ज्यांना स्वतःचे गाव नाही घर नाही आयुष्याचा सात बारा कोरा त्यांचे आरक्षणाचे काय ?

ज्यांना स्वतःचे गाव नाही घर नाही आयुष्याचा सात बारा कोरा त्यांचे आरक्षणाचे काय ?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 24/10/2023 :
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर ही ज्या उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटकांना आजही स्वतःचे गावं नाही घर नाही ते कसे जीवन जगत असतील ? ज्यांच्या आयुष्याचा सातबारा कोरा आहे त्या समाज घटकांना आरक्षण न्याय हक्क स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. पण ते दोन वेळच्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची अर्धी लढाई सुरू आहे. गेली पंच्याहत्तर वर्षे या देशात, राज्यात ते स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून इथे वास्तव्य करून आहेत. भटकंती करत गावोगावी फिरून उदरनिर्वाह करतात त्यामुळे त्यांना ना हक्काचं घर ना वावर. टिचभर पोटासाठी व वीतभर लज्जा रक्षणासाठी आयुष्य पणाला लाऊन आजही त्यांचे जीवन म्हणजे पशू समान आहे. अशा दुर्लक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी कोणतेच सरकार कोणताच सामाजिक राजकीय नेता पुढे येत नाही, आलेला नाही. मतांचा जोगवा मागण्यासाठी दर पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते झोपडपट्टीत, पालांवर त्यांचे उंबरे झिजवतात. मतांच्या मोबदल्यात दारू मटण चिकन व काही पैसे देऊन तात्पुरते सहकार्य करुन निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना गोंजारले जाते. आमिष दाखवले जाते. पण ते तेवढया कालावधी पर्यंत पुन्हा या घटकांचा कोणी विचारही करत नाहीत आज आरक्षणावरुन मोठे वादळ आले आहे. ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्या शिवाय ते जगू शकत नाहीत तो घटक गप्प आहे. त्यांचा आवाज बंद आहे त्यांना नेता नाही त्यांना कोणाचा आधार नाही. या दुर्लक्षित उपेक्षित घटकांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य स्वाभिमान, हक्काचे घर, स्वतःची जागा नाही. त्या लोकांसाठी काहींचं केले नाही. कोणीच त्या साठी पुढं येत नाही. आणि भारत महासत्ता होण्याची स्वप्ने पहात आहे. महासत्ता व्होवो न व्होवो पण या देशातील असाही एक समाज घटक आहे त्यांना पोटासाठी चोरी करावीं लागते. रस्त्यावर रहावं लागतं. शिक्षण घेता येत नाही. अशा उपेक्षित घटकांना स्वतःला हक्काचे गाव, पक्की घर, शिक्षण, नोकरी दिली पाहिजे. अशा समाज घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना त्यांचे हक्क स्वातंत्र्य दिलं तरच त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. ज्यांचे कडे घरदार, थोडीफार जमीन आहे, गावांत प्रतिष्ठा, सत्ता, नाव आहे असा समाज एकत्र येऊन ते मागास समाजाला असणारे आरक्षण मागायला रस्त्यावर उतरला आहे. पण ज्यांचे कडे पिढ्यान् पिढ्या काहीच नाही. पोट भरण्यासाठी आयुष्याची निम्मी लढाई भटकंती करण्यात गेली ते त्यांचे हक्काचे आरक्षण मागण्यासाठी तोंडावर चिकटपट्टी लाऊन आहेत. याला कारण इथली समाजव्यवस्था. गलिच्छ राजकारण. पैशाचा वापर करून मतं मागुन निवडणूक जिंकणे. घट्ट जातीयवाद, कर्मठ रुढी, परंपरा यामुळे लोकशाहीत सर्वच यंत्रणा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे बळी तो कान पिळी या न्यायाने गावपातळी ते शहर राज्यपातळीवर धटिंगण ठोकशाही व्यवस्था हस्ते पर हस्ते व अघोषित मुजोर व्यवस्था असणारी दडपशाही मुळे सर्वसामान्य गोरगरीब मागास घटकांना न्याय मिळत नाही. त्यांची भटकंती वणवण सुरूच आहे. त्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या, विकास प्रगती आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले काही नाही. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर ही जर या देशातील राज्यातील गोरगरीब मागासवर्गीय समाजातील लोकांना त्यांचे हक्काचे घर जागा जमीन शिक्षण व हक्क मिळत नसतील तर त्यांनी या स्वातंत्र्याचा अर्थ काय लावायचा असे जर दुर्दैवाने त्यांनी इथल्या राज्यकर्त्यांना विचारला तर काय चुकीचे आहे.
बी टी शिवशरण.