अकलूज लावणी स्पर्धेच्या महामेळ्याची जल्लोषात सांगता 🟦 “कलावंतांना मानाचे पान आणि कलेला ऊर्जा मिळवून देणारी अकलूजची लावणी स्पर्धा”- अनेक कलावंतांची भावना

🟪अकलूज लावणी स्पर्धेच्या महामेळ्याची जल्लोषात सांगता
🟦 “कलावंतांना मानाचे पान आणि कलेला ऊर्जा मिळवून देणारी अकलूजची लावणी स्पर्धा”- अनेक कलावंतांची भावना
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 12.2.2024 : “कलियुगाची झालीय भेळ,
नाही कुणाचा कुणाला मेळ.
बघा बघा कसं हे कलियुग आलं,
ऐकाव जे ते नवल झालं” या छक्कड लावणीच्या बोल, ताल, ठेक्याने सहकार महर्षि स्मृतीभवन दणाणून सोडत अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेच्या महामेळ्याची जल्लोषात सांगता झाली.
राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे रु.पाच लाख व चषक जोत्स्ना रुक्मिणी अर्चना वाईकर, पिंजरा कला केंद्र वेळे; न्यू अंबिका कला केंद्र , यवत- चौफुला आणि वैशाली समसापूरकर जयअंबिका कला केंद्र सणसवाडी या तीन कलाकार पार्ट्यांनी विभागून पटकाविला.
द्वितीय क्रमांकाचे रु. ३ लाखाचे पारितोषिक व चषक ओम भगवती सांस्कृतिक कला केंद्र नांदगाव,जिल्हा अहमदनगर ने जिंकले. तृतीय क्रमांकाचे रु. १ लाख व चषक मंगल, माया, प्रिती स्वामगावकर नटरंग कला केंद्र मोडनिंब. तर चतुर्थ क्रमाकाचे रु. ७५ हजार व चषक विद्या, पूजा किरण काळे, रोईकर पार्टी भोकरफाटा नांदेड यांना मिळाला. पाचवा क्रमांकचे बक्षीस रु. ५१ हजार व चषक छाया, पुजा, श्रद्धा कोल्हापूरकर, रेणूका कला केंद्र अंबप फाटा, कोल्हापूर. आणि अनिता परभणीकर, नटरंग कला केंद्र मोडनींब यांना विभागून देण्यात आले. याचबरोबर उत्कृष्ठ अदा रु. ५०००/- व चषकच्या मानकरी जोत्स्ना वाईकर ठरल्या. मुजरा रु. ३०००/- व चषक विभागून वैशाली समसापूरकर आणि जोत्सना वाईकर या लावणी कलावंतांना देण्यात आला. उत्कृष्ठ ढोलकीपटू नितीन जावळे ; उत्कृष्ट पार्श्वगायिका प्राजक्ता महामुनी; उत्कृष्ठ पेटीवादक विकी जावळे; उत्कृष्ठ तबलवादक राहुल जावळे यांना प्रत्येकी एक हजार रुपये व चषक देण्यात आले.
“कुणी नाही मानील, कुणी नाही जानील,
आम्ही तमाशा कलावंत
चंद्रसूर्य असेपर्यंत, तुम्ही ठेवा लावणी जिवंत”
अशा व्याकुळ आग्रही विनवणीतील आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मन भारावून टाकणारी लावणी असेल, किंवा जाई जुईच्या बाजारा, गुलाब माझा हरवला
येता येता घोडा रायाचा,
कुणीतरी मागे फिरविला. अशा बोलाची उडत्या चालीची लावणी अशा विविध प्रकारच्या लावणी द्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही स्पर्धा अनोखी व अविस्मरणीय ठरली गेली.
श्रीमती कै.रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी तसेच जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचा समारोप पहाटे पाच वाजता बक्षीस वितरणाने झाला. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते, लावणी स्पर्धेचे जनक जयसिंह मोहिते पाटील व जयंती समारंभ समितीच्या स्पर्धा कमिटीच्या अध्यक्षा स्वरूपा राणी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
“मानसिक ऊर्जा देणार हे संगीतमय क्षेत्र आहे. स्वरूपाराणी दीदी मोहिते पाटलांच्या दिग्निटीने कलाकारांसी एकरूप झालात”- माजी मंत्री दिलीप सोपल यांचे प्रशंशात्मक उद्गार.