गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता

गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराची सांगता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
नवी दिल्ली येथून
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 12/02/2025 :
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि. 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ‘युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी’ या थीम अंतर्गत श्री चक्रेश्वर माध्यमिक विद्यालय चाकोरे येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न झाले. या शिबिराचा समारोप समारंभ बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संग्रामनगर गट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. मंगलताई वाघमोडे होत्या. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे होते.
याप्रसंगी श्री चक्रेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रणजीतसिंह पवार तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले, खंडप्पा कोरे, रमजान शेख व राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील स्वयंसेविका उपस्थित होत्या.
सात दिवसीय शिबिराप्रसंगी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘संरक्षित अन्नपदार्थ’ या विषयावर डॉ. जयशीला मनोहर यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली . भरतकाम व थ्रेड ज्वेलरी या विषयावरील कार्यशाळेत डॉ. राजश्री निंभोरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच वस्त्रशास्त्र विभागाच्या आर्टिकल्सच्या प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. ‘केक व डेकोरेशन’ याविषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नेहा गायकवाड हिने चॉकलेट केक, बेस व ब्लॅक फॉरेस्ट केक याविषयीचे प्रात्यक्षिके दाखवली. चाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘आरोग्य व आहार’ जनजागृती करिता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य व आहार विषयक पोस्टर लावण्यात आले . किशोरवयीन मुलींसाठी रक्तक्षय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. तसेच रक्तक्षय विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी तज्ञ म्हणून डॉ. अमित घाडगे यांनी मार्गदर्शन केले. ‘डिजिटल लिटरसी’ विषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बालकांसाठी सृजनात्मक व मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. यासाठी डॉ. छाया भिसे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच घरगुती वापरासाठीच्या गॅसची सुरक्षितता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उत्कृष्ट एन.एस.एस. स्वयंसेवक सत्यजित चव्हाण यांनी विद्यार्थिनींना ‘एन.एस.एस. व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पाण्याचे महत्त्व, फूड वेस्टेज , मोबाईलचा अतिरेक व बेटी बचाव या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच जलसंरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षणाचे महत्त्व, बालविवाह प्रतिबंध, डिजिटल लिटरसी या विषयावर जनजागृती रॅली, विद्यालय परिसरात वृक्षारोपण व परिसर स्वच्छता इत्यादी उपक्रम स्वयंसेविकांच्या सहभागाने राबविण्यात आले.
सदर शिबीर महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती भोसले यांनी केले. सूत्रसंचलन कु. आकांक्षा फराडे आणि आभारप्रदर्शन कु. मुस्कान शेख हिने केले.