“पाकिस्तानच्या न्यूनगंडात अडकलेली भारतीय मानसिकता!”
“पाकिस्तानच्या न्यूनगंडात अडकलेली भारतीय मानसिकता!”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 02/10/2025 : आपलं महानगर (१ ऑक्टोबर )मध्ये ज्येष्ठ पत्रकार जयवंत राणे यांचा ‘लक्ष्यवेध ‘ सदरात “पाकिस्तानच्या न्यूनगंडात अडकलेली भारतीय मानसिकता!” या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला. “आशिया चषक सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून भारत जिंकला.तद्अनुषंगाने सर्वस्पर्शी भाष्य करणार्या या विचारप्रवर्तक लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—
हिंदूबहुल देशात आम्हा मुस्लिमांना न्याय मिळणार नाही,आमची गळचेपी होईल,त्यामुळे मुस्लिमांसाठी वेगळ्या देशाची गरज आहे,अशी मागणी मुस्लीम नेत्यांकडून केली गेली. त्यातूनच पुढे वेगळ्या पाकिस्तानसाठी महमदअली जिनांनी डायरेक्ट ॲक्शनचा पुकारा केला,त्यात अनेक निरपराध हिंदूंचे बळी गेले.पण आज पाकिस्तानची निर्मिती होऊन ७८ वर्षे पार पडल्यावर असे दिसते की,हिंदूस्थानमध्ये आज पाकिस्तानपेक्षाही जास्त संख्येने मुसलमान राहत आहेत.त्यामुळे वेगळ्या पाकिस्तान निर्मितीचा प्रयोग फसलेला आहे. सगळ्याच बाजूने त्यांचे वांदे झालेले आहेत. जमिनीचे क्षेत्रफळ, आर्थिक आणि लष्करी ताकद,तसेच इतर सगळ्याच क्षेत्रातील प्रगतीचा विचार करता भारत देश, पाकिस्तानच्या तुलनेत सरस आहे.पण भारतद्वेष हेच पाकिस्तानचे इंधन आहे त्यांच्यावरच तो चाललेला आहे.एक राष्ट्र म्हणून त्याला उभे राहता आले नाही,तिथे लोकशाही असली तरी बहुतांश काळ लष्करी राजवट राहिलेली आहे. तिथे प्रचंड प्रमाणात दहशतवाद पोसला जात असल्यामुळे अस्थिरता आहे.बाहेरील कंपन्या तिथे गुंतवणूक करायला मागत नाही.कारण तिथे सुरक्षिततेचा अभाव आहे.त्यामुळे तिथे रोजगाराची मोठी समस्या आहे.
भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते,’पाकिस्तान हा छोटा देश आहे,त्यांच्यामध्ये तुम्ही अडकू नका, जगाच्या व्यापकतेमध्ये तुम्ही जायला हवे,तर भारत मोठा होईल ‘.पण अब्दुल कलाम यांचा हा सल्ला कुणी लक्षात घेत नाही.सगळे पाकिस्तानशी तुलना करून त्यात समाधान मानण्यात धन्यता मानतात.त्यात राजकीय नेत्यांचा तर पहिला क्रमांक लागेल,कारण पाकिस्तानवर टीका केली की,इकडच्या लोकांना आवडते.त्यामुळे आपल्या भाषणाला टाळ्या मिळतात आणि निवडणुकीच्या वेळी मते मिळतात.त्यामुळे विशेष करून इकडच्या नेत्यांनी पाकिस्तानचा प्रचंड बागुलबुवा करून ठेवलेला आहे.त्यामुळे भारतीयांच्या मनात पाकिस्तानविषयी एक न्यूनगंड म्हणण्यापेक्षा भयगंड निर्माण झालेला आहे.त्यातून भारतीय मानसिकता बाहेर यायला तयार नाही. त्यामुळे जगाच्या व्यापकतेमध्ये जाण्यासाठी जो जोर लावायला हवा,तो सगळा जोर एकटा पाकिस्तान खाऊन टाकत आहे. भारत पाकिस्तानसोबत वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.पण त्यांची बडदास्त ठेवल्यामुळे एका छोट्या देशाला आपण खूप मान देत आहोत आणि पात्रता नसलेल्या देशाला जागतिक पातळीवर उगाचच प्रतिष्ठा मिळवून देत आहोत,हे भारतीय नेत्यांच्या लक्षात येत नाही.
