जावळीकरांनो जागृत व्हा….. आलेवाडीत जे घडतयं ते प्रत्येक गावा-गावात घडूद्या..!
जावळीकरांनो जागृत व्हा…..
आलेवाडीत जे घडतयं ते प्रत्येक गावा-गावात घडूद्या..!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 13/0/2024 :
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुके म्हणून माण-खटावची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. जणू दुष्काळ इथल्या लोकांच्या पाचवीलाच पुजलेला. पिण्याला पाणी नाही तर शेतीला पाणी मिळणार तरी कोठून. त्यामुळेच पाण्याची किंमत इथल्या लोकांना लवकर समजली. इथल्या लोकांनी एकत्र येवून पाणी अडविले, पाणी जिरविले. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अंशता सुटला आहे परंतू त्याबरोबरच शेतीमध्येही पाणी खळखळू लागले आहे. जी किमया इथल्या लोकांनी करून दाखविली ती आपण जावळीकर करू शकत नाहीत का?
आपला जावली तालुका डोंगर-दर्यांनी व्यापलेला, निसर्ग संपदेने नटलेला आणि पावसाळ्या बद्दल तर काही बोलायलाच नको. डोंगर माथ्यावरून धो धो पडणारे धबधब्यांचे पांढरे शुभ्र पाणी, हिरवाईने नटलेल्या व रंगेबेरंगी फुलांनी सजलेल्या सह्याद्रिच्या मनमोहक पर्वत रांगा पर्यटकांना भुरळ घातल्याशिवाय रहात नाहीत. कोयना धरणाच्या बॅकवाॅटरवर नवनवीन पर्यटकांना आकर्षण ठरणारी उपकरणे आणली जात आहेत ही आनंदाचीच बाब आहे. मोजके व्यवसाय सोडले तर अजूनही जावळीकरांना मुंबई सारख्या शहरांकडे जावून चाकरी करण्याशिवाय पर्याय मात्र नाही. अनेक गावे ओस पडताना दिसतायत. जि.प. शाळांचा पट घसरलेला पहातो आहोत. सलग ४ महिने पाऊस पडूनही डोंगर उतारावरून वहावून जाणारे पाणी ना आपण आडवू शकलो, ना जिरवू शकलो. त्यामुळे जावली तालुक्याची अवस्था फेब्रुवारी ते जून महिन्या दरम्यान दुष्काळी तालुक्याहून वाईट झालेली आपण अनेक वर्ष पहात आहोत. कण्हेर, महू, हातगेघर अशी धरणे ही झाली पण डोळ्यांनी या धरणाचे पाणी नुसते पहायचे उपभोग मात्र घ्यायचा नाही. फेब्रुवारीच्या दरम्यान मेढ्याच्या वरच्या सर्व गावात नदी नव्हे तर पाण्याची डबकी कुठेतरी दिसतात अशी अवस्था पहातो आहोत. जावळीकरांच्या जीवनातून पाण्याचा दुष्काळ मात्र संपेना अशी अवस्था मात्र कायम आहे. बोंडारवाडी धरणाच्या निर्मितीकडे आस लावून ५४ गावची जनता बसली आहे. सरकारची कृपा होईल, तेव्हां होईल धरण आणि मिळेल पाणी….!
जावली तालुक्यातील म्हाते, तळोशी, डांगरेघर या गावांनी पाण्याची चांगली चळवळ निर्माण केली आहे. आता आलेवाडी गावच्या सर्व ग्रामस्थ, महिला व युवक यांनी एकजुटीने जलसंधारणांच्या कामाला सुरवात केली आहे.
डोंगरमाथ्यावर चर काढणे सुरू झाले आहे. नाम फौंडेशनने मशनिरी दिल्या आहेत. आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ५ लाखांचे इंधन दिले आहे. हे सगळं असले तरी आलेवाडीकरांनी हाती घेतलेले काम खुप मोठे आहे. आव्हानात्मक आहे. पण आपल्या गावाला पाणीदार बनविण्यासाठी प्रत्येक गावकर्याने चंग बांधला आहे. अनेक महिला भगिनी पाणी चळवळीला मदत करण्याचे मुख्य बाजारपेठांमधून फिरून आवाहन करीत आहेत. सोशल मिडीयामधून अनेक युवक श्रमदानासाठी आवाहन करीत आहेत.
आलेवाडीकरांनी सुरू केलेली ही पाणी चळवळ यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपआपल्या परिने सहकार्य करावे. ज्यांना आर्थिक मदत देता येते आहे त्यांनी अगदी १०० रूपयांपासून करावी. ज्यांना श्रमदानासाठी वेळ देता येईल त्यांनी जरूर द्यावा. गावागावातील युवकांनी एक दिवस नक्की श्रमदानाला वेळ द्यावा.
आलेवाडीकरांनी उभी केलेली पाणी चळवळ नक्कीच यशस्वी होईल आणि या गावाला पाणीदार झालेले पाहून जावळीतील ईतरही गावे जागृत होतील हीच अपेक्षा. जावळीकरांनो पावसाचे वहावून जाणारे पाणी आपण आता अडविले नाही जिरविले नाही तर भविष्यातील पिढीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहाणार नाही हे मात्र नक्की.
विलासबाबा जवळ
सामाजिक कार्यकर्ते
🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे