खाजगी कारखान्यांमुळे सहकारी कारखाने अडचणीत : जयसिंह मोहिते पाटील

खाजगी कारखान्यांमुळे सहकारी कारखाने अडचणीत : जयसिंह मोहिते पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/09/2025 :
शासनाने ऊस उपलब्धतेचा विचार न करता अनेक कारखान्यांना परवानगी दिली असल्याने अडचणी निर्माण होत असून खाजगी कारखान्यांमुळे सहकारी कारखाने अडचणीत येत असल्याचे मत अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले. शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील विश्वतेजसिंह मोहिते पाटील, आजी-माजी उपाध्यक्ष आजी, माजी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभास्थळी सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते पाटील व स्व. आक्कासाहेब यांचे प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासद नारायण दामोदर बोडके यांच्या हस्ते करण्यात आले.वार्षिक सर्वसाधारण सभेपुढील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले. उपस्थित सभासदांनी सर्व तेरा विषयांना एकमुखी मंजुरी दिली. आयत्या वेळेच्या विषयामध्ये महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्या बाबतच्या मागणी चा ठराव मांडून तो सर्व संमत झाला.
जयसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले, सहवीज निर्मिती प्रकल्प व विस्ताराकरणासाठी काढलेले सर्व कर्जाची परतफेड कारखान्याने केली असून कारखाना कर्जमुक्त आहे. सहकार महर्षि कारखाना गत हंगामातील उसास दिवाळीसाठी शंभर रुपये देणार असल्याने गतवर्षी फेब्रुवारी पूर्वी आलेल्या उसात प्रति टन रुपये 2900/- तर त्यानंतर आलेल्या उसात तीन हजार दर दिला. भविष्यात एकरी उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार असल्याचे अध्यक्ष मोहिते पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पाणी वाटप संस्थांची गरज, जास्त रिकव्हरीसाठीची उपाययोजना, कृष्णा भिमा स्थिरीकरणाची गरज आधी वर मार्गदर्शन केले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. एकरी जास्त उत्पादन घेणाऱ्या पहिले तीन सभासद, राजाराम पराडे प्रथम क्रमांक, भारत मगर द्वितीय क्रमांक तर सीताराम कणसे तृतीय क्रमांक तसेच अडसारी उस पाच ते दहा एकर गटात रावसाहेब मगर यांनी प्रथम क्रमांक मिळवला या चारही सभासदांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर बेस्ट केमिस्ट्र अवॉर्ड मिळविणारे सुनील जाधव, देशात सर्वोत्कृष्ट वीज निर्मिती प्रकल्पचा पुरस्कार मिळविल्याबद्दल व्यवस्थापक युवराज निंबाळकर यांचाही सन्मान करण्यात आला.