कावीळ म्हणजे काय ?
कावीळ म्हणजे काय ?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 5/7/2023 :
कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.
कावीळ हे यकृत विकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते. आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.
दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच ‘लिव्हर सिर्हाॅसिस’ असे म्हणतात. सिर्हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो. अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.
कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.
शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.