ताज्या घडामोडी

वृद्धांचा हंबरडा आणि एकटेपणा…!

वृद्धांचा हंबरडा आणि एकटेपणा…!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 29/8/2025 :
आज वृद्धाश्रम काळाची गरज नाही. ज्या वृद्धांना मुलंबाळ, नातेसंबंध, कोणताही आधार नाही. त्यांच्या करिता वृद्धाश्रम गरजेचे आहे. नविन पिढीला पालकांचे आयुष्यभराचे प्रेम, त्याग आणि कष्ट हे आता “जुनं ओझं” वाटायला लागलं. करिअर, पैसा, परदेशातील संधी यांच्यामागे धावताना मुलं नात्यांचा गाभा हरवत चालले आहेत. पूर्वी घर म्हणजे चार भिंती नव्हत्या तर ऊबदार नाते संबंध होते. आता घरं मोठी पण मन रिकामी झाली आहेत. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे पण त्यातल्या प्रत्येक खाटेवर अपूर्ण प्रेमाची, न बोलक्या हंबरड्याची कहाणी दडलेली आहे. मायबापांनी मुलांना हात धरुन चालविले आता मायबापाचा हात धरायला कोणी नाही. आजच्या समाजात मायबापांना वृद्धापकाळ हा त्यांच्या आयुष्याचा “सोन्याचा काळ” असायला हवा होता.
वृद्धांना मुले, नातवंडाच्या सहवासात, आठवणीच्या गोडव्यात करमले असते पण वास्तव यांच्या उलट होत आहे. आज मुलांना व्यस्ततेमुळे वेळ नसतो पण खरी गोष्ट अशी की, नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. एकेकाळी मुलं पालकां सोबत राहणे ही नैसर्गिक गोष्ट होती. आता मात्र ही जबाबदारी म्हणून मोजली जाते. पैशाचे महत्त्व इतके वाढले की, माणुसकी, आपलेपणा, स्नेह हे शद्ब केवळ फोटो मधल्या हसऱ्या चेहऱ्यापुरते किंवा सोशल मिडीयावरील पोस्टपुरते राहिले आहेत. माणुसकी पार लयाला गेली आहे. समाजात सहानुभूती, दया, प्रेम आणि एकमेकांना मदत करण्याची भावना नष्ट झाली आहे आणि लोक स्वार्थी बनले आहेत. वृद्धांच्या गरजा किंवा भावनाकडे दुर्लक्ष करतात.
नुकत्याच नागपूरात घडलेल्या दोन घटना समाजातील नाते संबंधातील उघडपणे वास्तव सांगून जातात. ६३ वर्षाची आजारी आई रुग्णालयाच्या खाटेवर बसून आहे. तिचे डोळे दरवाज्याकडे लागले होते. माझा मुलगा, माझी लेक कधी येईल मला घ्यायला. ती या आशेने कान दर पावलावर सावध पण उंबरठा ओलांडून कुणीही येत नव्हते. आयुष्यभर कष्ट करून, घर विकून लेकरांच्या भविष्याला आकार देणारी ती आई आजारी असताना वृद्धाश्रमात. तिची प्रकृती सुधारली तरी तिला घरी न्यायला कुणी आले नाही. पोटच्या गोळ्यांचा नकार ऐकून अखेर तिने आपल्या लेकरांविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली. ही मायेची सर्वात वेदनादायक हाक नव्हे का?
दुसरी घटना अशी की, शहरातील एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यात वृद्धाचा मृत्यू झाला. नातवंड मोठी झाली असतील पण वृद्धपणात आधार देणारा हात कुणी नव्हता. पैसा, घर, प्रतिष्ठा असूनही मनाच्या ओसाडपणाने त्यांना या निर्णयापर्यंत नेले.
एका श्रीमंत डाॕक्टरांचे निधन झाले. त्यांची मुले परदेशात स्थायिक झालेली होती. दोन दिवस त्यांच्या देहाला हात लावणारा जवळचा माणूस नव्हता. या घटना केवळ वैयक्तिक शोककथा नाहीत.
नाही रे नाही कुणाचे कोणी ।
अंती जाईल एकटाच ।
माझे माझे म्हणुनी ।
माझे नाही रे कोणी ।।
जीवनाचा शेवट एकटाच असतो पण जीवंत असताना नातेसंबंध, ही माया, ममता कुठे गेली. तसेच शंभर वर्षे जुनी रेमंड कंपनीचा मालक विजयपत सिंघाणीया यांनी त्यांचा मुलगा गौतम सिंघाणीयाकडे रेमंडची कमान सोपविली. त्यांनी आपले सर्व शेअर्स आपल्या मुलाचे नावावर केले. गौतम सिंघाणीयाने वडिल विजयपत सिंघाणीया यांना घरातून बाहेर काढले. आज विजयपत सिंघाणीया भाड्याच्या घरात राहत आहे. ते म्हणतात, मुलाने विश्वासघात केला. त्याबद्दल मला दुःख झाले आहे.

