यात साहेबांचा दोष कुठे आहे ?

यात साहेबांचा दोष कुठे आहे ?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 15/11/2023 :
आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या वरील टीकेने मी प्रचंड अस्वस्थ होतो. समाज हा ज्येष्ठ व्यक्ती प्रति ही कृतज्ञ नसतो.त्यांचे योगदाना प्रति कृतज्ञ नसतो हे पाहून मन व्याकूळ होत.
माझा आणि साहेबांचा थेट परिचय नाही.मी त्यांच्या योजनेतील लाभार्थी नाही. त्यांच्या पक्षातील साधा कार्यकर्ता ही नाही.
पण साहेब मला विद्यार्थी दशेपासून आवडतात.नेता म्हणून भावतात.
साहेबांनी एक जातीय राजकारण कधी केलं नाही. शक्य असेल तितकं दलीत,भटके विमुक्त, मुस्लिम ओबीसी, साऱ्यांच्या पदरात टाकण्याची भूमिका स्वीकारली.तांड्या वरील मुल ही शाळेत गेली पाहिजे म्हणून आश्रम शाळा वाटल्या.अनेक वसाहती उभारून दिल्या. भटक्या विमुक्ता तील अनेक नेत्यांना त्यांनी भरघोस दिलं. नेत्यांना दिलं तर ते समाजात खाली पाझरवतील असा विश्वास त्यांना वाटला. याचा ही अनेकांनी गैर फायदा घेतला. व्यक्तिगत उन्नती त्यांनी करू नये असं मला म्हणायचं नाही.पण अनेक दलीत समाजातील भटक्या विमुक्त चळवळीतील लोकांनी दुसरी फळी निर्माण केली नाही. त्या फळी शी साहेबांचा सबंध येऊ दिला नाही. परिणामी दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेते होण्याची प्रक्रिया गतिमान न होता ती अवरुद्ध झाली.
महाराष्ट्राच्या राजकारणात साहेबांच्या सक्रिय राजकारणात शक्ती युक्त बनण्याच्या ही अगोदर अस्तित्वात असलेल्या स्ट्रॉंग मराठा घराणी सत्तेत विराजमान होती , त्यांच्या सहकार चळवळीने निर्मित झालेल्या विविध आर्थिक , शैक्षणिक , संस्था आणि कारखानदारी ताब्यात होती. अश्या कालखंडात साहेबांनी त्यांचे राजकारण चालू केले.
साहेब कोण होते ? त्यांचे बापजादे प्रस्थापित होते काय? सातारा जिल्ह्यातून त्यांचे वडील काटेवाडी ला आले आणि तेथून त्यांनी कॅनॉल चे काम करण्यास सुरुवात केली. गाव पातळीवरील पाणी व्यवस्थापन कमिटीचे ते प्रमुख बनले. तिथेच शेती घेतली. साहेबांचे अनेक भाऊ शिकले सवरले , अनेक क्षेत्रात त्यांनी स्वतः ला झोकून दिले , इतरांच्या साखर कारखान्यावर एम डी झाले , कांहीं जण वृत्तपत्र धंद्यात गेले. कांहीं जण शेतीत रमले. एकटे साहेब राजकारणात गेले. एक एक पाऊल रोवत त्यांनी या क्षेत्रावर दबदबा निर्माण केला. दिल्ली चे राजकारणात दबदबा असलेला एकमेव नेता म्हणून उभा देश त्यांचे कडे पाहू लागला.
स्वातंत्र्य कालखंडात आरक्षणाची सुरुवात पहिल्यांदा ब्रिटिशांनी सुरू केली. प्रशासनात या उपेक्षित वर्गाचा ही समावेश असावा असे त्यांना वाटले. हेच स्वातंत्र्या नंतर घटनात्मक आरक्षण एस सी /एस टी साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले.
