ताज्या घडामोडी

साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवाळी पाडवा; वाचा, महत्त्व व मान्यता

साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवाळी पाडवा; वाचा, महत्त्व व मान्यता

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/11/ 2024 :
आपल्याकडील कृषिप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व दिले गेलेले आपले सर्व सण-वार या निसर्गावरच प्रामुख्याने आधारलेले आहेत. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचाच मानला जातो. यंदा शनिवार , 2 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा साजरा होत आहेत. तर 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेने यंदा दीपोत्सवाची सांगता होणार आहे. दिवाळी पाडव्याचे महत्त्व, मान्यता, परंपरा आणि पौराणीक कथा जाणून घेऊया…
*बलिप्रतिपदा
बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळात हरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती‌. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण, पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
बळीचे राज्य येवो…
वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखविली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजा गर्विष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की, कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.
*​व्यापारी वर्गाचे नववर्ष
अश्विन अमावास्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वान्नांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात.
*दिवाळी पाडवा
दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात, यालाच दिवाळसण म्हणतात. यानिमित्त यादिवशी जावयास आहेर केला जातो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे. इ. स. पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वागीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे.
*​भाऊबीज
यावर्षी दिवाळी पाडवाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी होत आहे. बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले, अशी मान्यता आहे. दिवाळीतील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button