ठाकरे गटाची एक्सपायरी डेट राऊतांनी जवळ आणली आहे

ठाकरे गटाची एक्सपायरी डेट राऊतांनी जवळ आणली आहे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 03/01/2024 : माकडाच्या हाती कोलीत दिलं की काय होतं याचं मुर्तीमंत उदाहरण द्यायचे झाल्यास ते उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या तिजोरीवर ताव मारत त्यांचीच त्यांच्या कळत नकळत जिरवणारे विश्व प्रवक्ते खासदार अर्थात सतत ‘ मंगेरीलाल के हसीन सपने’ अशा तोऱ्यात जगणारे संजय राऊत यांचे देता येईल. या नेत्याला उध्दव ठाकरे यांनी नको तितकं अधिक महत्त्व देऊन आता उध्दव यांनी आपलंच राजकीय अवमुल्यन करून घेऊन उरल्या सुरल्या ठाकरे गटाची एक्सपायरी डेट जवळ आणली असून येत्या लोकसभा निवडणुकीनंतर हा गटच राज्याच्या राजकारणातून पुर्णपणे नाहीसा होऊन या गटाला या निवडणुकीत जेमतेम दोन ते तीन खासदारांच्या संख्याबळावर समाधान मानावे लागले यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे कधीच कुणी माकडाच्या हातात कोलीत देऊ नये. कारण ते इकडून तिकडे कोलांट्या उड्या मारत सगळी लंका पेटवण्यात तरबेज असतं हा इतिहास आहे.
लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या असताना शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजही मातोश्रीवर बसून काॅंग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांचा घोषा करत ठाकरे गटाच्या कटोऱ्यात लोकसभेच्या जागांची अक्षरशः भिक मागत आहेत. त्यासाठी ते “आता गल्लीत गोंधळ घालत दिल्लीत मुजरा करायला जाणार आहेत”. पण या मुजऱ्याचा मुहूर्त अद्याप ठरला नाही. अर्थात तो मुहूर्त ठरे पर्यंत कदाचित लोकसभेचा निकाल लागू नाही म्हणजे मिळवले. कारण असाच उध्दवजी यांचा आजवरचा कारभार आहे. अशा तकलादू कारभारामुळे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या डोक्यातून आलेल्या मुंगेरीलाल स्वप्नांना पंख फुटू लागले आहेत. त्यामुळे ते आजकाल मनाला वाटेल ती आणि वाटेल तितकी बाष्कळ बडबड राजरोसपणे करून ठाकरे गटाला पुरते गोत्यात आणत नाही तर राजकीय खड्यात घालत आहेत. पण त्यावर उध्दवजी यांचा अजिबात अंकुश नाही. याचा अर्थ ठाकरे यांनी आपला गट राऊतांच्या दावणीला बांधून ठेवला आहे का ॽ
याच मुंगेरीलाल यांनी परवाच ठाकरे गट लोकसभेच्या एक दोन नव्हे तर तब्बल तेवीस जागा लढवणार आहे अशी मुक्ताफळे उधळत “सुंभ जळाला असला तरी पिळ कायम” असल्याची आठवण करून दिली. अर्थात अशी मागणी करणे गैर नाही पण आपण आघाडीच्या राजकारणात आहोत. त्यात काही साधन सुचिता असते. याच भान विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना जसे उरले नाही तसे ते काॅंग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील उरले नाही. त्यामुळे त्यांनी तर काॅंग्रेसचा सव्वीस जागांचा दावा कायम आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकुण जागा अठ्ठेचाळीस आणि या दोन पक्षांची अर्थात नेत्यांची मागणीची संख्या होते एकाने जास्त मग शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसने काय चिपळ्या वाजवायच्या का ॽ असा सारा वेड्यांचा बाजार आहे .
उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी संपूर्ण शिवसेनेची विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या नादाला लागून आणि सतत सिल्व्हर
ओकच्या पायऱ्या झिजवून पुरती वाट लावली त्यामुळे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नकाशी सर सुध्दा ‘ ‘माझा बाप पळवला ‘ म्हणून सतत टाहो फोडणाऱ्या उध्दवजी यांना येणार आहे का ॽ कारण बाळासाहेब कधीच शरदचंद्र पवारसाहेब यांच्या घरी गेले होते का ॽ याचा विचार उध्दवजी यांनी केला नाही. त्यामुळे ते पवारसाहेबच काय तर आता गल्लीत गोंधळ घालत घालत सोनियाजी गांधी यांना मुजरा घालण्यासाठी ऐनकेन प्रकारे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात. ही यांची हिंदूंच्या रक्षणासाठी धावणारी शिवसेना ! इतकं होतं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासकीय कामासाठी दिल्लीला गेले की हेच ठाकरे पितापुत्र आणि त्यांचे चेले की ज्यांनी ठाकरे गट हायजॅक करून त्याची एक्सपायरी डेट जवळ आणली आहे ते खासदार संजय राऊत सातत्याने मिंधे चालले मुजरा करायला अशी अखंड बोंबाबोंब करत असतात. या साऱ्याचा एकच अर्थ उध्दवजी ठाकरे यांनी आपली शिवसेनेवर असलेली कमांड कधीच घालवून आता लोकसभा निवडणुकीत तिकीटाची डिमांड करण्यात काय अर्थ आहे असो , अशा गोष्टी मनाला यातना देतात म्हणून काहीवेळा परखड मत मांडून व्यक्त व्हाव वाटत. यात काय मनस्वी आनंद होतो असे अजिबात नाही .
राजाभाऊ त्रिगुणे .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक