ताज्या घडामोडी

हॅप्पी न्यू इयर…!!!

हॅप्पी न्यू इयर…!!!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 29/12/2023 :
एखाद्याला तयार भाकरी देण्यापेक्षा त्याला भाकरी कशी करायची ? याची अक्कल शिकवावी… भाकरी कमवायची कशी ?? याचं तंत्र शिकवावं… या मताचा मी आहे…! याच तत्वावर; भीक मागणाऱ्या, याचना करणाऱ्या आमच्या लोकांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा देऊन, त्यांच्याशी नाती जोडून, या नात्यांचा उपयोग करून, त्यांना व्यवसाय करायला, स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी होऊन आत्मसन्मानाने जगायला प्रवृत्त करणे, (Counseling and convince ) हे आमच्या कामाचे मूळ स्वरूप आहे.
आम्ही समाजातील रूढी परंपरासण वार यांचा यासाठी खुप चांगला उपयोग करून घेतो….
उदा. दिवाळी आली… पणत्या विका… दसरा आला… झेंडूची फुलं विका… मारुतीला लोक तेल वाहतात… शनिवारी तेल विका… गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाची फुल वाहतात… चतुर्थीला दुर्वा आणि फुलं विका… शंकराला दुधाचा अभिषेक करतात…. सोमवारी दुधाच्या पिशवी विका…. आणखीही बरंच काही…
आता डिसेंबर 2023 संपत आहे, आम्ही यातही संधी शोधली…. आता सांगतोय कॅलेंडर विका….!
हो…. विका म्हणून कोरडं सांगत नाही, त्यांना या वस्तू “आम्ही” विकत घेऊन देतो….!
“आम्ही” म्हणजे …. “आपण सर्व”… !!!
आम्ही एकटे काय करणार ? आपण सर्व जण जी मदत करत आहात, त्यातूनच हे सर्व करत आहे… मी आपली मदत योग्य पत्त्यावर पोचवणारा फक्त पोस्टमन आहे… बाकी धनी आपण आहात.
तुकाराम महाराज म्हणतात,  धन्याचा तो माल, मी फक्त भारवाही हमाल…. !!!
आम्ही आनंदाने आणि स्वखुशीने हमाल झालो आहोत….
तर .. माझे जे अंध आणि अपंग याचक बांधव आहेत त्यांना या आठवड्यात कॅलेंडर विक्रीसाठी घेऊन दिले आहेत….
ते चटकन ओळखू यावेत, यासाठी त्यांच्या गळ्यात एक बोर्ड घातला आहे….
आयुष्यातली ज्योत विझली आहे …मनातला प्रकाश नाही…
भोवतालची सृष्टी हरवली असेल… पण आत्मविश्वास नाही…
आम्हाला भिकेचा चंद्र नकोय…..आहे कष्टाची भाकर हवीय ….
आम्हालाही सन्मानाने जगण्याची संधी द्या…!!!
कोण जाणे, हा बोर्ड वाचुन; गरज नसलेली व्यक्तीही एखादं कॅलेंडर घेवून, माझ्या या लोकांचे पुढील वर्षातील दिवस छान जाण्यास मदत करतील….!
माझ्या या अंध याचक ताई, शिवाजी नगर कोर्ट, गेट नंबर एक ते चार दरम्यान,…. बडी दरगाह शनिवार पेठ…. शनिवार वाडा परिसर…. शनीपार मारुती मंदिर, चितळे स्वीट मार्ट जवळ , बाजीराव रोड येथे भेटतील…. !
गळ्यात बोर्ड असेल…. नसेलही….
घ्या यांच्याकडून एक कॅलेंडर विकत… जमलं तर…!!!
यांचंही “न्यू इयर” “हॅप्पी” करूया का…???
स्वतःचा विचार करत रात्रभर जागणं याला म्हणतात “जागरण” परंतु दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागणं याला म्हणतात “जागृती”….
नवीन वर्षात, “जागरणापासून”…. “जागृती” पर्यंत जाण्याचा, एक नवीन संकल्प आपण करूया का ???

डॉ. अभिजीत सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट
9822267357

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button