⭕जरांगे फॅक्टर मुळापासून समजुन घ्या! 🟡 भाग-2.🔹ओबीसीनामा-45 🟪 जात्त्योन्नती!?
⭕जरांगे फॅक्टर मुळापासून समजुन घ्या!
🟡 भाग-2.🔹ओबीसीनामा-45 🟪 जात्त्योन्नती!?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 16/9/2025 :
सरकारने जरांगेच्या हातात दोन जी.आर. ठेवले व लगेच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टि.व्ही. वर येऊन सांगीतले की, ‘उद्यापासून सर्व मराठ्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवायचं आहे.’ खालच्या पातळीवर या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो, नीच पातळीवर, अनैतिक स्तरावर! सरकारचे दोन्ही जी.आर. काळजीपूर्वक वाचलेत तर स्पष्ट होते की सरकारने हे जी.आर. अत्यंत खालच्या पातळीवर व नीच पातळीवर जाउन काढलेले आहेत. सुप्रिम कोर्टाच्या 5 मे 20121 च्या निकालाच्या विरोधात जाऊन, तज्ञांचे दोन केन्द्रीय मागास आयोग व 8 राज्य मागास आयोगांच्या विरोधात जाउन, सुप्रिम कोर्टाने फ्रॉड ठरविलेल्या गायकवाड आयोगाच्या नादी लागून, संविधानाच्या विरोधात जाउन या ब्राह्मण-मराठा सरकारने हे दोन जी.आर. काढले असतील तर खरोखर हे जी.आर. अत्यंत खालच्या पातळीवर व नीच स्तरावर जाऊन काढलेले आहेत. आणी तेवढ्याच खालच्या नीच स्तरावर जाउन मराठ्यांनी कुणबी सर्टिफिकेट मिळवायचे आहेत, हा उपमुख्यमंत्री ना. शिंदेंचा आदेश तेवढ्याच नीच लायकीचा आहे.
जी.आर. मध्ये तीन शब्द महत्वाचे आहेत. पात्र, नातेसंबंध व कुळसंबंध! म्हणजे पात्र होण्यासाठी एकच कसोटी लावलेली आहे, ती म्हणजे तुमच्या नात्यात, कुळात कोणाचे एकाचे जरी कुणबी प्रमाणपत्र असेल तरी नात्यातील सर्व व्यक्ती पात्र ठरतात. म्हणजे आई, वडिल, भाऊ, बहिण, सासू सासरे, मेव्हणा, मेव्हणी, दीर, नणंद, जाऊबाई, खाऊबाई, राहूबाइ, ठेवूबाइ वगैरे सर्वच पात्र ठरतात. मग आता राहीलंच कोण अपात्र? म्हणजे ‘सगे-सोयरे’ हा जरांगेचा पहिला असंवैधानिक शब्द अशाप्रकारे पडद्याआडून उघडपणे जी.आर. मध्ये घुसडविण्यात आलेला आहेत. आणी आता जरांगेच्या आदेशाने मुख्यमंत्री फडनवीस यांनी नवीन सुधारित जी.आर. काढला आहे. या नव्या सुधारित जी.आर. मधून ‘पात्र’ शब्द वगळण्यात आलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की, एखादी मराठा व्यक्ती कुणबी प्रमाणपत्रासाठी कितीही अपात्र असली तरी तीला ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र दिलेच पाहिजे. प्रशासनावर दबाव आणून दादागिरीने एखादे बेकायदेशीर कृत्य करायला लावुन फायदे कसे उपटून घ्यायचे, त्याचा हा एक उत्तम नमुना आहे. जरांगेचा दुसरा संवैधानिक शब्द ‘सरसकट’ अशाप्रकारे मागच्या दाराने उघडपणे घुसडण्यात आहे.
