मंत्री गिरिष महाजनांचा साताऱ्यातला धावता दौरा म्हणजे…..”आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी”
मंत्री गिरिष महाजनांचा साताऱ्यातला धावता दौरा म्हणजे….. “आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी”
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
अकलूज दिनांक 19/03/2024 :
अनेक प्रश्न निरूत्तरीत ठेवणाऱ्या मंत्री गिरिष महाजनांचा साताऱ्यातला धावता दौरा म्हणजे…..
“आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी”
देशभर राजकिय धुमशानाला सुरूवात झाली असताना महाराष्ट्रातल्या राजकारणात कोणाचे पाय कोणाच्या पायात हे कळायला अजून महिना उलटणार आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचे ‘अती’निकटवर्तीय व भाजपाचे संकटमोचक गिरिष महाजन यांचा साताऱ्यातला ऐनवेळचा व धावता दौरा नक्की का? संकटमोचक यायला साताऱ्यात असलं संकट आहे तरी कुठलं? यावरून साऱ्यांच्या भुवया उंचावल्यात.
बरं, फक्त जलमंदिर नाही तर सुरूची बंगल्यावर पण भेटी झाल्यात. अग्नीशमन दल आलाय म्हणजे कुठंतरी आग लागलीय हे कळतं ना! मग राजकीय विस्तू नक्की पेटलाय कुठं, हे कळायला पाहिजे नाय तर ‘गिरिष महाजनांचा हा दौरा म्हणजे “आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी” ठरणार आहे.
सातारा मतदारसंघात महायुतीकडून उदयनराजेंना तिकिट मिळण्यास विलंब झाल्याने आणि पहिल्यांदाच महायुतीत व स्वपक्षातूनच स्पर्धक निर्माण झाले आहेत. शिवाय इंडि आघाडीकडून त्यांच्या विरोधात कोण हाही सस्पेन्स शरद पवारांनी गेल्या वेळी सारखाच ताणून धरल्याने ही स्फोटक परिस्थिती आहे. उमेदवारांची दोन्हीकडून निवड झाली कि निम्मं चित्र स्पष्ट होणार आहे. म्हणूनच साताऱ्यात तिकिटाला अनन्यसाधारण महत्व आलं आहे.
*संकटमोचकांच्या दौऱ्याने साधलं काय?
ऐनवेळी सातारा दौरा करताना महाजनांनी थेट जलमंदिर गाठलं. गुप्त बैठकीनंतर त्यांनी आम्ही-भाजपा उदयनराजेंचा खूप मान ठेवतं, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं म्हंटलं असलं तरी तिकिटावर भाष्य टाळलं. मग लगेच म्हणे, तिकिटाचे माझ्याकडे काही नसतं. आम्ही तिन-तिन पक्ष आहोत त्यामुळे त्याचा निर्णय वरिष्ठांकडे असतो, ते घेतात. तिकिट निश्चित करण्यासाठी महायुतीची कमिटी आहे, त्यांचा निर्णय अंतिम असतो. यावेळी उदयनराजेंना कोणी प्रश्नही विचारला नाही आणि ते काय बोललेही नाहीत, त्यामुळे इथलं वातावरण थोडं गंभीर वाटलं.
बरं, शिवेंद्रराजेंची भेट घेणार का? यावर ‘नाही’ असं ठोस बोलणारे महाजन तिसऱ्या मिनिटाला सुरूचीवर पोहोचले.
पुन्हा सुरूचीत गुप्त बैठकीनंतर बोलताना म्हणे, आमची काही राजकिय बैठक झाली नाही. मग इकडे का आला होता? या प्रश्नावर संकटमोचक मंत्री महाजन म्हणतात कसे, ‘शिवेंद्रसिंहराजेंचा चहा चांगला असतो तो प्यायला आलोय’.
