदान द्यायचं का नाही ? ते खरंच गरजू आहेत की धंदा म्हणून भीक मागत आहेत…? गरजू आणि धंदेवाईक भीक मागणाऱ्या लोकांना आम्ही कसं ओळखायचं ? वगैरे वगैरे याविषयी मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे …..
हा मेसेज सर्वदूर पोहोचावा यासाठी मी ग्रंथालयांना मोफत पुस्तक देत आहे…. !
आपल्या माहिती मधील ग्रंथालयांना जर पुस्तक हवी असतील तर मला कळवावे, मी ती मोफत स्वखर्चाने पाठवायला तयार आहे… !
*अन्नपुर्णा


रस्त्यावर जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)
दिव्यांग कुटुंबाला आम्ही हे डबे तयार करण्याचे काम दिले आहे
It’s our win-win situationz
इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.
मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एक आजी भेटली…. तिने हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणाली माझ्याबरोबर जेव….छान चपाती होती, त्यावर हिरव्यागार मिरचीचा खर्डा आणि बाजूला लालेलाल लोणचं…. सोबत थंडगार पाणी… !
जेवून तृप्त झालो…. यानंतर तिने एका पूरचुंडीत बांधलेल्या …. तिला कोणीतरी भिकेत दिलेल्या चकल्या मला खायला दिल्या….!
प्रत्यक्ष अन्नपूर्णा भेटली… मी तिच्यासमोर नतमस्तक झालो…
रोज अशा अन्नपूर्णा दरिद्री नारायणाच्या रूपात मला भेटतात… आणि रोज मी तृप्त होतो….
*खराटा पलटण
खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team !
अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत.
या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.
*मनातलं काही
1. आजचं वर्तमानपत्र उद्या रद्दी असतं…. तसंच उमेदीत असलेल्या आई-बापांना वापरून घेतलं, की त्यांची मुलंबाळ , नातवंडे, वृद्धापकाळात अशा लोकांना रद्दी समजतात आणि बाहेर फेकून देतात. माझे मित्र श्री केतन मराठे, यांच्या लहान मुलाने घरोघरी फिरून रद्दी गोळा केली आणि त्याचे 1400 रुपये आले, ते त्याने मला दिले.
रद्दी झालेल्या लोकांसाठी, रद्दी विकून निधी गोळा करणे हा योगायोग म्हणू ? की श्री मराठे यांनी त्यांच्या मुलावर केलेला संस्कार म्हणू ?? की इतका लहान मुलगा आता खूप मोठा झाला आहे असं म्हणू …???
2. कोणीही प्लास्टिक बॅग वापरू नये, त्या ऐवजी कापडी पिशव्या वापराव्या, यासाठी मी आणि माझे भिक्षेकरी लोक आम्ही प्रयत्न करत आहोत.
यासाठी पुणेरी टोमण्यांचे बोर्ड तयार केले आहेत. आम्ही आमच्या भिक्षेकर्‍यांच्या गळ्यात ते अडकवणार आहोत….
प्लास्टिक पिशव्या वापरू नये, कपडे पिशव्या वापरा असा गमतीशीर, पुणेरी सल्ला माझे हे लोक समाजाला देतील.
याच सोबत ज्यांच्या अंगात शिवणकाला आहे, अशा सर्व लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे. पूर्वी भीक मागणाऱ्या अशा लोकांकडून आपण पिशव्या शिवून घेणार आहोत.
जे लोक कापडी पिशव्या शिवतील किंवा विकतील अशा सर्वांना आपण दिलेल्या निधीमधून आपण पगार देणार आहोत.
स्वार्थातून परमार्थ….!!!
जे लोक पिशव्या शिवतील त्यांना त्या दिवसाचा पगार मिळेल, जे लोक पिशव्या विकतील त्यांनाही त्या दिवसाचा पगार मिळेल आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू का होईना, परंतु प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होईल आणि त्या जागी त्यांच्या हातात कापडी पिशव्या असतील…
*तथाकथित भिक मागणारे लोक समाजाला प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका म्हणतील…. कापडी पिशव्यांचा प्रसार करतील…. पुढील पिढी वाचवण्याचा प्रयत्न करतील जगातील आपला हा पहिला प्रकल्प असेल… !
पुणेरी टोमण्यांचे बोर्ड मी आपल्या माहितीसाठी मुद्दाम पाठवले आहेत.
3. मागच्या आठवड्यात एक मुलगी भेटली, जवळ येऊन लाजत म्हणाली, सर माझं लग्न ठरलंय…. पोरगा तुमच्या वळकीचाच हाय… इतकं म्हणूस्तोवर पोरगा पुढे आला… या दोघांनाही पूर्वी आपण व्यवसाय टाकून दिला होता.
छुपे रुस्तम म्हणत मी दोघांच्याही गालावर चापटी मारली. तितक्यात मुलगी म्हणाली, ‘सर सोलापूरला आमच्या मूळ गावात लग्न ठीवलंय, इतक्या लांब तुमी येणार नाही माहित आहे, म्हणून आहेर घेऊन आलोय…!’
यानंतर अक्षरशः टॉवेल, टोपी आणि पॅन्ट पीस असा भररस्त्यात मला त्यांनी आहेर केला. अशा आहेराला “भर आहेर” का म्हणत असावेत हे आज मला कळलं.
मला खूप आनंद झाला…. तरी मी रागावून त्यांना म्हटलं हा असला फालतू खर्च करायचा कशाला…. ?
यावरती रडत पायाशी बिलगत ती म्हणाली, ‘सर तुमाला तर म्हाईत आहे, मला वडील नाहीत, वडिल म्हणून पयला आहेर तुमाला….!
यार, पोरी कधी मोठ्या होतात बापाला कळत नाही…. कळतच नाही राव…. !
लेख खूपच लांबलाय….!
मी तर काय करू ? सासरहून मुलगी जेव्हा माहेरी येते त्यावेळी, आई बापाला काय सांगू आणि काय नको ? असं होतं….
आज माझं सुद्धा तसंच झालंय…!
तुम्हीच माझे आई आणि बाप आहात….
आता तुमच्याजवळ मन नको मोकळं करू …. तर आणखी कुणा जवळ करू….?
प्रणाम !!!
दिनांक : 1 मे 2024

डॉ. अभिजित सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स

🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button