✳️ जरांगे फॅक्टरः आरक्षण व्यक्तीला नव्हे जातीला! ♦️(भाग-6) ओबीसीनामा-49 ❇️ व्यक्ती म्हणून आरक्षणात घुसखोरी करता येणार नाही, तेथे पाहिजे जातीचे!
✳️ जरांगे फॅक्टरः आरक्षण व्यक्तीला नव्हे जातीला! ♦️(भाग-6) ओबीसीनामा-49
❇️ व्यक्ती म्हणून आरक्षणात घुसखोरी करता येणार नाही,
तेथे पाहिजे जातीचे!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 19/09/2025 :
ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या दुसर्या गोलमेज परिषदेत सर्वसंमतीने ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य जातींची सूची (Schedule) तयार करायला सुरुवात केली. ब्रिटिश भारताची 1931 ची जनगणना जातनिहाय झालेली होती. देशातील जास्तीत जास्त जातींची यादी या जनगणनेत आयतीच तयार झालेली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच जनगणनेतील अस्पृश्य जाती गृहित धरून ‘अनुसुचित जातींची यादी’ (SC) तयार केली. म्हणजे मागासवर्गीय कोण हे ठरवितांना बाबासाहेबांनी ‘जात’ हाच घटक गृहित धरला.
त्यानंतर 1946 साली संविधान सभेने आदिवासी सदस्यांची समिती नेमून तीला आदिवासी जमातींची यादी तयार करायला सांगीतली. त्याप्रमाणे त्यांनी अनुसुचित जमातींची यादी (ST) तयार केली व त्यांना मागास जमाती म्हणून आरक्षण देण्याचे प्रावधान संविधान सभेने केले. म्हणजे दलित जातीना व आदिवासी जमातींना असे स्वतंत्र प्रवर्ग (SC व ST) करून आरक्षण दिले. येथेही जमात म्हणजे जात हाच घटक गृहित धरण्यात आला. दलित व आदिवासींव्यतिरिक्त देशात आणखी काही मागास वर्ग समाजात आहेत, ते शोधा व त्यांनाही आरक्षण मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 340 व्या कलमात तरतूद केली. बाबासाहेब आंबेडकर एव्हढेच करून थांबले नाहीत तर मंत्रीमंडळाचा राजीनामा देऊन नेहरू सरकारला 340 व्या परिच्छेदानुसार 1953 साली कालेलकर आयोग गठीत करायला भाग पाडले. 1955 साली जेव्हा कालेलकर आयोगाने आपला अहवाल सादर केला तेव्हा ओबीसी म्हणून जातींचीच यादी या आयोगाने दिली व या जातींच्या विकासासाठी आरक्षण वगैरेच्या शिफारशी केल्यात. अहवाल प्राप्त होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या अहवालाला व त्यातील जातींच्या यादीला परीपुर्ण व निर्दोष म्हणून मान्यता दिली. म्हणजे येथेही जात हाच घटक गृहित धरण्यात आला.
व्यक्तीला युनिट मानले तरी त्या व्यक्तीचे मागासलेपण त्याच्या जाती वा जमातीवरूनच ठरत असल्याने शेवटी आपल्याला जातीवरच येऊन थांबावे लागते. जात बाजुला ठेवून आपण त्या व्यक्तीचे निर्दोष मुल्यमापन करूच शकत नाही. हा मुद्दा समजुन घेण्यासाठी आपण WXYZ या चार व्यक्तींचे उदाहरण घेउ या! समजा एखादी डब्ल्यु (W) व्यक्ती यजमान आहे व तीच्या घरी तीन माणसं (X. Y व Z) अतिथी म्हणून आलेत. पहिला अतिथी (X) दारात दिसताच यजमान व्यक्ती घरातून धावत आली व त्या पहिल्या अतिथीला ‘पाय लागू महाराज’ असे म्हणत स्वागत करतो व मोठ्या अदबीने त्या पहिल्या अतिथीला घरात घेउन जातो आहे. घरात जात असतांना पहिला अतिथी यजमानाला आर्शिवाद देण्याच्या थाटात म्हणतो- ‘‘अहो भाग्यम् जयसिंगराव! देव तुमचे भले करो!’’
दुसरा अतिथी (Y) यजमानाच्या दारात येताच ‘‘मालक, मी आलोय, नाम्या’’ असे जोरात ओरडून सांगतो व दार ओलांडून बैठक रूमच्या एका कोपर्यात जाऊन जमिनीवरच बसून राहतो. तिसरा अतिथी (Z) यजमानाच्या दारात येताच ‘जोहार मायबाप’ असे मोठ्याने म्हणतो व घराबाहेर पायरीवरच बसून राहतो. थोड्या वेळाने यजमान घरातून बाहेर येतो व एका हातातील टोपलीतले धान्य घरात बसलेल्या दुसर्या अतिथीच्या झोळीत टाकतो. नंतर यजमान आपल्या दुसर्या हाताल्या शिळ्या भाकरी पायरीवर बसलेल्या तिसर्या अतिथीच्या फाटक्या शर्टाच्या झोळीत टाकून घरात परत जातो व दुसरा-तिसरा अतिथी आपापली झोळी सांभाळत आपल्या घरी निघून जातात. आता या संपूर्ण घटनाक्रमात काही प्रश्न निर्माण होतात. ते आपण पाहू या!
