ताज्या घडामोडी

“महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ… पण, परंतु” – मधुकर भावे

“महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ… पण, परंतु”मधुकर भावे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, रात्री 8 :11 वा. बडोदा रेल्वे जंक्शन येथून

बडोदा दिनांक 17/06/2024 :

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना जबरदस्त दणका दिला. आता ‘विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ आहे…’ असे अत्यंत आत्मविश्वासाने श्री. शरद पवारसाहेब, उद्धवसाहेब आणि पृथ्वीराजबाबांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. अहमदनगरची मोठी लढाई जिंकण्यात आघाडीवर असलेले बाळासाहेब थोरातही पत्रकार परिषदेत होते. या नेत्यांच्या आश्वासनामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी कार्यकर्ता आणि पुरोगामी राजकीय पक्ष यांच्या मनातील विचार नेत्यांनी प्रत्यक्षपणे लगेच बोलून दाखवला. याचे महाराष्ट्राला समाधान वाटेल… आणि ती गोष्ट खरीच आहे. लोकसभा निवडणुकीतील वातावरण असेच चार महिने कायम ठेवले तर… महाराष्ट्रात ही जी कोणती महायुती आहे… त्या युतीला तडीपार करणे फार अशक्य नाही. ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका गमावलेल्या आहेत. त्यात अंधेरीची एक आिण पुण्यातील कसबाची एक…. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात किमान ४५ जागा मिळवण्याच्या वल्गना करणारा भाजापा, फक्त ११ जागांवर थांबला… त्यामुळे युतीचा पराभव विधानसभेत करणे फार अवघड नाही. असे असले तरी आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च नेत्यांनी ‘सत्ताबदल अटळ’ अशी ग्वाही दिल्यानंतर हे सगळे नेते शडडू ठोकून कामाला लागतीलच… त्यातही श्री. शरद पवारसाहेब ज्या आत्मविश्वासाने लोकसभा निवडणुकीत रस्त्यावर उतरले त्याचप्रमाणे आताही विधानसभा निवडणुकीत त्यांनी पत्रकार परिषदेत डाव्या हाताचे मतदान केल­ेले बोट ज्या आत्मविश्वासाने त्यांनी दाखवलेले आहे त्यामुळे हा विजय मिळवणे शक्य आहे. या मोठ्या नेत्यांच्या शब्दांनंतर, तो शब्द झेलणे आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागणे, हेच अपेक्षित आहे. माझ्यासारखा चतुर्थ श्रेणीतील पत्रकार या ज्येष्ठ नेत्यांना काही सांगू शकेल, अशी अजिबात स्थिती नाही. तो अभिन्वेषही नाही. तरीही काही शंका आहेत. काही गोष्टींची चर्चा आवश्यक वाटते. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने ही चर्चा आवश्यक आहेच… शिवाय विजयाच्या अतिउत्साहात हुरळूनही जाता कामा नये. नेते हुरळले नाहीत. पण कार्यकर्ते हुरळण्याचा धोका जास्त असतो… काँग्रेस पक्षात महाराष्ट्रात तरी तो अधिक आहे. त्यामानाने शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत नेत्यांचा धाक आहे. महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारिणीच २०० ची आहे. त्यातील प्रत्येकाला आमदार व्हायचे आहे. आमदार झालेल्यांना मग मंत्री व्हायचे आहे. हा उत्साह ठीक आहे… पण, ‘लोकसभा निवडणुकीतील विजय तसाच्या तसा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत लागू पडतो,’ असे गणित मांडणे थोडे घाईचे होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. लोकसभेच्या एका मतदारसंघात साधारण ६ विधानसभा मतदार संघ धरले… तर, या गणिताने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला १८० जागा आताच मिळाल्यासारख्या आहेत. म्हणजे पूर्ण बहुमत आहे. पण हे गणित विधानसभा निवडणुकीत असेच्या असे लागू पडणार नाही, म्हणून काही चर्चा होणे गरजेचे आहे. लोकसभेच्या निवडणकीत अाणि विधानसभा निवडणुकीत पुष्कळ फरक आहे. वातावरणाचा फरक आहे…. उमेदवारांचा फरक आहे… विषयांचा फरक आहे… लोकसभा निवडणुकीत मोदी- शहा यांच्याविरुद्धचा एक संताप निश्चित होता… घटना बदलणार हा भाजपाचा अजेंडा होताच… खोटी आश्वासने होती… लोक कंटाळले होते… महाराष्ट्रातील नासवलेल्या राजकारणाचाही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या विजयात मोठा भाग होता… हे सगळे मान्य केल्यावरसुद्धा जमिनीवरील वस्तुस्थिती नीट समजावून घेतली पाहिजे.
