गुरुकुंज मोझरी जाऊ या..!

गुरुकुंज मोझरी जाऊ या..!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 03/10/2025 :
मानवतेचे पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त लाखो गुरुदेव भक्त महाराजांना भगवी टोपी घालून एका रांगेत शिस्तीने उभे राहून दोन मिनिटे मौन श्रद्धांजली अर्पण करतात. तेथे सर्व धर्माच्या प्रार्थना घेतल्या जातात आणि त्यानंतर सामुदायिक प्रार्थना घेतली जाते. गुरुकुंज नगरी “श्री गुरुदेव” च्या घोषाने दूमदूमून निघते. असे वाटते की, ही विदर्भ पंढरी आहे. गुरुकुंज मोझरी हे केंद्र आधुनिक जगाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. या गुरुकुंज आश्रमात कोणालाच मज्जाव नाही. सर्व धर्माचे हे तीर्थक्षेत्र बनले आहे. सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आधुनिक काळातील महान संत म्हणून भारतासह विदेशात ओळख आहे. मी लिहिलेल्या गुरुकुंज मोझरी जाऊ या ! कवितेचा भावार्थ जाणून घेऊ या.
झुक झुक झुक झुक जीवनगाडी ।
वाईटाचा धूर सोडीत गाडी ।
पळती दुःखे पाहू या ।
गुरुकुंज मोझरी जाऊ या ।।
जसे आगगाडी झुक झुक आवाज करीत चालते. तशीच जीवनगाडी जीवनाच्या निरंतर प्रवाही स्वरुपाला सुचित करते. आपली जीवनगाडी नेहमी एकाच मार्गावर चालत नसते तर तिला जीवनातील चढ-उतार आणि अनेक वळणे अनुभवावी लागतात. ह्या जीवनगाडीला जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास करावा लागतो. ही जीवनगाडी वाईटाचा धूर सोडते कारण जीवनात उत्कर्ष साधण्यासाठी प्रगती करण्यासाठी वाईट अनुभव, वाईट सवयी सोडून जीवनात पुढे जाण्यासाठी, यश मिळविण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. आपण गाडीने प्रवास करीत असताना बाहेरची झाडे वेगाने मागे पळत असल्याचे दिसते. आपली जीवनगाडी गुरुकुंज वारी करीत असते तेव्हा आपली सारी दुःखे पळताना दिसतात कारण वारी करताना सुखाचा अनुभव येतो. संत तुकाराम म्हणतात, “अवघे सुखाचे सांगाती । दुःख होता पळती आपोआप ।” जे लोक सुखी असतात त्यांना दुःख येते तेव्हा ते लगेच पळून जातात. गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंताच्या आश्रमातील प्रार्थना मंदिर व समाधीचे दर्शन घ्यायला गुरुकुंज मोझरीला जाऊ या.
राष्ट्रसंत समाधी घेता दर्शन ।
मानवतेची घेऊ या शिकवण ।
जयगुरु जयगुरु बोलू या ।
गुरुकुंज मोझरी जाऊ या ।।
अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन गुरुकुंज मोझरी येथे जाऊन गुरुदेव भक्त घेतात. महाराजांनी केलेल्या कार्याचे आणि त्यांच्या विचाराचे स्मरण होते. राष्ट्रसंतांनी दिलेली मानवतेची शिकवण आत्मसात करु या. मानवता म्हणजे जात, धर्म, वंश किंवा लिंग यासारख्या कोणत्याही भेदभावा शिवाय सर्व माणसांना समान मानणे. केवळ मानवच नाही तर सजीव प्राणी यांच्या प्रती आदर ठेवणे. गुरुदेवाचे अनुयायी त्यांच्या नावाचा उद्घोष करतात. जयगुरु म्हणणे म्हणजे गुरुचे महत्त्व सर्वोपरी मानणे आणि त्यांच्या शिकवणुकीचे पालन करणे. गुरुदेवाचे दर्शन करण्याकरिता गुरुकुंज मोझरी जाऊ या.
