ताज्या घडामोडी

मेळावे की नळावरील भांडणे?

संपादकीय…………….✍️

मेळावे की नळावरील भांडणे?

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 22/06/2025 :
सध्या राज्यातील राजकारण हे पार रसातळाला गेले आहे. ज्या महान राष्ट्राच्या संस्कृतीचे, परंपरांचे, इतिहासाचे गोडवे गाताना शब्द अपुरे पडू लागतात त्याच महाराष्ट्रात आता अनाचार, अनागोंदी,भ्रष्टाचार, पराकोटीला तर गेलाच आहे. राजकीय नेते एकमेकांना जाहीर सभांमधून शिव्यांची वाखोली वाहताना दिसत आहेत. मेळावे, सभा, बैठका यातून राज्याच्या विकास, धैर्य, धोरणे यांवर चर्चा होण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. या सर्व गोष्टींकडे पाहिले तर राज्यातील सर्व प्रश्न मिटले असून, आता केवळ राजकीय पक्षांची तोडफोड, प्रवेश सोहळे यांनाच राज्यात महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी खासदार, आमदारांपासून नगरसेवकापर्यंत फिल्डिंग लावली जात आहे. आज एका व्यासपीठावर दिसणारे नेते उद्या कोणत्या व्यासपीठावर दिसतील याचा अंदाज आता राजकीय तज्ज्ञांनाही लावता येत नाही. राज्यातील राजकारण सूत्रांची माहिती अन् गौप्यस्फोटात गुरफुटून गेले आहेत. कधी पक्षीय एकत्रीकरणासाठी मुलाखतीतून टाळी देणारे दुसऱ्याच क्षणी त्याला खो देताना दिसत आहेत. राष्ट्रहित, पक्षीय हित यापेक्षा स्वहिताला महत्त्व दिले जात आहे. राज्यात ज्या दोन पक्षांचे विभाजन झाले, त्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे वर्धापन दिन मेळावे दहा दिवसांच्या अंतराने पार पडले. या दोन्ही पक्षांचे हे मेळावे निवडणूक व एकत्रीकरणाच्या चर्चेमुळे खास ठरतील, असे वाटत होते. या मेळाव्यात एकत्रीकरणावर चर्चा अथवा मंथन होईल असे वाटत होते; परंतु असे काही न होता या दोन्ही पक्षांचे वर्धापन दिन मेळावे व राजकीय उणीदुणी काढण्यातच खर्ची झाले. या दोन्ही पक्षांना आपसांत लढवणारे मात्र या सर्व गोष्टींचा आनंद लुटत आहेत. राज व उद्धव ठाकरे या दोन बंधूमधील कटुता मिटून ते पुन्हा एकत्र येतील या चर्चेने काही दिवसांपासून वेग घरला आहे. मात्र, पुढाकार कोणी घ्यायचा यावरून ही चर्चा आडली आहे की, भविष्यात वेगळी रणनीती आखली जात आहे याबाबत संभ्रम आहे. राज अन् उद्धव हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात. काका अन् पुतण्याने एकत्र येण्यास काय हरकत आहे, अशी दुसरी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. या दोन्ही पक्षांचे वर्धापन दिन मेळावे झाले; परंतु याबाबत या दोन्ही पक्षांच्या व गटांच्या नेत्यांनी याबाबत जाहीरपणे बोलणे टाळलेच. मात्र, कार्यकर्त्यांची मतेदेखील जाणून घेतलेली दिसत नाहीत. पक्षनेतृत्व आता आपल्या नेत्यांना व कार्यकत्यांना विचारात न घेता गृहीत धरते, याचा हा परिणाम म्हणावा लागेल. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-मनसे हे पक्ष एकत्र येतील हा केवळ भ्रमनिरास म्हणावा लागेल. आता सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. फोडाफोडीचे राजकारण रंगले आहे. त्यात आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील ही कल्पना धूसरच म्हणावी लागेल. राज ठाकरे शिवसेना-मनसे एकत्रीकरणाबाबत पुढाकार घेतात व आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला, असे सांगून बैठका मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतात. शरद पवार, सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा