⭕गांधी मेले नाहीत, पण आपण दररोज मरत आहोत

⭕गांधी मेले नाहीत, पण आपण दररोज मरत आहोत
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 02/10/2025 :
आज आपण अशा काळात जगतोय, जिथं अहिंसा जी या देशाची आत्मा होती ती सत्तेच्या भीतीसमोर मोडीत निघाली आहे.
लडाखचे सोनम वांगचूक यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केलं. त्यांचा लढा कोणाविरुद्ध होता?
निसर्गाच्या विनाशाविरुद्ध, स्थानिकांच्या हक्कासाठी. त्यांनी हातात शस्त्र नाही, तिरंगा घेतला. त्यांनी हिंसा नाही केली, शांतपणे सत्य सांगितलं. पण सत्तेला अहिंसेचा हा आवाज सहन झाला नाही. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला. ज्याने पर्यावरण, संविधान आणि लोकशाही वाचवण्याचं काम केलं, त्याला गुन्हेगार ठरवणं ही अहिंसेवरील सर्वात मोठी हिंसा आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी शांततेने आंदोलन केलं. महिन्यांमहिने ते दिल्लीच्या सीमेवर बसले. त्यांनी कोणावर दगड फेकले नाहीत, त्यांनी फक्त सरकारला ऐकून घ्या अशी विनंती केली. पण सरकारने उत्तर दिलं लाठीने, अश्रूगॅसने, आणि आरोपांनी शांततेवर हिंसा करण्यात आली, लोकशाहीचा आवाज दाबण्यात आला. ही कोणती लोकशाही? जिथं “जय जवान जय किसान” म्हणणारेच किसानांना देशद्रोही ठरवतात.
पत्रकारांनी प्रश्न विचारले, सत्तेचे भांडाफोड केले —त्यांच्यावर राजद्रोहाचे खटले दाखल झाले. त्यांचे ट्विटर अकाउंट बंद झाले, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. विद्यार्थ्यांनी संविधान वाचलं, समानतेची मागणी केली त्यांना पोलिसांच्या बुटांनी चिरडलं गेलं. जेव्हा शिक्षण आणि पत्रकारिता हे सत्य सांगणं थांबवतं, तेव्हा देश अंधारात जातो आणि आज तो अंधार जवळ आलाय.
हिंसा म्हणजे फक्त गोळी नाही, ती अन्यायाच्या आदेशात असते. ती पोलिसांच्या दंडुकीत असते, ती जनतेच्या भीतीत असते. आज सत्तेचं अहंकार इतकं वाढलंय की “मी सरकार आहे, म्हणून मी बरोबर आहे” हा विचारच हिंसेचं नवं रूप आहे. गांधीजी म्हणाले होते “सत्ता माणसाला अंध करते, अहिंसा त्याला जागं ठेवते” पण आज सत्ता जागी आहे, आणि माणूस झोपला आहे.
अहिंसा मेली की लोकशाही मरते. कारण लोकशाही ही संवादावर जगते,आणि संवाद नेहमी शांततेत होतो.जेव्हा सत्तेने भीती पसरवली, जेव्हा लोकांनी मौन धरलं, तेव्हा लोकशाहीची अंत्ययात्रा सुरू होते. आज प्रश्न फक्त सोनम वांगचूकचा नाही,तो आपल्या विवेकाचा आहे. आज प्रश्न शेतकऱ्यांचा नाही, तो आपल्या अन्नाचा आहे. आज प्रश्न पत्रकारांचा नाही, तो आपल्या माहितीच्या स्वातंत्र्याचा आहे.जर आपण अहिंसेला विसरलो तर उद्या आपल्याकडून बोलण्याचाही अधिकार हरवेल.
गांधींचा आवाज अजूनही सांगतो “सत्य आणि अहिंसा हेच दोन शस्त्र आहेत.ज्यांचं राज्य भीतीवर उभं असतं,ते सत्याच्या एका आवाजानं कोसळतं” आज आपण सत्तेच्या भीतीपुढे गप्प आहोत. पण लक्षात ठेवा गप्प जनता ही स्वतंत्र नसते. आणि स्वतंत्र राष्ट्राला गप्प नागरिक नकोत, त्याला जागे नागरिक हवेत. आज अहिंसा तत्त्व मोडीत निघालं आहे पण त्याचं पुनरुज्जीवन आपल्यावर आहे. सत्य बोलणं, शांततेने आंदोलन करणं आणि अन्यायाला न झुकणं हीच खऱ्या अर्थाने गांधींची वारसा आहे.
हिंसेनं शासन मिळतं, पण अहिंसेनं राष्ट्र घडतं आणि आज जर आपण गांधींचं तत्त्व विसरलो तर उद्या लोकशाही फक्त इतिहासात उरेल
9326365396