आ.रोहित पवारांना एम.सी.ए.मधून धक्के मारून हाकला

आ.रोहित पवारांना एम.सी.ए.मधून धक्के मारून हाकला
Akluj Vaibhav News Network Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 22/10/2023 :
आगामी काळात जर महाराष्ट्रातील क्रिकेटला विशेषतः हे क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांना चांगले सुगीचे दिवस यायचे असतील तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उतावळेपणा करणारे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने धक्के देऊन तातडीने विनाविलंब हाकलून दिले पाहिजे कारण या आमदार महाशयांची एम.सी.ए.चे अध्यक्षपद भूषवण्याची कवडीचीही लायकी नाही. हे तर आयजीच्या जिवावर बायजी झालेले अध्यक्ष आहेत. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शरदचंद्र पवारसाहेब यांनी अनेक उचापती करून आपल्या उचापतखोर नातवाला या पदावर अक्षरशः बसवले आहे बाकी काही नाही. हां जसे रोहित पवारांची हकालपट्टी करावी तशीच या संघटनेच्या अन्य कुचकामी आणि शाईनिंग मारणाऱ्या व क्रिकेट हे कशाशी खेळतात याचा साधा लवलेशही नसणाऱ्या दिडदमडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकारिणी सदस्यांना पुण्यातील गहुंजे स्टेडियमवरून त्यांच्या घरी चालत पाठवले पाहिजे. तरच त्यांना परवाच्या श्रीलंका विरूद्ध भारत या विश्वचषक सामन्यात त्यांनी पैसे मोजून आलेल्या प्रेक्षकांची कशी मैलोनमैल पायपीट केली याचा साक्षात्कार होईल .
क्रिकेट सारख्या सभ्य खेळात असं काही असह्य झालं की मनाचा कडेलोट होतो. परिणामी मनावरचा संयम सुटला तर त्यात काही वावगं नाही. कारण विश्वचषकाचा भारत – श्रीलंका साखळी सामना तब्बल सहाशे कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर झाला. पण प्रत्यक्षात मैदानावरच्या खेळापेक्षा हा सामना गाजला तोच मुळात आमदार रोहित पवार अध्यक्ष असणाऱ्या एम.सी.ए.च्या ढिसाळ आणि अक्कल शून्य नियोजनामुळे. अर्थात नियोजन कसल दगडाच. इतका बेफिकीरपणा असले बिनकामाचे तकलादू पदाधिकारी करुच कसे शकतात? हाच माझा सवाल आहे. खरं तर यांच्यावर ज्या ज्या प्रेक्षकांनी पैसे देऊन तिकीटे काढली आहेत त्या सर्वांनी एकत्रितपणे मानसिक त्रासाला आमंत्रण देत पायपीट करण्यासाठी जो मानसिक छळ केला त्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करून असल्या जिल्हा पातळीवर सुध्दा दिवे न लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांना याच मैदानावर भर दिवसा दहा दहा फेऱ्या मारुन त्याच पावली त्यांची त्यांच्या स्वगृही तशीच पायपीट करावी यासाठी आता प्रेक्षकांनी कष्ट घेतले पाहिजेत. आमदार रोहित पवार यांची खरच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होण्याची पात्रता आहे का ॽ हे तुम्हीच ठरवा कारण आजोबांनी शेंदूर फासला म्हणून कुणा दगडाला देवपण येईल असं जर वाटत असेल तर परवाच्या सामन्यात तीस पस्तीस हजार प्रेक्षकांना स्टेडियमपासूनच्या मुख्य रस्त्यापर्यंत असलेल्या मैलोनमैल अंतराची पायपीट करावी लागली नसती. पण या उतावळ्या पदाधिकाऱ्यांनी आपली अक्राळविक्राळ असलेली छबी झळकावी यासाठी फेसबुक व व्हाॅटसपवर भारतीय खेळाडूंच्या सोबत घेतलेल्या फोटोंचा अक्षरशः पाऊस पाडला जर तेव्हढाच वेळ त्यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संधान साधून मुख्य रस्त्या ते स्टेडियम अशी सार्वजनिक बस वाहतूक सुरू ठेवली असती तर प्रेक्षकांच्या मनात या पदाधिकार्यांनी कायमचे घर केले असते. पण हे करण्यासाठी अक्कल नावाची गोष्ट असावी लागते आणि ती पदाधिकारी होण्यासाठी कोणाची चमचेगिरी किंवा हुजरेगिरी करून मिळत नाही हेही तितकंच खरं आहे.
आता आगामी काळात या स्टेडियमवर जर कोणता आंतरराष्ट्रीय सोडा साधा बिन पैशाचा सामना असेल तर तो देखील पाहायला येण्याचे धाडस एवढी पायपीट करून कोण प्रेक्षक दाखवतील असं मला किंचित सुध्दा वाटत नाही. त्यामुळे आगामी काळात जर अशी तारांबळ उडाली तर एम.सी.ए.च्या संबंधित अध्यक्ष असो अथवा पदाधिकारी यांना तडकाफडकी तितकेच चोख उत्तर देणे आवश्यक आहे तरच असल्या पदाधिकाऱ्यांचा मुजोरपणा उतरेल कारण पदाधिकारी हे काय पैसे मोजून येणाऱ्या प्रेक्षकांचे मालक होऊ शकत नाही याचं भान संबंधितांनी ठेवणं आवश्यक आहे त्याचबरोबर नवख्या दिवट्या पदाधिकार्यांनी आपल्या पदाची गरिमा राखून आपला व्यवहार ठेवला पाहिजे. नाहीतर काल परवापर्यंत आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर संघात नसलेल्या खेळाडूंना कोण हिंग लावून विचारत नाही. त्यामुळे तुम्ही कुठले बाजीराव नाही का ॽ
राजाभाऊ त्रिगुणे .
पत्रकार,जेष्ठ क्रिकेट विश्लेषक