मंडल आयोगाच्या अमलबजावणी आधी म्हणजे 1993 च्या आधीपर्यंत मराठा हे कुणब्यांशी बेटीव्यवहार (लग्नसंबंध) करीत नव्हते. केवळ राजकीय सत्ता मिळविण्यासाठी अल्पसंख्यक (7 टक्के लोकसंख्या) असलेल्या मराठ्यांनी स्वतःला बहुसंख्यक करून घेण्यासाठी बहुसंख्यक म्हणजे (लोकसंख्या 20 टक्के असलेल्या) कुणब्यांना जवळ केले व राज्याची सर्व सत्ता हडप केली. कुणब्यांना जवळ केले म्हणजे नेमके काय केले? कुणब्यांना दुय्यम स्तरावरची सत्ता दिली. गांव पातळीवरची सत्ता दिली, एकाद-दुसरे मंत्री पद व दोन-चार आमदारक्या या पलिकडे काहीच नाही. राज्याची सर्वोच्च सत्ता असलेली खाती, महामंडळे व मंत्री पदे ही निर्णायक सत्ता मराठाच उपभोगतो आहे अनेक वर्षांपासून! अशाप्रकारे दुय्यम सत्ता मिळाली कि तो कुणबी स्वतःला मराठा समजायला लागला! परंतु कुणब्यांनी बळजबरीने मिळविलेली ‘मराठा’ प्रतिष्ठा बेटीव्यवहारात मात्र कुचकामी ठरत होती. कारण मराठ्यांच्या दृष्टीने सत्तेत बसलेले कुणबी शुद्र व हलकेच मानले जात होते. मात्र मंडल आयोगाच्या अमलबजावणीनंतर, मुख्यतः पंचायत राज कायद्यातील ओबीसी आरक्षणामुळे मूळ मराठ्यांची गावाकडील व जिल्हा पातळीवरील सत्ता डगमगू लागली. तेव्हा त्यांच्यावर आलेल्या या संकटातून मार्ग काढण्यासाठी मराठ्यांनी नाईलाजास्तव कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मुलींशी लग्न करण्याचा फंडा शोधुन काढला. लग्नात भरपूर अटी टाकणारे व भरपूर पैसा व दाग-दागिण्यांचा हुंडा घेणारे 96 कुळी मराठे कुणबी मुलीशी लग्न करतांना फक्त ‘कुणबी प्रमाणपत्राचा’ हुंडा मागू लागलेत.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत सुनिल खोब्रागडे यांनी अलिकडेच एक लेखमाला मराठा जातीवर प्रकाशित केली आहे. या लेखमालेतून त्यांनी एक महत्वाचा जाती-सिद्धांत सिद्ध केला आहे. जातीव्यवस्थेत एकाद्या जातीची जात्योन्नती होऊ शकते व तीला नवी प्रतिष्ठीत जात-ओळख मिळू शकते. ही नवी प्रतिष्ठीत जात आपल्या मूळ जातीपासून विभाजित होते व आपल्याच मूळ (Mother Caste) जातीला शूद्र म्हणून हिणवू लागते. म्हणजे जन्मदात्या आईला लाथा कशा मारायच्या हे या मराठ्यांकडून शिकले पाहिजे. ही नव-प्रतिष्ठित जात लोकांचे शोषण करून भरपूर सत्ता, संपत्ती व सन्मान मिळविते. हे सर्व मिळविण्यासाठी या व्यक्तींकडे कोणतीही पात्रता वा गुणवत्ता नसते. परंतू मुख्य राज्यकर्त्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात काही पाटील, देशमूख, सुभेदार वगैरे नेमावे लागतात. या पदांवर स्थानिक बहुसंख्यक शेतकरी जातीतील दबंगांना नियुक्त करावे लागते. अशाप्रकारे दुय्यम-तिय्यम स्तरावरच्या सत्तेत वाटा मिळतो व गोर-गरिब शूद्र-अतिशूद्र जनतेला लूटून त्यातील काही हिस्सा दलालीचा मेहनताना म्हृणून मिळत असतो. काही काळानंतर सत्तेचं हे छायाछत्र हिरावले जाते व जात्योन्नत झालेले हे दुय्यम राज्यकर्ते भीकेला लागतात व कर्जबाजारीही होतात. कारण सत्ता गेल्यामुळे दलाली मिळणे बंद होते. परंतू मिळालेली प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी शौक-पाणी व मौज-मस्ती चालूच ठेवावी लागते, त्यातून ते कर्जबाजारी होतात. परंतू कितीही अधोगती झाली तरी त्यांची मिशिला पीळ देण्याची दृष्ट प्रवृत्ती तशीच कायम असते.
प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी या सामाजिक प्रक्रियेचं वर्णन एका ओळीत सांगीतले आहे. ‘‘कुणबी मातला नि मराठा झाला!’’ कॉ. शरद पाटील हे स्वतःला 96 कूळी मराठा समजत अल्यामुळे मराठा शब्दाची खरीखुरी व्याख्या त्यांच्याशिवाय दुसरं कोण सांगू शकते? परंतू या एका वाक्याच्या व्याख्येतून अनेक अर्थ निघतात व जातीव्यवस्थेचे अनेक सिद्धांत सिद्ध होतात. बहुसंख्यक शेतकरी जातीतूनच म्हणजे कुणबी जातीतूनच जात्योन्नती होउ शकते. कारण धनगर, माळी, नाभीक वगैरे जातीतून अनेक राजे-महाराजे झालेत, परंतु त्यांना क्षत्रियत्वाचा दर्जा कधीच मिळाला नाही. कारण सत्तेचा माज या जातींनी कधीच केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे व छत्रपती शाहू महाराज यांनी सत्तेचा माज कधीच बाळगला नाही व शुद्रादिअतिशूद्रांसाठी राज्यकारभार केला. एवढ्या एका कारणास्तव ते शुद्र-कुणबीच राहीलेत. या तिन्ही रयतेच्या राजाचा जिवघेणा छळ व द्वेष ब्राह्मण व 96 कुळी वतनदारांनी केला. छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेकाला विरोध, राजे संभाजींचा झालेला खून व छत्रपती शाहू महाराजांच्या वेदोक्त मंत्र-विधीला विरोध यामुळेच झाला.
जरांगे फॅक्टर मुळापासून समजून घेण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे सिद्धांत समजून घेणे आवश्यक आहेत. त्यासाठी आपल्याला लेखाच्या तिसर्या भागाकडे जावे लागेल.
तो पर्यंत जयजोती, जयभीम, सत्य कि जय हो!
प्रा. श्रावण देवरे,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्क नं.- 81 77 86 12 56 किंवा 75 88 07 2832