ज्याचे मन नियंत्रित तो करेल सर्व काही नियंत्रित ‼️

मन इंद्रधनू ……….❗
ज्याचे मन नियंत्रित तो करेल सर्व काही नियंत्रित ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 21/03/2025 :
आचार्य रजनीश म्हणतात,
“वीणेच्या तारा जर खूप सैल असतील तर त्यातून संगीत निघणार नाही. त्या खूप घट्ट असतील तरीही संगीत निघणार नाही. पण त्या तारांची एक अवस्था अशीही असते जेव्हा त्या सैलही नसतात आणि घट्टही नसतात. नेमक्या त्याच बिंदूवर संगीताचा जन्म होतो. त्याचप्रमाणे भोग आणि संयम यांच्या मधली एक अवस्था असते नेमक्या त्याच बिंदूवर जीवनाचा जन्म होतो.”
आपल्या मनाची अवस्था तरी नेमकी काय असते..? थोडीशी अशीच असते. मनाचा वारू जर सैल सोडला, म्हणजेच मनाच्या वारूचे लगाम जर सैल सोडले तर मनाची धाव किती वेगाने जाईल ते सांगता येत नाही. मनावर जर काही बंधनेच नसतील तर ते नेमके कसे विचार करेल त्याची कल्पनाही येत नाही.
थोडक्यात सांगायचं तर आपण जर आपल्या मनाला एक अथांग महासागर म्हटलं तर त्यातून कधीकधी शांत संयमी लाटा येऊन वास्तवाच्या किनाऱ्यावर आदळतील आणि कधी कधी त्सुनामीच्या स्वरूपात येऊन त्या विध्वंसही करतील. काहीच सांगता येत नाही. “अवर माईंड इज मोस्ट अनप्रेडिक्टेबल थिंग”…!! आपण काही गोष्टींची खरोखरच कल्पना करू शकत नाही अशा गोष्टी मनात जन्म घेतात. ती “मन चिंती ते वैरी न चिंती” अशी जी म्हण आहे ती काही उगाचच नाही निर्माण झाली. मग या मनाला असे काही विध्वंसक चिंतन करायला वेळच द्यायचा नाही असे आपले माझे मत.. त्याला एवढे व्यस्त म्हणजे बिझी ठेवा, एवढे बिझी ठेवा की ते असे काही विध्वंसक विचारच करू शकणार नाही. त्यामुळे होईल काय की ते बिचारे बऱ्यापैकी आपल्या ताब्यात राहील आणि आपले गुलाम बनून राहील.
जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या मनाचे गुलाम बनता त्यावेळी परिस्थिती बिकट होते, पण जेव्हा तुमचे मन तुमचे गुलाम बनते त्यावेळी परिस्थिती नियंत्रणाखाली राहते.
थोडक्यात सांगायचं तर आपल्या मनाला आपण प्रशिक्षित केले पाहिजे, पूर्णपणे तयार केले पाहिजे तरच आजच्या या युगामध्ये आपला पूर्णपणे टिकाव लागेल.
अशावेळी कविवर्य विंदा करंदीकर यांच्या या कवितेची आपोआपच आठवण येते.
केले कुणास्तव ते किती, हे कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती; त्याला तयारी पाहिजे.
डोक्यावरी जे घेउनी आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी; त्याला तयारी पाहिजे.
सत्यास साक्षी ठेवुनी वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही! त्याला तयारी पाहिजे.
पाण्यामध्ये पडलास ना? – पाणी कसेही ते असो – –आता टळेना पोहणे; त्याला तयारी पाहिजे.
विंदा करंदीकर
राजश्री (पूजा)
एम ए मानसशास्त्र
कोल्हापूर