ईव्हीएम’च्या बॅटरीवर वंचितला संशय; यंत्राचे चार्जिंग कसे करतात? चार्जिंगच्या माध्यमातून घोळ!
ईव्हीएम’च्या बॅटरीवर वंचितला संशय; यंत्राचे चार्जिंग कसे करतात? चार्जिंगच्या माध्यमातून घोळ!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
> माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर
मुंबई दिनांक 08/12/2025 :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीतील मतदानात ‘ईव्हीएम’ यंत्राचा वापर केला आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान झाले, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. सर्व ठिकाणची मतमोजणी एकत्रित २१ डिसेंबरला केली जाईल. तोपर्यंत ‘ईव्हीएम’ची बॅटरी चार्ज राहणार आहे का? यंत्राचे चार्जिंग करण्यासाठी काही यंत्रणा आहे का? असे प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.
नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान झालेले यंत्र सरकारी गोदामात जमा झाले आहेत. ‘ईव्हीएम’मधील बॅटरीची चार्जिंग कशी करणार आणि त्यासाठी काय यंत्रणा आहे? असा प्रश्न निर्माण होतो. ‘ईव्हीएम’ या इलेक्ट्रॉनिक्स यंत्राचे चार्जिंग आवश्यक असते. निवडणूक प्रक्रियेमध्ये ‘ईव्हीएम’ चार्जिंगची कुठेही नोंद होत नाही. या चार्जिंगची व्यवस्था निवडणूक विभागाने काय केली, हे स्पष्ट नाही. प्रशासनाने चार्जिंग संदर्भातील भूमिका व त्याची प्रक्रिया स्पष्ट करावी, अशी मागणी डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली आहे. योग्य चार्जिंग नसल्यास यंत्रातील नोंदीवर प्रश्न निर्माण होतो. त्यातूनच देशामध्ये संशयास्पद वातावरण तयार होते. चार्जिंगच्या माध्यमातून घोळ होण्याची १०० टक्के शक्यता असल्याचे ते म्हणाले.
‘ईव्हीएम’ यंत्रात ७.५ ते ८ व्होल्ट बॅटरी पॅक वापरला जातो. बॅटरी व्होल्ट ७.४ ते ८ दरम्यान असते, त्यावेळी ईव्हीएम यंत्र ९९ चार्ज दाखवते. बॅटरी पुरेशी असल्याचा तो प्रशासकीय संकेत असतो. बॅटरी ७.४ व्होल्ट पेक्षा कमी होते, तेव्हा वास्तविक चार्जिंग दाखवली जाते. ९९ टक्के बॅटरी दाखवत असली तरी त्यावरून वापरण्यायोग्य वेळेचा अंदाज बांधणे चुकीचे ठरू शकते. ९९ टक्के बॅटरी म्हणून यंत्राने नीट काम केले किंवा मतगणना प्रभावित झाली नाही, असे सांगणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचा दावा वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.
यंत्रातील बॅटरीच्या चार्जिंगची व्यवस्था स्थानिक पातळीवर नसून, ५.८ व्होल्टपेक्षा कमी व्होल्ट झाल्यास बॅटरी बंद होते. मात्र, तरीही बॅटरी ९९ टक्के चार्जिंग दाखवते, यासंदर्भात आक्षेप असल्याचे ते म्हणाले. यावेळी वंचित आघाडीचे प्रदेश पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. वंचितने ईव्हीएम यंत्राच्या बॅटरीवरही संशय व्यक्त केला आहे.

