ताज्या घडामोडी

बारामतीलोकसभा.. निवडणूक शरद पवार विरुद्ध आरएसएस

बारामतीलोकसभा..
निवडणूक शरद पवार विरुद्ध आरएसएस

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

अकलूज दिनांक 19/04/2024 :

निवडणुका ह्या फक्त राजकीय अर्थाने महत्त्वाच्या नसतात. निवडणुकांच्या निकालाने समाजाचे राजकीय सोबतच सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्वरूपही बदलले जाते. यंदाची बारामती लोकसभा निवडणूक ही याअर्थाने विशेष आहे.
शरद पवार. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,तसेच केंद्रीय संरक्षण आणि कृषी मंत्री. महाराष्ट्राच्या राजकाणात शरद पवारांना सुरुवातीपासून कठोर विरोध केला तो आरएसएस-भाजपने. गेली 4 दशके आरएसएस-भाजपने आणि त्यांच्या असंख्य संलग्न संस्थांनी केवळ निवडणुकीच्या राजकारणातच नाही तर पुस्तकं लिहून, पत्रकं काढून, राजकीय-सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमाच्या स्टेजवरून शरद पवारांबद्दल यथेच्छ टीका केली. आणि ही टीका काही राजकारणापुरती मर्यादित नव्हती. त्यांचा आजार, कुटुंब, याबाबतची कुजबुज मोहीम आरएसएस-भाजप आणि त्यांच्या हितचिंतकांनी सतत चालू ठेवली.
बारामती पवारांचे होम ग्राउंड. या बारामतीच्या आधारे शरद पवारांनी सुरुवातीला पुणे जिल्हा आणि नंतर महाराष्ट्र काबीज केला. गेली 4 दशके हरेक तऱ्हेने प्रयत्न करूनसुद्धा बारामतीच्या राजकीय आखाड्यात शरद पवारांना हरवता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आरएसएस-भाजपने शेवटचे हत्यार काढले.
राजकारणात आतापर्यंत अभेद्य समजलं जाणारे पवार कुटुंब फोडून भाजपने सौ. सुनेत्रा अजित पवार यांना सौ. सुप्रिया सदानंद सुळे यांच्याविरोधात उभा केले. कुणी म्हणतं ही निवडणूक नणंद विरुद्ध भावजय आहे, कुणी म्हणतं शरद पवार विरुद्ध अजित पवार आहे, तर कुणी म्हणतं गांधी विरुद्ध मोदी आहे.पण खरं बघितलं तर ही निवडणूक शरद पवार विरुद्ध आरएसएस अशी आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आरएसएसप्रणीत अभिजन वर्गाच्या राजकारणाला विरोध करणाऱ्यात सर्वात प्रथम नाव शरद पवारांचे घ्यावे लागेल. आर्थिक, राजकीय, कृषी आणि क्रीडा विषयक कित्येक सुधारणा शरद पवारांनी केल्या.
पण सामाजिक सुधारणा विशेष अर्थाने बघितल्या पाहिजेत. ओबीसी आरक्षण, महिला धोरण, महिला आरक्षण, मराठवाडा विद्यापीठ नामांतर इत्यादी गोष्टी शरद पवारांनी महाराष्ट्राला दिल्या. याशिवाय शरद पवारांनी त्यांच्या राजकीय कर्तव्याच्या बाहेर जाऊन बहुजनांच्या सामाजिक-शैक्षणिक संस्थांना आधार दिला.
बहुजन समाजकारणाची मांडणी करणाऱ्या आ. ह. साळुंखे. जयसिंगराव पवार, ना. धो. महानोर, नामदेव ढसाळ यांच्यासारख्या कित्येक इतिहासकार-लेखक-विचारवंतांना शरद पवारांनी गाजावाजा न करता आधार आणि प्रोत्साहन दिले. हमीद दलवाई सारख्या दिग्गज समाजसुधारकाला त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात स्वतःच्य घरी ठेऊन शरद पवारांनी मदत केली. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, नेहरू सेंटर, यशवंतराव चव्हाण सेंटर, रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान इत्यादी संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली बहरल्या. याशिवाय मुंबई मराठी ग्रंथालय, मराठी साहित्य परिषद, मराठी नाट्य परिषद , एमजीएम, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या सारख्या संस्थांना शरद पवारांनी आधार दिला. यावरून दिसून येते कि महाराष्ट्राला हिंदुत्ववादाच्या वाटेला लावण्यात आरएसएसला सर्वात मोठा अडथला शरद पवारांचाच आहे.
या सर्व परिप्रेक्ष्यात आपल्याला बारामती लोकसभेची निवडणूक बघावी लागेल.83 वर्षाच्या या नेत्याला भाजपने कॉर्नर केले असून त्यांच्या मुलीचा पराभव हा केवळ सुप्रिया सुळे नावापुरता मर्यादित नाही. तो केवळ शरद पवार या व्यक्तीचा पण पराभव नाही. गेली 4 दशके महाराष्ट्रात बहुजनांना सर्वप्रकारच्या सत्तेच्या परिघाबाहेर ठेवण्याच्या आरएसएस-भाजपच्या राजकारणाला विरोध करणाऱ्या पुरोगामी प्रयत्नांचा तो पराभव असेल.
बारामतीची निवडणूक ही एका खासदाराची निवडणूक नाही. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र हे यापुढे देशाला दिशा देणारे राज्य राहणार का नाही आणि राज्याच्या बहुजनांच्या राजकारणाचे भवितव्य काय ह्या दोन प्रश्नांची उत्तरे देणारी ही निवडणूक आहे विचारधारा कशाशी खातात याचा गंध नसणाऱ्या आणि राज्याचा विकास कंत्राटदारच करू शकतात यावर अढळ श्रद्धा असणाऱ्या उपउपमुख्यमंत्र्यांना त्यांची चूक दाखवून देण्याची आणि वरच्या दोन प्रश्नांची उत्तरे देण्याची मोठी जबाबदारी बारामती लोकसभा मतदारसंघाच्याच्या मतदारांवर आहे.
त्यांनी ती समंजसपणे पार पाडावी एवढीच अपेक्षा

~ रणजित देशमुख

🔰संकलक: आकाश भाग्यवंत नायकुडे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button