इतर मागासवर्गीय यांची ओळख करून त्यांना ही लाभ मिळावा म्हणून आयोग स्थापित करण्याचे ठरले. त्यातून काकासाहेब कालेलकर आयोग आला. त्यांनी शिफारस केली. पण व्यक्तिगत पातळीवर त्यांनी आरक्षण देण्यास पत्र लिहून विरोध दर्शवला.
संसदेत आरक्षण बिला वर चर्चा करताना आरक्षणाला उच्च वर्णीय समाजाने तीव्र विरोध केला. यातून आरक्षण हे अपवाद आहे. आणि त्याची मर्यादा पन्नास टकक्यांपेक्षा पेक्षा जादा नसावी असा निर्णय झाला. यास साहेब जबाबदार आहेत का?
व्हि. पी. सिंग सरकार ने जाता जाता मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. यातून मंडल आयोगाने तीन हजारांहून अधिक असलेल्या जाती समूहाचा समवेश ओबीसी म्हणून केला. ही यादी केंद्राची होती.
या ओबीसी वर्गातून राजपूत , जाट , गुर्जर , मराठा , लिंगायत , मारवाडी , अश्या उच्च वर्णीय जाती बाहेर ठेवल्या गेल्या. यात साहेबांचा नेमका दोष कुठे आहे ?
मंडल आयोगाने ओबीसी ची लोकसंख्या 52% धरून त्यांना आरक्षण मर्यादा मुळे 27% आरक्षण देऊ केले. यात साहेबांचा दोष कुठे आहे ?
वंजारी आणि धनगर समाजाला आरक्षण संरक्षित करताना याच ओबीसी वर्गातील 5.30%आरक्षण देऊ केले. त्याचा किमान लाभ स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षण आणि नौकरी मिळवताना या समाजाला झाला.
धनगर बांधव ही म्हणतात धनगर समाज हा एस टी प्रवर्ग मध्ये च आहे
आणि आम्हाला ओबीसी मध्ये घालून साहेबांनी आमचे वाटोळे केले.
आदिवासी कोण ? याच्या व्याख्या ठरलेल्या आहेत आणि त्याचे निकष ही ठरलेले आहेत. हे निकष साहेबांनी ठरवलेले नाहीत.
आदिवासी हिंदू आहेत का? याचे उत्तर नाही असे आहे. आदिवासी हिंदू मधील जात आहे काय ? याचे ही उत्तर नाही असे आहे.
हिंदू देव देवतांची पूजा, संस्कार ते करतात काय? याचे ही उत्तर नाही असे आहे. नागरी जीवना पासून दूर वर असलेले , जंगल , एक सानिध्य , पारध , करून , जमाती बनून स्वतंत्र संस्कृती असलेल्या जमाती म्हणजे आदिवासी. ज्यात पारधी जमातीचे लोक ही येतात. अशी व्याख्या त्यांनी ठरवली यात साहेबांचा दोष कुठे आहे?
पण इतरांच्या फसव्या युक्तिवादा चे आरोपी नेहमीच साहेबांना बनवले याचे शल्य माझ्या सारख्या माणसाला वाटते
ऊस , कापूस , गहू , तांदूळ , याला हमी भाव मिळावा. ज्या भागात कोरडवाहू शेती आहे तिथे ही द्राक्ष डाळिंब पिकावे.
दूध, अंडी , आणि ब्रॉयलर कोंबडी पालन निर्मिती तून शेतकऱ्यांना जोड धंदा मिळावा म्हणून साहेबांनी धोरणे आखली.
उसाला अधिकचा दर देता यावा म्हणून इथेनॉल चे प्रकल्प उभे करण्याचे धोरण त्यांनी आखले , हे प्रकल्प आज सहकारी साखर कारखानदारी चे प्राण आहेत.
सहकारी चळवळ निकोप आणि घराणेशाही मुक्त, भ्रष्टाचार मुक्त ठेवण्याची जबाबदारी सभासद वर्गाची होती की साहेबांची?