1) यजमान हा पहिल्या अतिथीला अत्यंत सन्मानाने वागवतो व मोठ्या अदबीने घरात नेतो. ‘अतिथी देवो भव!’ असा सुसंस्कृत व समाजमान्य शिष्टाचार अदबिने पाळणारा तो यजमान सद्गुणी आहे, सज्जन माणूस आहे व माणूस म्हणून घ्यायला लायक असल्याचे प्रमाणपत्र त्याला देता येइल का?
2) दुसर्या व तिसर्या अतिथीला तो यजमान तुच्छतेने वागवतो आहे, त्यांचे स्वागतही करीत नाही व घरातही घेत नाही, यावरून त्या यजमानाला कोणते प्रमाणपत्र दिले पाहिजे?
3) हा तिसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे-
अ) या घटनेतील चारही पात्र समान दर्ज्याचे आहेत का?
आ) हे चारही पात्र कोणत्या तरी उतरंडीच्या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत का?
इ) जातीव्यवस्थेच्या उतरंडीचे बाबासाहेब आंबेडकरांनी चार संवैधानिक विभाग पाडले आहेत. दलित (SC), आदिवासी (ST), ओबीसी (OBC) व तथाकथित उच्च जाती म्हणजे ओपन (Open) कॅटेगिरी. घटनेतील पात्र या चार विभागापैकी कोणत्या कोणत्या दर्ज्याचे प्रतिनिधित्व करतात?
कोणीही सूज्ञ माणूस या तिन प्रश्नांची उत्तरे सहज देऊ शकतो, त्यासाठी खूप अभ्यासाची गरज नाही. गाव-खेड्यातील अत्यंत निरक्षर व अडाणी मानूस क्षणाचाही विलंब न लावता वरील सर्व प्रश्नांची फटाफट उत्तरे देईल.
1) पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे- त्या यजमानाच्या एकून वागण्याची सरासरी (Average) काढली तर संविधान-मान्य लोकशाही समाजात हा यजमान अत्यंत नीच व गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.
2) दुसर्या प्रश्नाचे उत्तर आहे- या यजमानाला ‘गुन्हेगार’ म्हणून जाहीर करून सविधानाचा अपमान केला म्हणून एट्रॉसिटी एक्ट खाली जेलमध्ये टाकाला पाहिजे.
3) तिसर्या प्रश्नाचे उत्तर आहे- अ) होय! हे चारही पात्र अजूनही समान दर्ज्याचे मानले जात नाहीत.
आ) ही चारही पात्रे समाजात अजुनही जातिव्यवस्था जीवंत असल्याचे सिद्ध करतात. जातीव्यवस्था उतरंडीची व्यवस्था आहे.
ई) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिव्यवस्थेच्या उतरंडीचे जे चार संवैधानिक प्रवर्ग तयार केले आहेत, त्या प्रमाणे- (I) यजमान हा ओपन कॅटिगिरीतील वतनदार-जमिनदार म्हणून तथाकथित क्षत्रिय जातीचे म्हणजे मराठा, जाट, पटेल, ठाकूर आदि जातींचे प्रतिनिधित्व करतो आहे. कारण त्याचे नाव ‘जयसिंगराव’ हे क्षत्रियवाचक आहे!
(II) पहिला अतिथी दारात न थांबता सरळ घरात घुसतो आहे व यजमान धावत जाउन त्याला ‘पाय लागू महाराज’ असे म्हणतो आहे, याचा अर्थ पहिल्या अतिथीचा दर्जा हा यजमानापेक्षा ‘वरचा’ आहे म्हणजे पहिला अतिथी हा ‘ब्राह्मण’ आहे.
(III) दुसरा अतिथी हा घरातील पहिल्या बैठक रूममध्ये जाउन एका कोपर्यात जमिनीवरच बसतो आहे. म्हणजे तो ब्राह्मण व क्षत्रियांच्या दर्ज्यापेक्षा थोडा खालच्या दर्ज्याचा आहे म्हणजे तो ओबीसी प्रवर्गातल्या जातींपैकी एक आहे. यजमानाने त्याच्या झोळीत धान्य टाकले आहे म्हणजे तो बारा बलुतेदारांपैकी कोणत्या तरी एका ओबीसी जातीचा असेल, म्हणजे नाभिक, धोबी, शिंपी, लोहार, सुतार वगैरे! कारण गाव-खेड्यात आजही बलुतेदारी सुरू आहे व धान्याच्या स्वरूपातच बलुतं दिले जाते.
