ताज्या घडामोडी

अग्निदिव्य

अग्निदिव्य

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 09/12/2025 :
गांधींचा खून करता येतो. पण, गांधींना प्रातःस्मरणीय मानल्याशिवाय आणि गांधींचा आदर्श सांगितल्याशिवाय पंतप्रधान होता येत नाही. ही या देशाची खासियत आहे!
गांधींच्या या वाटेवरून हमखास चालणारी आणि जगात काही झाले, इकडचे जग तिकडे झाले, तरी त्या मूल्यात्मकतेला जिवापाड जपणारी खात्री म्हणजे सोनिया गांधी.
कमला हॅरिस आणि जेसिंडा अर्ड्रनच्या कथांमध्ये रमणार्‍यांनी ‘सोनिया गांधी’ नावाची यशकथा कधीतरी नीट समजून घ्यायला हवी.
विरोधात असताना ही बाई सगळा विरोध एकटीनं अंगावर घेते आणि सत्तेत असताना, त्या सत्तेचा वाराही स्वतःला लागू न देता इतरांना सिंहासनावर बसवते. तिला विदेशी ठरवून ज्यांनी तिची साथ सोडली, त्यांना अखेरीस तिच्या क्षमाशीलतेनंच सत्ता मिळू शकली. तिच्यावर नको ती टीका करणार्‍या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठीही तिच्याच होकाराची वाट पाहावी लागली.
आपल्या नवर्‍याच्या मारेकर्‍यांनाही माफ करणारी ती मुळातच क्षमाशील. खरा भारत समजलेली बाईच हे करू शकते. तिला राम समजला, कृष्ण समजला, बुद्ध समजला, पैगंबर समजला, येशू समजला, गुरू नानक समजला, कबीर समजला. गांधींचा आतला आवाज समजला.
म्हणून, तिचं वैर ना कोणा व्यक्तीशी, ना कोणा पक्षाशी.
मूल्यांसाठी हा अग्निपथ ती चालत राहिली.
सत्तेत असताना राजकारणाकडं न फिरकलेली ती, सत्ता गेल्यावर मात्र शर्थीची झुंज देत राहिली. ज्या मूल्यांसाठी ती लढत राहिली, तोच या देशाच्या राजकारणाचा मुख्य स्वर व्हावा, यासाठी प्राणपणाने चालत राहिली.
सत्तेसाठी भुकेलेल्या दिल्लीने मूल्यांसाठीचा असा लढा यापूर्वी कधीच पाहिला नसेल. ‘सत्ता दिसते आहे, ती ताब्यात घ्या’, असे आर्जव कोणाला केले जात आहे आणि तरीही ती व्यक्ती निरिच्छपणे त्या प्रस्तावाकडे पाहाते आहे, हे दिल्ली नावाच्या इतिहासाने पहिल्यांदाच पाहिले असेल. कारस्थानांचा मुक्काम असलेल्या दिल्लीने गेली तीन दशके पाहिलेली लढाईच अद्भुत आहे.
आज तिच्या हातात वय नाही. पण, लढाई संपलेली नाही.
अर्थात, असे अनेक खाचखळगे, टक्केटोणपे, विखार तिनं पाहिलेत. संस्कृतीच्या नावाखाली झालेले असंस्कृत वार झेललेत. त्यामुळं ती हिंमत हरणार नाही.
सोनिया,
तुम्हाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला, त्यांनाही अखेर तुमच्यासोबत यावे लागले. कारण, तो रस्ता कठीण असेल, पण तोच ‘आयडिया ऑफ इंडिया’च्या दिशेनं जाणारा आहे.
आज तुम्हाला जे विरोध करताहेत, त्यांच्याही पुढच्या पिढ्यांच्या घरात आणि मनात तुमचीच प्रतिमा असणार आहे. कारण, ती या देशाची प्रतिमा आहे. ही प्रतिमा प्राणपणानं तुम्ही जपली आहे.
माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी तुम्ही आजवर जे काही सोसले आहे, त्यासाठी मी कृतज्ञ आहे.
आणि, तुम्हाला एक व्यक्ती म्हणून, त्यातही एक महिला म्हणून जे सोसावे लागले, त्याबद्दल आम्ही सारेच तुमचे गुन्हेगार आहोत!
खात्री आहे.
तुमचे हे अग्निदिव्य वाया जाणार नाही. कारण, हा गांधींचा देश आहे. नथुरामाचा नाही. हा नेहरूंचा देश आहे, नेहरूंना बदनाम करणार्‍यांचा नाही. हा भीमाचा देश आहे. ‘कोरेगाव भीमा’ दंगल घडवणार्‍यांचा नाही.
होय! हा सोनियांचा देश आहे.
आणि, या देशाला तुम्ही हव्या आहात.
दीर्घकाळ हव्या आहात!

संजय आवटे

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button