पण साखर सम्राटांना, शिक्षण सम्राटांना कायम स्वरुपी राज्यकर्ते बनवून त्यांना आपले तारण हार मानणाऱ्या समाजाने स्वतः चे गरिबीचे खापर साहेबांवर फोडणे ही बाब वडाची साल पिंपळाला चीटकवने च आहे ,
भारत सरकारने स्वीकारलेल्या जागतिक मुक्त अर्थव्यवस्थेने आज खाजगीकरण, मुक्त आर्थिक स्पर्धा सर्व क्षेत्रात धुमाकूळ घालत असताना सगळीच आरक्षणे धोक्यात आली आहेत. 2014नंतर तर मोदी सरकार ने या प्रक्रियेला अत्यंत गती दिल्याने विमानतळ , रेल्वे , खनिज तेल खाणी, वीज निर्मिती , रस्ते , शिक्षण , राज्य परिवहन मंडळ , शासकीय दवाखाने , इतकेच काय जिल्हा परिषद शाळा चे ही खाजगी करण चालू आहे , या मुळे प्रत्येक क्षेत्रात अधिकची फी मोजावी लागणार आहे , ही भांडवली व्यवस्था व तिचे दोष आहेत , पण हे न समजून घेता साहेबांवर वार करणे तुलनेने सोपे आहे. आणि हे वार केले जात असताना माझ्या सारख्या त्यांचेशी कोणतेही नाते नसलेल्या माणसाला दुःख होते.
साहेबाची प्रॉपर्टी किती? यावर खल मांडणाऱ्या माणसांनी नुकतेच राजकारणात आलेल्या जय शहा ची आर्थिक संपत्ती कशी वाढते यावर कधी प्रश्न चिन्ह निर्माण केले नाही. परदेशात क्रिकेट चालू असताना हातात तिरंगा घेण्यास ही नकार देणाऱ्या जय शहा याचे वर कोणी आक्षेप घेतले नाहीत.
चेहऱ्याला आलेला घाम तिरंग्या ने पुसताना मोदीजी ना कुणी प्रश्न विचारले नाहीत.
पण पवार साहेबाना मात्र अनेक दूषणे देताना त्यांच्या अंतर आत्म्यात साधे डोकावून ही ते पाहत नाहीत याचे वाईट वाटते.
इतक्या उंचीचा आणि अफाट कर्तृत्वाचा पवार साहेब यांचे सारखा नेता मराठा समाजाला मिळाला. महाराष्ट्राला मिळाला. पण त्यांची कदर म्हणावी तशी समाजाने आणि राज्याने ही केली नाही. याची खंत मला वाटते
शेतकरी संकटात आला की पवार साहेब धावून येतात. हजारो कोटींची कर्ज माफी असेल किंवा अलीकडील अनेक सरसकट कर्ज माफ्या असतील, विविध अनुदाने असतील, ती साहेबांनी दिली. याचे कारण ते जाणतात 80% मराठा समाज हा शेतकरी व गरीब अल्पभूधारक आहे.
या आधारवड ठरलेल्या वटवृक्षा शी बेईमान कोणीच होऊ नये.
कलम कसाई बनून ज्यांनी तुमच्या माना कापल्या त्यांना ओळखण्यास शिका. त्यांच्या डावपेचांची शिकार बनू नका. इतकीच विनंती मी तुम्हाला करू शकतो.
मी फार छोटा आहे. उपेक्षित आणि सामजिक दृष्ट्या तिरस्करणीय ठरलेल्या नवबौध्द समाजातून मी आलेलो आहे. मी ना साहेबांच्या जातीचा आहे. ना साधा कार्यकर्ता. पण मला राहवेना. मी प्रचंड अस्वस्थतेतून हे लिहिले आहे. चूक झाली असेल तर मला माफ करा
ऍड अविनाश टी. काले
अकलूज
9960178213