देहावसान

देहावसान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 19/8/2025 :
प्रा. डॉ. लोपा मेहता, या मुंबईतील जी एस मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या, आणि त्यांनी तेथील एनॅटॉमी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले.
७८ व्या वर्षी त्यांनी *लिव्हिंग विल* तयार केले. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे —
जेव्हा शरीर साथ देणे बंद करेल, आणि सुधारण्याची कोणतीही शक्यता उरणार नाही, तेव्हा माझ्यावर उपचार करू नयेत.
ना व्हेंटिलेटर, ना ट्यूब, ना रुग्णालयातील निरर्थक धावपळ.
माझा शेवटचा काळ शांततेत जावा — जिथे उपचारांच्या हट्टापेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य असेल.
डॉ. लोपा यांनी केवळ हा दस्तऐवजच लिहिला नाही, तर मृत्यूविषयी एक संशोधन-पत्रही प्रकाशित केले. त्यात त्यांनी मृत्यू ही एक नैसर्गिक, निश्चित आणि जैविक प्रक्रिया आहे, असे स्पष्ट केले आहे.
त्यांचा मुद्दा असा की, आधुनिक वैद्यकशास्त्राने मृत्यूला स्वतंत्र संकल्पना म्हणून कधी पाहिलेच नाही. वैद्यकशास्त्राचा आग्रह असा राहिला, की मृत्यू नेहमी एखाद्या आजारामुळेच येतो, आणि जर आजारावर इलाज झाला, तर मृत्यू रोखता येतो.
पण शरीराचे विज्ञान त्याहून खूप खोल आहे.
त्यांचा युक्तिवाद असा आहे — शरीर हे अखंड चालणारे यंत्र नाही. ते एक *मर्यादित प्रणाली* आहे, ज्यात ठराविक जीवनशक्ती असते. ही ऊर्जा कुठल्यातरी टाकीमधून मिळत नाही, तर सूक्ष्म शरीरामार्फत मिळते.
हेच ते “सूक्ष्म शरीर ज्याचा अनुभव प्रत्येकाला येतो, पण जो दिसत नाही. मन, बुद्धी, स्मृती आणि चेतना — या सगळ्यांनी मिळून बनलेली ही प्रणाली आहे.
हे सूक्ष्म शरीर म्हणजे जीवनशक्तीचा प्रवेशद्वार आहे. ही ऊर्जा संपूर्ण देहात पसरते, आणि शरीर जिवंत ठेवते. हृदयाची धडधड, पचनक्रिया, विचार करण्याची क्षमता — हे सगळे तिच्या आधारावर चालते.
पण ही शक्ती अमर्याद नाही. प्रत्येक शरीरात तिचे एक ठराविक प्रमाण असते. जसे एखाद्या यंत्रात बसवलेली “फिक्स्ड बॅटरी”.— ना वाढवता येते, ना कमी करता.
“जितकी चावी भरली रामाने, तितके चालेल खेळणे” — असा प्रकार.
डॉ. लोपा लिहितात, की जेव्हा शरीरातील ही उर्जा संपते, तेव्हा सूक्ष्म शरीर देहापासून वेगळे होते. तोच क्षण म्हणजे देह स्थिर होतो, आणि आपण म्हणतो, “प्राण गेले”.
ही प्रक्रिया ना आजाराशी संबंधित असते, ना कुठल्या चुकांशी. ही शरीराची अंतर्गत लय आहे — जी गर्भातच सुरू होते, आणि पूर्ण होऊन मृत्यूला पोहोचते.
या ऊर्जेचा खर्च प्रत्येक क्षणी चालतो — प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव आपला जीवनावधी संपवतो. आणि जेव्हा संपूर्ण देहाचे “कोटे” पूर्ण होतात, तेव्हा शरीर शांत होते.
मृत्यूचा क्षण हा घड्याळाने मोजलेला नसतो. तो एक जीवनशास्त्रीय वेळ असतो — जो प्रत्येकासाठी वेगळा.
कुणाचे जीवन ३५ वर्षांत पूर्ण होते, तर कुणाचे ९० वर्षांत. पण दोघेही आपली पूर्ण वाटचाल करतात.
जर आपण त्याला पराभव किंवा जबरदस्ती मानले नाही, तर कुणीही अपुरे मरत नाही.
डॉ. लोपा यांच्या मते आधुनिक वैद्यकशास्त्र जेव्हा मृत्यू टाळण्याचा हट्ट धरते, तेव्हा केवळ रुग्णाचे शरीरच नाही तर संपूर्ण कुटुंब थकते.
ICU मधील महिनाभराची श्वासोच्छ्वासाची किंमत कधी कधी आयुष्यभराच्या बचतीला नेस्तनाबूत करते.
नातेवाईक म्हणत राहतात — “अजून आशा आहे”, पण रुग्णाचा देह कधीच सांगून गेलेला असतो — “आता पुरे”
म्हणूनच त्या लिहितात — “जेव्हा माझी वेळ येईल, तेव्हा फक्त मला KEM रुग्णालयात घेऊन या. जिथे मला खात्री आहे, की अनावश्यक हस्तक्षेप होणार नाही. उपचारांच्या नावाखाली दूरगामी त्रास दिला जाणार नाही. माझ्या शरीराला रोखले जाणार नाही — त्याला जाऊ द्या”.
पण प्रश्न हा आहे — आपण आपल्यासाठी असे काही ठरवले आहे का?
आपले कुटुंब त्या इच्छेचा मान ठेवेल का? आणि जे मान ठेवतील त्यांना समाजात मान मिळेल का?
आपल्या रुग्णालयांत अशा इच्छेचा सन्मान आहे का, की अजूनही प्रत्येक श्वासावर बिल होणार आणि प्रत्येक मृत्यूवर दोषारोप?
हे इतके सोपे नाही. तर्क आणि भावना यांचा समतोल साधणे कदाचित सर्वात कठीण काम आहे.
जर मृत्यूला आपण शांत, नियत आणि शरीराच्या अंतर्गत गतीतून आलेली प्रक्रिया म्हणून पाहायला शिकलो, तर कदाचित मृत्यूची भीती कमी होईल, आणि डॉक्टरांकडून असलेल्या अपेक्षा जास्त वास्तववादी होतील.
माझ्या मते, मृत्यूशी लढणे थांबवायला हवे आणि त्याआधी जगण्यासाठी तयारी करायला हवी.
आणि जेव्हा तो क्षण येईल — तेव्हा शांतपणे, सन्मानाने त्याला सामोरे जावे.
बुद्धांच्या भाषेत — *मृत्यू म्हणजे जीवनाच्या प्रवासातील पुढचा टप्पा आहे.
संकलन : बी. टी. शिवशरण