बाबा बदललेत होय … बाबा बदलाय !
बाबा बदललेत होय … बाबा बदलाय !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/09/2025 :
काल मी शॉपमध्ये असताना एका मुलीचं बोलणं कानावर आलं. खरंतर फोनवर कोणाचं बोलणं ऐकणं शिष्टसंमत नाही, पण त्या मुलीचे शब्द मनाला स्पर्शून गेले आणि ऐकावसं वाटलं.
सुरुवातीला मला समजलंच नाही की ती मुलगी नक्की कोणाशी एवढ्या हक्काने बोलते आहे. मी अधिक लक्ष देऊन ऐकलं.
ती मुलगी खूप प्रेमानं बोलत होती. फोनवर दुसऱ्या व्यक्तीशी “अरे, तुरे” घालून बोलत होती. तिचं बोलणं काहीसं असं होतं :
“अरे तू कुठे आहेस? मला घरी जायचंय. तू मला न्यायला ये लवकर, कारण घरी जाऊन मला परत यायचंय, आवरून!”
इतकं बोलून फोन कट झाला.
नंतर ती मुलगी आपल्या मैत्रिणीशी बोलत होती. ती म्हणत होती, “अगं, बाबाला फोन केला होता मी. पण तो म्हणतोय, ‘मी येऊ शकत नाही, मी बाहेर गेलोय.’ आता काय करू?”
ती बाबांवर थोडीशी रागावली होती आणि लाडिक भुनभुन करत शॉपमधून वस्तू घेऊन बाहेर गेली. माझं लक्ष अजूनही तिच्याकडे होतं, कारण ती खूप प्रेमळ आणि आपुलकीनं आपल्या बाबांशी बोलत होती.
त्या दोघी शॉपमधून बाहेर पडताच, अचानक बाबांची गाडी तिला दिसली. तेव्हा ती मुलगी एकदम हसून म्हणाली –
“अरे, तो बघ… बाबा आलाय!”
पुन्हा तोच लाडका, हक्काचा स्वर…!
अशा प्रकारची उदाहरणं मला अनेकदा शॉपमध्ये किंवा इतर ठिकाणी ऐकायला मिळतात. मुलं आपल्या बाबांशी अगदी मोकळेपणानं, प्रेमानं, लाघवीपणे बोलतात. आणि बाबा सुद्धा त्याच प्रेमानं, समजुतीनं प्रतिसाद देतात.
या प्रसंगावरून मला असं वाटतं — खरंच, बाबा बदललेत.
ते आता मुलांचे केवळ पालक नाहीत, तर मित्र झालेत. पण या मैत्रीतही प्रेम, आपुलकी, आणि परस्पर आदर आहे. नातं मोकळं झालंय. बंधनं नाहीत, बंध आहे — विश्वासाचा, प्रेमाचा!
जनरेशन गॅप…
तीस-चाळीस वर्षांपूर्वीचं चित्र वेगळं होतं. तेव्हाही बाबांचं नातं प्रेमाचं आणि आदराचं होतंच. पण त्यात एक प्रकारची भीती मिसळलेली असे.
बाबा घरात आले की वातावरण गंभीर होई. त्यांच्यासमोर कुणी काही बोलायचं नाही.
बाबा नेहमी शांत, गभीर वाटायचे. लक्ष ठेवायचे, मार्गदर्शन करायचे, पण ते एकतर्फी हक्काचं नातं वाटायचं — “बाबा म्हणतील तीच पूर्व दिशा!”
आजही आदर आहेच, पण त्यात मोकळेपणा आणि संवाद आहे.
आजचे बाबा मुलांच्या मनाचा, मताचा विचार करतात. मुलांबरोबर वेळ घालवतात, त्यांचे मित्र होतात, त्यांच्याशी गप्पा मारतात.
म्हणूनच मी म्हणते — बाबा बदललेत… आणि हा बदल खूप सुंदर आहे.
घराच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं हे बदललेलं वडील-मुलं/मुलीचं नातं फार महत्त्वाचं आहे.
हो, काही अपवाद असतीलच — पूर्वीही होते, आजही असतील.
पण एकूणच नात्यांचं रूपांतर अधिक सुंदर, प्रेमळ आणि परस्पर सन्मानाचं झालंय, हे निश्चित!
सौ.धनश्री उरणे/ म्हेत्रस
राहु पिंपळगाव