तुम्हालाही खूप पाणी प्यायल्यावर सतत लघवी येते? मग शरीर हायड्रेड ठेवायचं तरी कसं?
हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र
तुम्हालाही खूप पाणी प्यायल्यावर सतत लघवी येते? मग शरीर हायड्रेड ठेवायचं तरी कसं?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 01/12/2025 :
पाणी हे जीवन आहे; त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा प्रत्येक जण आपल्याला पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण, जास्त पाणी प्यायल्यावर शरीर हायड्रेट राहणे दूर सतत लघवी होत राहते. ही समस्या आपल्यातील अनेकांना जाणवते. तर असं होऊ नये म्हणून नक्की काय करता येईल? याचबद्दल आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
तर याबद्दल आहारतज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ यांनी एका यूट्यूब व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, “जेव्हा तुम्ही साधे पाणी पिता तेव्हा ते तुमच्या शरीरातून खूप लवकर बाहेर निघून जाते. त्यामुळे फक्त साधं पाणी पिल्याने शरीराच्या पेशींना पुरेसं हायड्रेशन मिळत नाही. याउलट जर तुम्ही पाण्यात पुदिन्याची पाने, लिंबू, घातलं तर त्यात सोडियम (मीठ) येतं. त्यामुळे पाणी शरीराच्या पेशींमध्ये जास्त वेळ टिकतं आणि तेव्हाच शरीर आतून खऱ्या अर्थाने आतून हायड्रेट राहते. त्यामुळे सतत लघवी सुद्धा होत नाही. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत साध्या पाण्याऐवजी डिटॉक्स वॉटरचे सेवन करण्याचा विचार करा; यामुळे शरीर हायड्रेट राहते”.
याबद्दल अधिक जाणून जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने मुंबईतील चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉक्टर भाविन पटेल यांच्याशी चर्चा केली. याबद्दल त्यांनीही सहमती दाखवत म्हंटले की, २-३ लिटर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड होत नाही हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पाण्यात काय मिक्स करता यावरही हायड्रेशनची पातळी अवलंबून असते.
हायड्रेटेड राहणे आवश्यक असले तरी, हायड्रेशनचा प्रकार आणि पद्धत या गोष्टींचा शरीरावर चांगला परिणाम होतो. तुम्ही पॉवर-पॅक्ड डिटॉक्स वॉटरचे देखील सेवन करून पाहू शकता; जे तुम्हाला हळूहळू हायड्रेट करते. जसे की, पुदिन्याची पाने, लिंबाचे तुकडे, काकडी, तुळशीची पाने आणि पाणी. हे पाणी केवळ चव देत नाहीत तर पचनास मदत सुद्धा करते आणि पोटफुगी सुद्धा कमी होते. या सर्व पदार्थांमधील घटक हळूहळू पोषक तत्वे, अँटीऑक्सिडंट्स पाण्यात सोडतात; ज्यामुळे तुमचे शरीर द्रवपदार्थ अधिक स्थिरपणे शोषण्यास आणि बराच वेळ हायड्रेटेड राहण्यास मदत करते; असे डॉक्टर पटेल म्हणाले आहेत.
इतर पर्यायांमध्ये नारळ पाणी, बार्लीचे (जवस) पाणी आणि कॅमोमाइल किंवा हर्बल टी यांचा समावेश असतो; जे मूत्राशयासाठी सौम्य असतात आणि तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. कॅफिन आणि कार्बोनेटेड पेये टाळा; ज्यामुळे मूत्राशयात जळजळ निर्माण शकते; असे डॉक्टर पटेल म्हणाले आहेत.
२ ते ३ लिटर पाणी पिल्यानंतर लगेचच लघवीला जावंस वाटणे हे अनेक लोकांमध्ये खूप सामान्य गोष्ट आहे. असं तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही थोड्या वेळात खूप जास्त पाणी पिता किंवा तुमचा मूत्राशय थोडा सेन्सिटिव्ह असतो. त्यामुळे काही जणांना जास्त पाणी लगेचच प्यायल्यावर लघवी होते आणि वारंवार शौचालयाला जावे लागते. त्यामुळे काही जणांना लाज वाटते. त्यामुळे एकदम खूप पाणी पिण्यापेक्षा दिवसभर थोडं-थोडं पाणी पित राहिलात तर सतत लघवी होणे ही समस्या टाळता येते. जर वारंवार लघवी होण्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), अतिक्रियाशील मूत्राशय किंवा मधुमेह यासारख्या आजार होऊ नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरू नका.