आशिया चषक नुकताच भारताने जिंकला.त्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.हे सामने पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होत असल्यामुळे त्याविषयी नाराजी होती. तरी आंतरराष्ट्रीय नियमांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने झाले.भारत जिंकला,याचा आनंदच आहे.पण अख्खा भारत पाकिस्तानविरूद्धच्या मॅचमध्ये गुंतून पडला होता.एका बाजूला पाकिस्तान हरला,पण त्याच वेळी १४५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला आपल्यात गुंतवून ठेवण्यात पाकिस्तान यशस्वी ठरला.पाकिस्तान हा बुडायला तयार आहे,पण आपको साथ लेकर डुबेंगे ही त्यांची मानसिकता आहे,हे आपण लक्षात घ्यायला हवे.त्या न्यूनगंडातून बाहेर पडायला हवे.आपण जिंकल्याचा आनंद जरूर व्यक्त करायला हवा,पण पाकिस्तान हा देश कोण आहे,त्याची अवस्था काय आहे,त्याच्यावर मात करण्याचा जल्लोश साजरा करताना आपण त्यांना अनाठायी मोठे करत असतो.हे फक्त क्रिकेटच्या बाबतीतच नव्हे तर सगळ्याच गोष्टीत आपण पाकिस्तानशी तुलना करून स्वतःचे समाधान करून घेत असतो.
भारत पाकिस्तानपेक्षा सरस असतानाही भारतीय लोक आपली तुलना पाकिस्तानशी करण्यात धन्यता का मानतात,हा एक अनुत्तरित प्रश्र्न आहे.या तुलनेचा फायदा पाकिस्तानला होत असतो.भारतासारख्या मोठ्या देशाने त्यांच्याशी तुलना केल्यामुळे उगाचच जागतिक पातळीवर विविध देशांना पाकिस्तानची दखल घ्यावी लागते.कुठल्याही बाबतीत जेव्हा भारतीय लोक पाकिस्तानशी तुलना करतात,तेव्हा पाकिस्तानला आपल्यापेक्षा कमजोर दाखवण्याच्या प्रयत्नात भारतीय स्वतःचा कमीपणा करून घेत आहेत ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही.भारत आणि पाकिस्तान यांच्या वैरामध्ये जगातील काही देशांचे अर्थकारण गुंतलेले आहे हा भाग वेगळा.मग ते युद्ध असो अथवा क्रिकेटची मॅच असो.युद्ध झाले तर पाकिस्तानला फुकट शस्रे दिली जातात आणि भारताला मोठ्या किमतीत विकली जातात.तर दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मॅच होते,तेव्हा प्रचंड मोठी अधिकृत आणि अनधिकृत आर्थिक उलाढाल होत असते.ही गोष्ट एका बाजूला असली तरी दुसर्या बाजूला भारतासारखा मोठा देश आणि जगातील पहिल्या क्रमांकाची इतकी मोठी लोकसंख्या टिकलीभर देशाच्या जाळ्यात मानसिकरित्या गुंतून पडली आहे,हे भारतासाठी योग्य नाही.
मानसशास्राच्या विषयातील तज्ज्ञांचे असे मत आहे की,एखाद्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याला कमी ताकदीच्या माणसांसोबत स्पर्धेत उतरविले जाते.त्यामुळे पहिल्याचा आत्मविश्वास वाढतो.पण आत्मविश्वास वाढल्यावर पहिल्याने आपला आवाका वाढविण्याची गरज आहे. नाही तर पहिला आयुष्यभर त्या छोट्या पैलवानासोबत स्पर्धा करून त्याला हरवण्यात धन्यता मानत राहील, त्याची मजल पुढे जाणार नाही.भारताने पाकिस्तानचा विचार करताना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.नाही तर भारत दीर्घकाळ पाकिस्तानसारख्या छोट्या देशात अडकून पडेल.त्यामुळे भारतीय मानसिकतेला पाकिस्तानी न्यूनगंडातून बाहेर पडायला हवे.ज्येष्ठ पत्रकार जयवंत राणे यांनी लेखात केलेले अभ्यासपूर्ण भाष्य व विवेचन-विश्लेषण खरोखरच उल्लेखनीय, विचारप्रवर्तक व तमाम भारतवासियांच्या प्रामुख्याने राजकीय नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरते हे मात्र तितकेच खरे !
पत्रकार अरूण दीक्षित.
२/१०/२०२५.
(८१६०१०५९४०/९४२२६९४६६६)