तब्बल १२ पदरी महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील एकमेव खाडी पूल…!

तब्बल १२ पदरी महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील एकमेव खाडी पूल…!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/02/2025 : सायन पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पूल हा नवी मुंबई ते मुंबई जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा. वाशी खाडी पुलावरील हाच ब्रीज महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधील एक माईलस्टोन ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसी कडून नवीन पूल वाशीच्या खाडीवर बांधला जात आहे. तब्बल १२ पदरी असलेला महाराष्ट्रातील पहिला आणि भारतातील एकमेव खाडी पूल ठरणार आहे.
वाशी खाडी पूल हा मुंबई आणि नवी मुंबई शहराला जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. मुंबईत यायचे असेल तर वाशी खाडी पुलाशिवाय पर्याय नाही. वाशी खाडीवर दोन पूल आधीपासून आहेत. पहिला पूल १९७३ मध्ये बांधण्यात आला. हा दोन लेनचा पुल आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे दोन दशकांपासून हा पूल नियमित रहदारीसाठी बंद करण्यात आला. सध्या याच बंद अवस्थेतील पुलावर कधी कधी बॉलिवूड चित्रपटांचे शुटींग होते. तर, दुसरा पूल १९९७ मध्ये बांधण्यात आला. तो सहा पदरी पूल सध्या वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने याठिकाणी नवीन १२ पदरी पुल उभारण्यात येत आहे.
सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या खाडी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विशेषत: टोल नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळते. मात्र, या खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नव्या तिसऱ्या पुलामुळे वाहतूक कोंडी फुटणार आहे.
खाडी पुलाच्या दोन्ही बाजूंना संमातर अशा प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी दोन पूल एमएसआरडीसी कडून उभारले जात आहेत. १८३७ मीटर लांबीचे प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन पूल उभारण्यात येत आहेत. म्हणजेच हा नवा पुल एकूण १२ लेनचा असणार आहे. हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सध्या टप्प्याटप्प्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. हा पूल पूर्ण क्षमेतेने सुरु झाल्यावर या मार्गावरुन प्रवाशांचा ट्रॅफिक मुक्त प्रवास होणार आहे.