देशात व महाराष्ट्रात उमेदवारीचे तिकिट देण्याच्या दोन खेपा संपल्या तरी उदयनराजेंना भाजपा अजून चर्चेच्या फेऱ्यात अडकवत आहे. त्यामुळे ‘महाजन तिकिट द्यायला आलेत की चहा प्यायला आलेत?’ हेच कळले नाही. बरं, या संकटमोचकांच्या दौऱयानं नक्की साधलं काय, हेही अनुत्तरीत.
बंब पोहोचायला आग नक्की लागली कुठे?
पुरूषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रराजेंची घेतलेल्या भेटीपेक्षा अचानक रामराजे नाईक-निंबाळकरांचे नाव पुढे येणं हे उदयनराजे गटाला चांगलंच झोंबलं आहे.
सातारा मतदारसंघात गेल्या 15 वर्षात हे पहिल्यांदा घडत आहे. नक्कीच कोणी तरी कोणाच्या तरी पायात बॉम्ब फोडून भाजपाच्या हातचा मतदारसंघ 2019 प्रमाणे गमवायला नको ही भाजपाला काळजी लागल्याची गिरिष महाजनांच्या दौऱ्याला पार्श्वभूमी असल्याने
पाय कोणाचा व बॉम्ब कोणाचा आहे, हे संकटमोचक शोधून काढतील.
उदयनराजेंना स्पर्धक निर्माण का झाले?
2019 चा पराभव हा यंदा प्रथमच उदयनराजेंना आक्रमक होण्यापासून रोखत आहे. त्यात पाच वर्षांत त्यांच्या अनेक क्लुप्त्या फसल्याने ताक पण फुंकून पिण्याची वेळ आली आहे. अशा वेळी आपल्याच महायुतीतले स्पर्धक निर्माण होतील हे स्वाभाविक आहे मात्र त्यांच्याच पक्षातील लोकांना स्पर्धकाचे बळ येणे विचार करायला लावण्यासारखं आहे.
*अजित पवार गटाची कोणासाठी मागणी,
*चेंडू मकरंद पाटलांच्या नेटमध्ये
महायुतीचे म्हणणे आहे की ही जागा जिंकणाऱ्या पक्षासाठी आहे. मग अजित पवार गटाने नुसतं तिकिट मागून चालणार नाही तर कोणासाठी हेही सांगायला हवे. उगाच कार्यकर्त्यांनी मागणी करून उपयोग नसतो. त्या पक्ष-गटाचे एकमेव आमदार मकरंद पाटील यांनी कोणाची शिफारस केली असल्याचे अजून जाहिर केलेले नाही. जर मागणीच कोणासाठी हे निश्चित नसेल तर विनाकारण उदयनराजेंना रोखण्यासाठी गडचिरोली…. धर्मदेवबाबा आत्राम…. असले कागदी घोडे नाचवले जात असल्याचा उदयनराजे गटाचा आरोप होणे स्वाभाविक आहे.
*संकटमोचकांची राज्यस्तरीय कामगिरी
मंत्री गिरिष महाजन यांना भाजपाचे संकटमोचक म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांनी अनेक जटिल प्रश्न सोडवले आहेत. त्यात कोल्हापुर-सांगलीच्या महापुरात स्वतः पोहून जाणे. आण्ण हजारेंची मनधरणी, अंतरवालीसराटीत जरांगेंशी मध्यस्थी, जरांगेशी नवीमुंबईतील मध्यस्थी, इर्शाळवाडीत मुख्यमंत्र्यांच्या आधी पोहोचणे, विरोधक असताना कोरोना काळातील काम, महायुतीच्या सत्तेची जमवाजमव, नाशिकहून निघालेल्या शेतकऱयांच्या मोर्चाची मध्यस्थी अशा असून रविवारी मोहिते पाटलांच्या घराण्यात मध्यस्थी म्हणून दाखल झालेले संकटमोचकांनी जलमंदिर व सुरूचीला लागोपाठ बैठका घेतल्या आहेत.
बंब पोहोचायला नक्की आग लागलीय कुठं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न देता झालेला गिरिष महाजन यांचा दौरा ‘आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी’ असा झाल्याचे बोलण्याती तथ्य आहे.
दीपक प्रभावळकर, सातारा
9325403232
9527403232