निर्णय कार्यकर्त्यांवर सोपवतात. पण मेळाव्यातून यावर बोलणे टाळतात. शरद पवारांनी तर आता भाजपासोबत जाणाऱ्यांशी कदापि युती करणार नाही, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकत्रीकरणाचा हा प्रयत्न औटघटकेचाच ठरला आहे. एकाच पक्षाचे दोन-दोन मेळावे होऊनही कार्यकर्त्यांना नवा विचार मिळत नसेल तर त्यांचा वैचारिक गोंधळ वाढणारच आहे. पक्षीय वर्धापन दिनाबरोबरच शिवसेनेने दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार, याची उत्सुकता शिवसैनिकांना असायची. कारण त्यांना या मेळाव्यातून विचारांचे सोने लुटायला मिळायचे. ३० ऑक्टोबर १९६६ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनले. त्याला आता साठ वर्षे पूर्ण होतील. एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान हे शिवसेनेच्या या मेळाव्याचे वैशिष्ट्य होते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क या दोघांचा जन्म एकाचवेळी झाला. शिवाजी पार्कला पूर्वी माइन पार्क संबोधले जात होते. १९२७ साली या मैदानाचे नाव शिवाजी पार्क ठेवण्यात आले. याच वर्षी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता. मात्र, ज्याप्रमाणे नेते पळवले त्याप्रमाणे शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी हे मैदानदेखील हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला. वर्धापन दिन मेळाव्यांप्रमाणे या मेळाव्यांतूनदेखील आता विचारांऐवजी टीकेचे सूर उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे वर्धापन दिन मेळावे पाहिले तर ते दोन्ही पक्ष आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांविरोधात बोलताना दिसले. हे राजकारणातील दुर्मिळ चित्र म्हणावे लागेल. हे दोन्ही पक्ष आपल्या राजकारणाची दिशा हरवून बसलेले दिसतात. कार्यकर्त्यांना नवा विचार देण्याऐवजी कम ऑन किल मी, मरे हुए को क्या मारना, असे फिल्मी डॉयलॉग मारताना दिसतात. पक्ष फुटल्याने या नेत्यांचे विचारदेखील खुंटले आहेत. त्यांच्या या अशा फिल्मी मेळाव्याचा आता कंटाळा येऊ लागला आहे. देशातील, राज्यातील राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक विषयावर बोलणे तर सोडाच, पण पक्षवाढीसाठी विचारमंथनही होताना दिसत नाही. स्वहितापुढे या नेत्यांना आता राज्यातील बेरोजगारी, महागाई, गुंडगिरी, अत्याचार, शेतकरी व कामगारांचे प्रश्न दिसत नाहीत. ते आता कार्यकर्त्यांना काय विचार देणार? खरेतर राजकीय मेळावे हे सोहळे होणे गरजेचे आहे. या मेळाव्यांतून कार्यकर्त्यांना, नेत्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. समाजात जाऊन लढण्यासाठी नवा विचार मिळाला पाहिजे; परंतु सध्याचे मेळावे हे सार्वजनिक नळांवर होणाऱ्या भांडणाप्रमाणे उणीदुणी काढण्याचे व्यासपीठ बनत चालले आहे. कार्यकर्त्याला पक्षकार्य करण्यासाठी नवा विचार, रणनीती हवी असते. पक्षाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवून तो पक्षाला राजमान्यता मिळवून देतो; परंतु येथे विचारच मिळत नसेलत तर कार्यकर्ते सैरभैर होणार अन् विशिष्ट विचारसरणी असणाऱ्या पक्षांशी घरोबा करणार! त्यासाठी मेळावे, बैठका यातून विचारमंथन होणे गरजेचे आहे. तरच कार्यकर्ते धावतील अन् पक्ष वाढतील, अन्यथा त्यांच्यात नैराश्य निर्माण होऊन पक्ष लयाला जातील.साभार.चंद्रशेखर शिंपी सहसंपादक दै. गावकरी
9689535738

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button