ताज्या घडामोडी

भाजपला आता एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा भार सोसवेना

भाजपला आता एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा भार सोसवेना

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

अकलूज दिनांक 09/03/2024 :
आता भार अती झाला आणि तो इतका असह्य झाला आहे की सोसण्याच्या पलिकडे गेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षातील आमदार व खासदारांची वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी दस्तूरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील तिकीट वाटपावर विशेष अंकुश ठेवला असल्याची वंदता आहे , परिणामी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी कितीही गलेलठ्ठ जागांची मागणी केली असली तरी त्या मागणीला फारशी काय अगदी तसूभरही किंमत मिळणार नाही याचा अर्थ भाजप ज्या व जितक्या जागा देतील त्यावरच यांनी समाधान मानावे कारण यांच्याकडे अन्य कोणताही दुसरा पर्याय नाही .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या शिवसेनेत सध्या काही केल्या सर्वच आघाड्यांवर अलबेल आहे असं अजिबात नाही त्यामुळे त्यांच्या पक्षात काय किंवा गटात कोणाचाही कोणाला पायपोस नाही परिणामी माजी मंत्री रामदास कदम यांची भाईगिरी अगदीच नाकातोंडाशी आली आहे त्यामुळे ते व त्यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम हे पायपोस नसल्याप्रमाणे भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिवसागणिक अंगावर घेऊन स्वतःचेच राजकीय वस्त्रहरण करून घेत आहेत , तर दुसरीकडे खासदार गजानन किर्तीकर यांनी तर आपल्या वयाची ऐशीतैशी करत भाजपलाच खडे बोल सुनवायला सुरूवात केली आहे अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा हा डोलारा हाकणे जिकीरीचे झाले आहे .
यात शिवसेनेतील कुरापतखोर आमदारांची संख्या चढत्या क्रमाने वाढतच चालली आहे कारण आमदार संजय बनसोडे यांनी परवाच एका तरुणाला जाहीरपणे चार चौघात चांगलेच ठोकून काढत कायदाच धाब्यावर बसवला तर दुसरीकडे गणपत गायकवाड या आमदाराने मध्यंतरी कल्याणच्या पोलिस चौकीत महेश गायकवाड नामक व्यक्तीला यमसदनी धाडण्यासाठी अमानुष गोळीबार केला तथापि महेशचे नशीब बलवत्तर होते म्हणून तो वाचला अशी सारी लोकप्रतिनिधींची केवळ खोगीरभरती असताना एकनाथ शिंदे यांनी कोणत्या स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात हेच काही केल्या कळत नाही , यात भरीस भर म्हणून दुष्काळात तेरावा महिना असल्यामुळे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट अगदी ऐनवेळी म्हणजेच नको त्यावेळी अक्षरशः पचकत म्हणाले की , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दालनात अडीच अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद भाजप व शिवसेना या पक्षांमध्ये वाटून घेण्याचा शब्द दिला होता तो खरा होता .
ज्यावेळी हा शब्द दिला होता किंवा दिला नव्हता त्यावेळी आमदार संजय शिरसाट काय उध्दव ठाकरे यांच्या अंतर्मनात जाऊन बसले होते का ॽ की ज्यामुळे शिरसाट यांना साक्षात्कार झाला की ठाकरे हेच खरे बोलतात , याचा अर्थ असा की लोकसभा निवडणुकीत जागा वाटप करताना भाजपला कात्रजचा घाट दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे दुसरं तिसरं काही नाही पण दिल्लीत भाजपचे नेते काथ्याकूट करत बसले आहेत त्यांना या सगळ्या इरसाल खेळीची चांगलीच पूर्व कल्पना असते याचा विसर बहुदा.संजय शिरसाट यांना पडला असेल तर तो त्यांचा भ्रम आहे .
सध्या शिवसेना पक्षात उठवळांची संख्या पायलीला पाचशे आहे त्यामुळे नको तो आमदार किंवा खासदार आपली पोपटपंची करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर नको ती डोकेदुखी वाढवून ठेवतो त्यामुळे शिंदे यांची अवस्था घरच झालं थोडं अन् व्याहीने धाडलं घोडं अशीच काहीशी झाली आहे पण आजपर्यंत तर त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही म्हणून तर शिवसेनेची नौका आजही एका तिरावर स्थिर आहे अन्यथा दुसरा कोण नेता असता तर शिवसेनेची वासलात लागली असते हे कुणी सांगायला ज्योतिषाची गरज नाही , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष संघटनेचा मोठा पूर्वानुभव पाठीशी आहे त्यामुळे त्यात ते तसूभरही कमी पडत नाही पण या पक्षात प्रबळ वकृत्व करणाऱ्यांची चांगलीच वणवा आहे त्यामुळे कोणत्याही जाहीर सभेत फर्डे भाषण करून समोरच्या गर्दीत आपली छाप पाडणारे व्यक्तीमत्व दिसायला हवं पण ते दूरदूर दिसत नाही अगदी हीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे अर्थात तिथे अजितदादा हे खमके वक्ते असले तरी अन्यत्र दुष्काळच आहे त्यामुळे अशा एक ना अनेक विपरीत परिस्थितीत पक्षाला स्थिर स्थावर करण्याची किमया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साधावी लागते म्हणून मग त्यांना भाजपपुढे काहीशी नमती भूमिका घ्यावी लागते ही त्यांची मजबुरी आहे त्यात या दोन्ही पक्षातील काही नेत्यांनी वारेमाप पैसा लुटला त्यामुळे त्याची परिणीती जी व्हायची तीच होणार दुसरे काय नाही.

राजाभाऊ त्रिगुणे
सातारा .
दिनांक -०९/०३/२०२४ .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button