ताज्या घडामोडी

अजितदादांनी काकांबरोबरची जेवणावळी आवरती घ्यावी

अजितदादांनी काकांबरोबरची जेवणावळी आवरती घ्यावी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharastra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 16/11/2023 :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांनी ‘ स्व ‘ हट्टापायी संपूर्ण पक्षाला मगरमिठीत घेऊन पक्षाची वासलात लावली म्हणून सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या काकांना कात्रजचा घाट दाखवत त्यांच्याशी दगाबाजी केली. सत्तेच्या हव्यासापोटी भाजप शिवसेना महायुतीबरोबर निर्लज्जपणा दाखवत घरोबा केला. आणि आता मात्र याच काकांचे राजरोसपणे पाय चेपण्यासाठी ऐनकेन प्रकारे त्यांच्याशी लांगूलचालन करत आहेत. ही बाब काही केल्या महाराष्ट्रातील जनतेच्या गळी उतरत नाही. परिणामी हा सगळा पोरकटपणा अजितदादा पवार यांच्या आत्मघाताला आगामी काळात कारणीभूत ठरणार आहे. म्हणून त्यांनी आता महायुतीला अंधारात ठेवून आपला राजकीय उद्योग बंद करावा. कारण त्यातच त्यांचे भले आहे.
अजितदादां हे स्वतःच्या मनासारखे काही झाले नाही की कमालीचे नाराज होतात आणि सगळं काही आपल्या मनासारखं झालं की सत्तेच्या सारीपाटावर बसून भलतेच झुलु लागतात. हे काय नवीन नाही. पण त्यांचा हा राजकीय बालिशपणा किती दिवस आणि किती काळ चालणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांनी हा बालिशपणा आपल्या कुवतीनुसार पोटात घातला त्यामुळे साहेबांना आपलं राजकीय पोट आवरता येईना. तथापि अजितदादा आता पवारसाहेबांना टांग मारुन महायुतीत केवळ बकासूरी महत्वकांक्षा ठेवून अचानकपणे हनुमान उडी घेत चार महिन्यांपूर्वी डेरे दाखल झाले. यात भाजप शिवसेनेला फायद्या पेक्षा तोटाच अधिक झाल्याचे जाणवत आहे. कारण दादांची राजकीय दंडेलशाही या चार महिन्यांत इतकी पराकोटीची वाढली होती की त्यामुळे भाजपने आपल्या कोठ्यातील राज्याचे अर्थमंत्री त्यांना देऊन जणू काही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या एका कथित घोटाळेबाजाच्या हाती सोपावल्या. शिवाय दादांनी धायमोकलून रडत पुण्याचे पालकमंत्रीपद सुध्दा अक्षरशः बळकावले आहे. आता यापुढे भाजप काय स्वतःच्या पक्षाची हुकुमत सुद्धा त्यांच्याकडे देऊन ‘ दिगंबर ‘ होणार आहे का ॽ हे एकदा भाजपने स्पष्टपणे सांगितले तर भाजप वासियांच्या ज्ञानात तेव्हढीच भर पडेल. अर्थमंत्रीपद बळकावून अजितदादा कानामागून येऊन कमालीचे तिखट झाले असताना त्यात भर म्हणून पुण्याचे पालकमंत्रीपद सुध्दा या विकासपुरुष असणाऱ्या दादांच्या चरणी अर्पण केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कमालीचे नाराज आहेत. तर तीच अवस्था त्यांच्या शिवसेनेची आहे. कारण हा सगळा दादा उठाठेवीचा कार्यक्रम भाजपलाच नाही तर शिवसेनेला आगामी काळात नुसता जड नाही तर डोईजड होणार आहे. त्यात दादांच्या आईने परवाच एका कार्यक्रमात अजितला मुख्यमंत्री होताना पाहायचं आहे अशी आशा व्यक्त केली. त्यात काही गैर नसलं तरी पाच पन्नास आमदारांच्या पाठबळावर कुणी नेता मुख्यमंत्री होतो का ॽ हा संशोधनाचा विषय आहे. तथापि एकनाथ शिंदे हे अपवादात्मक परिस्थितीत मुख्यमंत्री झाले म्हणून आगामी काळात कुणी येड्या गबाळयाने अशी अपेक्षा बाळगली तर ठिक आहे. पण अजितदादा पवार हे त्यापैकी नसल्याने त्यांना विधीमंडळातील संख्याबळाचे पुरेसे ज्ञान विकसित आहे. त्यात ते बराच काळ राज्याचे अर्थमंत्री असल्याने आकडेमोड करण्यात त्यांचा कुणी धरू शकणार नाही. हे जरी खरे असले तरी ते सत्तेच्या बाजारात आपला मुख्यमंत्री पदाचा घोडा दामटण्यासाठी वेळ पडल्यास कधीही भाजप शिवसेना युतीला तोंडावर पाडून या पदापर्यंत ते मजल मारणार नाहीत याची शाश्वती भाजपचे चाणाक्ष तरी देऊ शकतील का ॽ तर अशा या सत्ता पिपासू विस्तवाला महायुतीने आतापासूनच चार हात लांब ठेवत ताक सुध्दा फुंकुण पिण्याची गरज आहे. कारण याच दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन साडेतीन वर्षांपूर्वी भाजपला बारामतीच्या डेरीतील गरमागरम दूध पाजले होते. याची जाणीव भाजपला आहे का नाही ? देवजाणे.
राज्याचे अर्थमंत्री असताना अजितदादा मागील महिनाभरापासून रडीचा डाव कशासाठी खेळतात हेच कळेनासे झाले आहे. कारण त्यांना नुसत्या तिजोरीच्या चाव्या नको आहेत तर त्या तिजोरीतून वारेमाप खर्च करण्याचा स्वैराचार असणारा हक्क पण हवा आहे. पण तो अधिकार पूर्वानुभव असल्याने भाजपने दिला नाही. त्यामुळे दादांची तिजोरीवरची ‘ हम करे सो ‘ असली दंडेलशाही अजिबात चालत नाही. हीच तर त्यांची खरी पोटदुखी आहे. मग काय महायुतीला झासात घेण्यासाठी ते एका बाजूला काकांचे लांगूलचालन करत त्यांच्या बरोबर कधी पाडव्याच जेवण तर कधी भाऊबीजेची जेवणावळी करून वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटातील आमदार हे विकासाच्या नावाखाली वारेमाप मलिदा हाणण्यात भलतेच वाकबगार आहेत. त्यामुळे दादांच्या गटाला वारेमाप निधी मिळत नाही. परिणामी या गटातील आमदारांनी दादांना जेरीस आणले असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत ‘ अजितदादा अकेला करेगा तो क्या ? ‘ नाही का ॽ कारण आता त्यांना महायुतीला नारळ देता येईना आणि पुन्हा काकांची मन्नतवारी करून मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होता येईना. तथापि कायद्याच्या कचाट्यातून दादांनी लावलेल्या ऊसाचे आगामी काळात चिपाड झाल्याशिवाय राहणार नाही हेही तितकंच खरं आहे.

राजाभाऊ त्रिगुणे

पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button