ताज्या घडामोडी

पत्रकारिता : माज नव्हे, तर अंतरात्म्याची कसोटी

पत्रकारिता : माज नव्हे, तर अंतरात्म्याची कसोटी

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 13/12/2025 : पत्रकारीता प्रत्येक पत्रकार करतो, असे सर्वांनाच वाटते. किंबहुना, “मीच निष्पक्ष, मीच प्रामाणिक” असा दावा प्रत्येकजण सहज करतो. पण वास्तव असे आहे की वाटणे आणि करणे यामध्ये प्रचंड अंतर असते. स्वतःला प्रामाणिक समजणे सोपे असते; मात्र प्रामाणिक राहणे हे कठीण, धोकादायक आणि अनेकदा वेदनादायी असते. म्हणूनच पत्रकाराने सर्वप्रथम स्वतःच्या अंतरात्म्याला प्रश्न विचारायला हवा — आपण खरंच निष्पक्ष आहोत का? की केवळ तसे वाटून घेत आहोत?
आजच्या काळात पत्रकारीतेचा अर्थ अनेकदा चुकीच्या पद्धतीने समजला जातो. माइक हातात घेतला, कॅमेरा समोर उभा राहिलो, चार बातम्या लिहिल्या म्हणजे आपण पत्रकार झालो — अशी एक धोकादायक समजूत रूढ होत आहे. परंतु पत्रकारीता म्हणजे केवळ बातमी देणे नाही, तर सत्याच्या बाजूने उभे राहणे होय. आणि सत्याच्या बाजूने उभे राहणे हे नेहमीच सत्तेला, व्यवस्थेला किंवा ताकदवानांना सोयीचे असतेच असे नाही.
पत्रकारीता हे क्षेत्र कुणासाठीही सोपे नाही. हे एसी ऑफिसमधले सुरक्षित काम नाही. अनेकदा जीव मुठीत धरून काम करावे लागते. धमक्या, दबाव, आर्थिक आमिषे, सामाजिक बहिष्कार, बदनामीचे षड्यंत्र — हे सगळे पत्रकाराच्या वाट्याला येते. तरीही जो पत्रकार सत्य सोडत नाही, तोच खरा पत्रकार. बाकी सगळे केवळ माहिती वितरक किंवा सत्तेचे प्रवक्ते ठरतात.
एक मोठा गैरसमज असा आहे की “मलाच सगळं कळतं, मीच हुशार, बाकी सगळे चुकतात”. ही अहंकाराची भावना पत्रकाराला नकळत गिळून टाकते. अहंकार हा पत्रकारीतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण अहंकार आला की ऐकण्याची क्षमता संपते, प्रश्न विचारणे थांबते आणि मग सत्याऐवजी मतप्रचार सुरू होतो. पत्रकाराने नेहमी शिकत राहिले पाहिजे, शंकाशील राहिले पाहिजे आणि स्वतःलाच तपासत राहिले पाहिजे.
पत्रकारीता कधीच माजाने परिपक्व होत नाही. उलट माज आला की पत्रकारीता अधःपाताकडे जाते. परिपक्व पत्रकारीता ही संवेदनशीलतेतून जन्माला येते. समाजातील शेवटच्या घटकाच्या वेदना समजून घेणे, आवाज नसलेल्यांचा आवाज बनणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे — ही संवेदनशीलता नसली तर पत्रकार केवळ शब्दांचा व्यापारी ठरतो.
याच वेळी, पत्रकारीता म्हणजे फक्त भावुक होणेही नव्हे. ती आक्रमक लेखनी शैली स्वीकारते — पण ती आक्रमकता व्यक्तिगत द्वेषातून नाही, तर अन्यायाविरुद्ध असते. भ्रष्टाचार, शोषण, दडपशाही यावर बोट ठेवताना शब्द धारदार हवेत. पण ती धार तथ्यांवर आधारित असली पाहिजे, पुराव्यांनी समर्थित असली पाहिजे. अन्यथा आक्रमकता बदनामीत बदलते आणि सत्य बाजूला पडते.
आदर आणि सन्मान हीदेखील पत्रकारीतेची महत्त्वाची मूल्ये आहेत. विरोध करतानाही भाषा सुसंस्कृत असावी, प्रश्न कठोर असले तरी माणुसकी जपली पाहिजे. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून इतरांचा अपमान करणे ही पत्रकारिता नव्हे, तर अहंकारी बडबड आहे. पत्रकाराला समाजाने एक विश्वास दिलेला असतो; तो विश्वास जपणे ही त्याची नैतिक जबाबदारी आहे.
आज माध्यमांच्या जगात ‘गोदी पत्रकारिता’, ‘पेड न्यूज’, ‘एजेंडा पत्रकारिता’ अशा संज्ञा प्रचलित झाल्या आहेत. यामागचे कारण म्हणजे अनेकांनी पत्रकारीतेला व्यवसाय समजून त्यातील मूल्ये बाजूला ठेवली. जाहिरातदार, राजकीय पक्ष, कॉर्पोरेट हितसंबंध यांच्यापुढे नतमस्तक होऊन जेव्हा बातम्या लिहिल्या जातात, तेव्हा समाजाचा पत्रकारांवरील विश्वास तुटतो. आणि हा तुटलेला विश्वास पुन्हा मिळवणे फार अवघड असते.
खरा पत्रकार हा कोणाचाही प्रवक्ता नसतो — तो जनतेचा प्रतिनिधी असतो. तो सत्तेला प्रश्न विचारतो, व्यवस्थेला आरसा दाखवतो आणि समाजाला विचार करायला भाग पाडतो. यासाठी त्याला अनेकदा एकटे पडावे लागते. सहकारी दूर जातात, संस्थाच पाठ फिरवते, आर्थिक संकट उभे राहते. पण तरीही जो सत्य सोडत नाही, तोच पत्रकारितेचा खरा वारसदार ठरतो.
पत्रकारीता ही केवळ नोकरी नाही, ती एक ध्येयवृत्ती आहे. ती रोज स्वतःशी झगडायला लावते. आज मी सत्याच्या किती जवळ होतो? आज माझ्या लेखणीने कुणाला न्याय दिला? आज मी कुणाच्या दबावाखाली वाकलो का? — असे प्रश्न स्वतःला विचारण्याची तयारी ज्याच्याकडे आहे, तोच पत्रकार दीर्घकाळ टिकतो.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, पत्रकारीता ही स्वतःची स्तुती करण्यासाठी नव्हे, तर समाजाचा आरसा होण्यासाठी असते. माजाने नव्हे, तर नम्रतेने; भीतीने नव्हे, तर धैर्याने; स्वार्थाने नव्हे, तर संवेदनशीलतेने केली गेली तरच पत्रकारीता परिपक्व होते. अन्यथा ती केवळ शब्दांचा गोंगाट बनून इतिहासात हरवते.
✍️…nilesh thakre
8668935154
राष्ट्रीय संघटक
पुराेगामी पत्रकार संघ ( भारत)
✍🏻🟣

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button