विसरु नको रे आई बापाला ।
झिजविली त्यांनी काया ।
काया झिजवून तुझ्या शिरावर ।
पडली सुखाची छाया ।
रे वेड्या मिळणार नाही ।
तुला आई बापाची माया ।।
आई वडिल मुलांना जन्म देतात. त्यांचे संगोपन कमावता होईपर्यंत त्याला सांभाळतात. त्यामानाने वयस्कर व्यक्तीला तेवढा काळ सांभाळावे लागत नाही. जन्म घेणारा पैसे घेऊन येत नाही. वयस्कर मंडळी काही ना काही कमावून ठेवतात. आईवाडिलांनी मुलांना सांभाळले त्याचा हिशोब लिहून ठेवला असेल असे मला वाटत नाही. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण आहे. उद्या तुम्हाला म्हातारे व्हायचे आहे. प्रत्येकाला ह्या स्थितीतून जावेच लागते. “जे पेराल तेच उगवेल” हे तत्त्व कधीही नष्ट होणार नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे माणुसकीच्या भिंतीजवव पावसात एका मुलाने म्हाताऱ्या बापाला आणून सोडले. त्या म्हाताऱ्याचे पायाला दोन्ही पायाला जखमा होत्या. माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गजाननराव जाधव यांनी त्या वृद्धाला सरकारी दवाखान्यात भरती केले. तो वृध्द दोन दिवसांनी मरण पावला. त्यांच्या मरणाची बातमी मुलाला कळताच तो न्यायला आला कारण त्याला मृत्यूपत्र, दाखला हवा होता. त्या वृद्ध वडिलांची संपत्ती, मालमत्ता त्याला हवी होती. असेही मुले पाहायला मिळतात. पुसद येथे सरकारी दवाखान्या समोर माणुसकीच्या भिंतीद्वारे ज्याचे वाढदिवस, तेरवी, वर्ष श्राद्ध असतात तेथे दोन्ही टाईम जेवण दिले जाते. फळ वाटप केले जातात. माणुकीच्या भिंतीचा प्रचार व प्रसार सप्तखंजेरी वादक पंकजपाल राठोठ हे करीत असतात. माणुसकीच्या भिंतीचे ते सदस्य आहेत.
मुलाने आई वडिलांचा योग्य आदर न केला किंवा त्यांची देखभाल न केल्यास त्यासाठी जेष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण अधिनियम २००७ हा कायदा आहे. या कायद्या नुसार आई वाडिलांना त्यांच्या मुलाकडून योग्य देखभाल आणि सन्मानाची अपेक्षा करण्याचा अधिकार आहे. मुलांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही तर पालक पोटगी आणि निवाऱ्याची कारवाई करु शकतात. यामुळे वृद्धांना सन्मानाने जीवन जगता येईल.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button