(IV) तिसरा अतिथी हा घराबाहेरच आपल्या पायरीने वागतो आहे म्हणजे तो दलितच असला पाहिजे! यजमानाने त्याच्या झोळीत शिळ्या भाकरी टाकल्या आहेत, म्हणजे तो निश्चितच अस्पृश्य आहे!
2015 साली कोपर्डीत व 2025 साली जरांगेच्या उपोषण मंडपात या पेक्षा वेगळे काहीच घडले नाही. जरांगेच्या उपोषणाच्या मंडपात शरद पवार व भिडे भटजी आलेत तेव्हा जरांगे भीडे-पवारांपुढे नतमस्तक होऊन त्यांचे स्वागत कीत होता, पण शेकडो किलोमीटर लांब असलेल्या भुजबळांची आठवण पत्रकार करून देत होते तेव्हा जरांगे बिथरत होता व अश्लील शिव्यांच्या गटारात एखाद्या बेवड्यासारखा लोळत होता. 2015-16 साली कोपर्डीच्या बलात्कार व खून प्रकारण घडले तेव्हा महाराष्ट्रातील मराठे रोज पिडित भगिणीच्या घरासमोर मेळावे घेत होते. या मेळाव्यात दोनच मुद्द होते. पहिला मुद्दा होता एट्रॉसिटी एक्ट रद्द करण्याचा व दुसरा मुद्दा होता मराठा आरक्षणाचा! त्या वेळी महाराष्ट्रातील दिग्गज नेते रोज कोपर्डीला जावून भेट देत होते. शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस वगैरे जात होते व तेथील मराठे त्यांचे स्वागत फार मोठ्या उत्साहात पायघड्या टाकून करीत होते. परंतू ज्या वेळी प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले कोपर्डीच्या पिडित भगिणीच्या घरी कोपर्डीला जायला निघाले तेव्हा तेथील मराठ्यांनी त्यांना गावात प्रवेशच नाकारला. या दोन्ही दलित नेत्यांपेक्षा भुजबळ हे जास्त समजूतदार व हुशार आहेत, कारण ते कोपर्डीकडे फिरकलेच नाहीत. ओबीसी आता थोडेफार का होईना पण, स्वाभिमानी व सतर्क झाला आहे. यजमान जयसिंगरावाच्या घरी गेले की आपला अपमान होणारच, हे नाम्या ओबीसीने ओळखलं व त्याने आता ‘भुजबळाचे रूप’ धारण केले आहे. आजच्या नामदेवरावाच्या अंगात घुसलेला भुजबळ तुच्छपणे म्हणतो- ‘‘जयसिंग्या जा मर तिकडेच, आता तुझ्या घराकडे मी ढुंकूनही पाहात नाही.’’ कोपर्डी गावात व जरांगेच्या उपोषण मंडपात घडलेल्या या सत्य घटनांमधील सर्व पात्रांचं जातीय वर्गीकरण करायचे ठरले तर कसे केले जाऊ शकते? जरांगे, शरद पवार, फडणवीस व भीडे भटजी हे तथाकथित ब्राह्मण-क्षत्रिय जातीचे आहेत. जरांग्या व जयसिंग्याला भीख न घालणारे नाम्या-नामदेवराव व भुजबळ हे आजचे हुशार व सतर्क झालेले ओबीसी आहेत. आणी बाबासाहेब आंबेडकरांनी हजारवेळा ईशारे देऊनही हुशार न झालेले नेते पुन्हा पुन्हा क्षत्रिय जातीच्या जरांग्याच्या व जयसिंग्याच्या दारात जाऊन बसणारे प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले हे दलित नेते आहेत. ओबीसींमध्ये हरीभाऊ राठोड हा एकच येडा-बावडा नेता आहे, ज्याला आम्ही हजारवेळा समजावून सांगूनही तो पुन्हा पुन्हा जरांग्याच्या पायाशी जाऊन बसतो व भीख मागत असतो. जरांग्याने या राठोडला अनेकवेळा हाड् हाड् करून हाकलून दिलेले आहे.
हे सर्व सांगायचा माझा उद्देश हाच आहे कि, भारतात व्यक्तीचे मुल्यमापन आजही अपरिहार्यपणे जातीवरूनच होत असते आणी म्हणून आरक्षण देतांना जात हीच फुटपट्टी वापरावे लागले.
महाराष्ट्र शासनाच्या जी. आर. मध्ये जात नव्हे तर व्यक्तीला प्राधान्य देऊन नंतर त्याची जात निश्चिती केली जात आहे, जे असंवैधानिक आहे.
या मुद्द्याचं अधिक स्पष्टिकरण आपण पुढील भागात करू या!
तो पर्यंत जयजोती, जयभीम, जय संविधान! सत्य की जय हो!
व्यक्ती व जात या मुद्द्यावर आणखी बरेच काही आपण लेखाच्या पुढील भागात पाहू या!
तो पर्यंत जयजोती, जयभीम, सत्य कि जय हो!
प्रा.श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्क नं.- 81 77 86 12 56 किंवा 75 88 07 2832