रामनामाचे भरुन इंधन ।
साफ करु मनाचे मशिन ।
वाईटाचा मोह सोडू या ।
गुरुकुंज मोझरी जाऊ या ।।
जसे इंधन वाहन चालण्यासाठी ऊर्जा पुरवते त्याप्रमाणे आपल्या जीवनगाडीला रामनामातून मिळणाऱ्या आध्यात्मिक भक्तीने जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रामनाम हे जीवात्म्याला ऊर्जा पुरवणारे इंधन आहे. आपले मन साफ करणारी मनाची मशिन आहे. जसे आपण कपडे स्वच्छ धुतो त्याप्रमाणे मनाची स्वच्छता हवी आहे. वाईट गोष्टीबद्दल वाटणारी ओढ किंवा इच्छा सोडून द्यावी. मोह हा व्यक्तीच्या प्रगतीत अडथळा आणू शकतो. म्हणून आसक्ती आणि वाईट मोह सोडून आपण सर्व गुरुदेव भक्त गुरुकुंज मोझरी जाऊ या.
जीवनगाडी चालत राही ।
आयुष्याची चाके फिरत राही ।
संयमाचा ब्रेक लावू या ।
गुरुकुंज मोझरी जाऊ या ।।
मनुष्य देह हे एक वाहन (गाडी) आहे. जी आत्म्याला जीवनाच्या प्रवासात पुढे घेऊन जाते आणि हे वाहन म्हणजे शरीर स्वतःच्या मालकीचे नसून ते परमेश्वराने दिलेले एक साधन आहे. ही जीवनगाडी चांगल्या मार्गाने चालत राहावी. परमेश्वर ती गाडी कधीही परत घेऊन जाऊ शकते. आयुष्याची चाके जीवनाच्या चक्राला आणि त्यात होणाऱ्या बदलांना दर्शवते. जीवनात नेहमीच एकसारखे दिवस नसतात. कधी आनंद तर कधी अडचणी येतात. स्त्री पुरुष रथाची दोन चाके आहेत व ही दोन्ही चाके जर सारखी मजबूत केली तरच संसाराची गाडी सुखाने पुढे चालत राहील. आयुष्य निरर्थक गेले तर जन्म मृत्यूच्या घाण्यामध्ये तुम्ही बैलासारखे फिरत राहणार. संयमाचा ब्रेक लावायला शिकले पाहिजे. स्वतःच्या भावनावर ताबा ठेवता आला पाहिजे. कठीण किंवा अपेक्षित परिणाम मिळेपर्यंत शांत राहण्याची क्षमता किंवा एखाद्या गोष्टीची वाट पाहण्याची तयारी असावी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरिता गुरुकुंज मोझरीला जाऊ या.
संकटाला सामोरे जाता ।
चांगल्या विचाराचे हँडल धरता ।
बदलती वळणे पार करु या ।
गुरुकुंज मोझरी जाऊ या ।।
संकटाला सामोरे जाणे म्हणजे कोणत्याही कठीण परिस्थितीला आत्मविश्वासाने, धैर्याने तोंड देणे. संकट म्हणजे शेवट नव्हे तर नवीन सुरुवात आहे. वाईट विचारांना दूर करुन चांगल्या विचाराचे हँडल हाती धरावे. चांगल्या विचाराचे हँडल हाती धरणे म्हणजे तुमच्या विचारांवर तुमचे नियंत्रण असणे आणि ते विचार तुम्हाला चांगल्या दिशेने घेऊन जाते. जीवनात अनपेक्षित आणि बदलणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढू या. गुरुदेव भक्तांना गुरुकुंज मोझरी हेच तीर्थक्षेत्र आहे. चला तर गुरुकुंज मोझरी जाऊ या.
कवि/लेखक
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७