सर्वप्रथम महाविकास अाघाडीच्या नेत्यांनी उमेदवारीचे निकष ठरवले पाहिजेत…. ते सर्व मान्य व्हायला पाहिजेत…. आघाडी जे ठरवेल ते कोणी जाहीर करायचे, हे ही ठरले पाहिजे… लोकसभा निवडणुकीत आघाडीत ठरलेले नसताना शिवसेनेने सांगलीची जागा परस्पर जाहीर करून टाकली. मतदारांना ते आवडले नाही… अर्थात ती जागा जाहिर केली म्हणूनच विशाल पाटील यांनी उसळी मारली. सेनेला फटका बसला… या लोकसभा निवडणुकीत कोकण, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मुख्य म्हणजे औरंगाबाद, या मतदारसंघात शिवसेनेला फटका बसलेलाच आहे, त्याची कारणे त्यांनी शोधली पाहिजेत…. पण एक गणित असे बघा… २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत शिवसेना होती…. त्यावेळी भाजपाला २३ जागा मिळाल्या. आणि शिवसेनेला १६ जागा मिळाल्या. या जागा ४१ होतात. यावेळी भाजपा २३ जागांवरून ११ जागांवर आला. आणि उद्धवसाहेब किंवा एकनाथ शिंदे या दोघांच्या शिवसेनेचे एकूण उमेदवार १६ आहेत. दोन ने संख्या कमी झाली. ५ जागांवर उद्धवसाहेबांना फटका बसला. शिवसेनेची मते जरी विभागली तरी २०१९ ला जेवढी मते पडली जवळपास तेवढीच मते उद्धवसाहेब आणि शिंदे यांच्या शिवसेनेला पडली आहेत. तो महत्त्वाचा मुद्दा नाही. मुद्दा महत्त्वाचा आहे की, जे आमदार सेनेला िकंवा राष्ट्रवादीला सोडून गेले, त्या जागांवर तातडीने उमेदवार निश्चित करणे हा पहिला कार्यक्रम असला पाहिजे. शिवाय काही मतदारसंघ असे आहेत की, तिथे कठीण परिस्थिती आहे. उदा: सातारा लोकसभा मतदारसंघ घ्या… या मतदारसंघात उमेदवार होते, शशिकांत शिंदे. ते राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार होते. कोरेगाव मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. नंतर ते विधान परिषदेवर आले. आता लोकसभेला ते उभे राहिले. तर त्यांच्या कोरेगाव मतदारसंघातही ७ हजार मतांनी ते पिछाडीवर अाहेत. विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनाच उभे करायचे तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यायला हवा. नाही करायचे, तर नवीन उमेदवार कोण? त्याच जिल्ह्यात शंभूराज देसाई पाटणमध्ये आमदार आहेत. २०१९ ला ते शिवसेनेत होते. आता शिंदे गटात आहेत. त्यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने क्लेम केला… तो उमेदवार कोण? पूर्वी त्यांच्या विरोधात विक्रम पाटणकर यांचे चिरंजीव उभे राहिले… दोन वेळा पडले… पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीने ती जागा घेतली. तर उमेदवार पुन्हा कोण? खुद्द पृथ्वीराज बाबांच्या कराड मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत बाबा हे ७०० मतांनी पिछाडीवर आहेत. आता बाबाच तिथे उमेदवार असतील… २०१४ आणि २०१९ जवळपास ९ हजार मतांच्या फरकानेच बाबा विजयी झाले होते. त्यामुळे एक-एक मतदारसंघ समोर ठेवून उमेदवार ठरवला पाहिजे. कोकणामध्ये शिवसेनेचा दबदबा होता. आता कोकण पूर्णपणे हातातून गेले. ठाणे, रायगड, रत्न्ाागिरी, सिंधुदुर्ग…. एकूण विधानसभेच्या जागा १८. सिंधुदुर्गपासून सुरुवात केली तर सावंतवाडीत आघाडीचा उमेदवार कोण? नितेश राणे यांच्याविरुद्ध सतीश सावंत पुन्हा उभा राहणार का? की संदेश पारकर? राजापूरात राजन साळी… रत्नागिरीत उदय सांमतच्या विरोधात उमेदवार कोण? इकडे रायगडातील महाडमध्ये गोगावले यांच्याविरोधात उमेदवार कोण? लढाऊ माणिकराव जगताप आता नाहीत. माणिकरावांच्या जागेवर पर्यायी नेतृत्त्व तयार केलेच गेले नाही. त्याच्या पुढे आदिती तटकरे यांच्याविरोधात उमेदवार कोण? पेण-पनवेलमध्ये तीच अवस्था… दादा गटाचा मोठा पराभव झाला हे खरे… एक तटकरे विजयी झाले… पण ते दादा गटाचे म्हणून नव्हे… त्यांच्याविरुद्धचा उमेदवार एकदाच २०१४ ला निवडून आला. राज्यमंत्री झाला… मंत्री म्हणून िगते यांचा प्रभाव कधीही जाणवला नाही. त्यांना माणसं जमवता येत नाहीत. जोडता येत नाहीत. पटवता येत नाहीत.. फसवता येत नाहीत… या सगळ्या राजकीय गुणांमध्ये आमचे तटकरे कितीतरी पुढे आहेत. त्यामुळे ते जिंकणारच होते. शिवाय महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष आहे. पण तो नावाला आहे. रायगडमधील लढाऊ शेतकरी कामगार पक्ष कधीच अोसरलेले आहेत. अलिबागचे जयंत पाटील जोारत सांगत होते…. ‘तटकरेच्या विरोधात आमच्याजव ५ लाख मते आमच्या पक्षाची अाहेत….’ हा पाच लाखांचा आकडा त्यांनी १० वेळा सांगितला… तटकरे किती हुशार… त्यांनी हा पाच लाख मतांचा आकडा ऐकला…. आणि मग त्या ५ लाख मतांचा भागाकार करायचा की गुणाकार करायचा… याचा हिशेब त्यांनी बरोबर केला आणि अलिबाग मध्ये ३० हजार मतांनी लीड घेतला… आताच्या स्थितीत शे. का.पक्षाजवळ आक्रमक नेतृत्त्व नाही. जयंत पाटील म्हणजे दत्ता पाटील नव्हेत… प्रभाकर पाटील नव्हेत…. मिनाक्षी पाटीलसुद्धा कितीतरी पटीने आक्रमक होत्या. त्यामुळे रायगडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कोण? आतापासून याची चर्चा करावी लागेल… उमेदवार ठरवावे लागतील… त्यांना शक्ती द्यावी लागेल…लोकांचे प्रश्न घेवून त्यांना काम सुरू करावे लागेल. वातावरण तयार करण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. शिवाय निवडणूक लोकसभेची असो…विधानसभेची असो…. ग्रामपंचायतीची असो… आजच्या राजकारणात ‘जात’ महत्त्वाची ठरते आणि ‘पैसा’ ही तेवढाच महत्त्वाचा… पूर्वी उमेदवाराला तिकीट देताना त्याची १५-२० मिनीटे मुलाखत घेतली जायची… पक्षाची धेय धोरणे, पक्षाचा कार्यक्रम, मतदारसंघातील त्याचे काम, असे अनेक प्रश्न विचारले जायचे… आता फक्त दोनच प्रश्न विचारले जातात… ‘मतदारसंघात तुझ्या जातीची मते िकती?’ आणि ‘तू िकती खर्च करू शकशील….’ लोकशाहीच्या नावावर सग्ाळ्या निवडणुका जात आाणि पैशावर लढवल्या जातात. याला कोणीच अपवाद नाही. या स्थितीत सामान्य आणि प्रामाणिक उमेदवाराला निवडणूक लढवणे अशक्य आहे. राजकारणात धटींगणपणा त्यामुळेच वाढतो आहे.
आता अहमदनगर जिल्ह्याचे उदाहरण घेऊ या… या जिल्ह्याने इतिहास घडवला… सुजय विखे यांना पराभूत करून लंके यांनी मोठा पराक्रम केला. ही लढाई विषम हाेती. शिवाय बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा सूजय विखे यांच्या लोकसभा मतदारसंघात नव्हता… तो शिर्डीत जोडला गेला अाहे. अर्थात राधाकृष्ण विखे यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघही शिर्डीतच जोडला गेलेला आहे. या विषम लढाईत लंके यांना संपूर्ण जिल्ह्याने पाठींबा दिला. आणि अशक्य वाटणारी लढाई लंके यांनी जिंकली. १९५७ ची आठवण झाली. त्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईतील रिपब्लिकन पक्षाचे अॅड. बी. सी. कांबळे यांना उभे केले. आणि विरोधात काँग्रेसचे नागवडे-पाटील होते… कांबळेसाहेबांनी त्यांना पराभूत केले. १९५७ चा चमत्कार व्हावा, असेच नगरमध्ये घडले. पण, विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात संगमनेर, श्रीरामपूर, राहता आणि कोपरगाव या चार विधानसभा मतदारसंघाखेरिज आघाडीकडे नेमके उमेदवार कोण? ते ठरवावे लागेल… त्यांची नावे आतापासून निश्चित करावी लागतील… वेळ कमी आहे… अनेक जागांवर उमेदवार निश्चित करायचे आहेत. शिवाय एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या… केंद्रातही मोदीच सत्तेवर आहेत आणि राज्यात शिंदे सत्तेवर आहेत. सत्तेचा दुरुपयोग कसा होतो, ते आपण पाहिलेले आहे. शिवाय जिथे महायुतीला पराभव डोळ्यांसमोर दिसत असेल तिथे असंख्य अपक्ष उमेदवार उभेे करण्याची चलाखी केली जाईल. जेणेकरून मतविभाजन होईल… आता शिर्डी लोकसभा मतदारसंघ बघा… तिथे उद्धव यांच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाघचौरे ४लाख ७५, ६३७ मतांनी निवडून आले. आणि शिंदे गटाचे लोखंडे यांना ४ लाख २५,४९८ मते मिळाली. जेमतेम ५ हजार मतांनी विजय मिळाला. पण एकूण १९ अपक्ष उमेदवरांनी ६० हजार मते खाल्ली.. त्या अपक्षांना उभे करण्यामागे कोण होते? ‘नोटा’ला पाच हजार मते मिळाली.
आणखीन एक धोका आहे… आघाडीतील नाराज इच्छुक उमेदवार ‘अपक्ष’ होऊ शकतात. त्यांना महायुती साधने पुरवील… कारण सगळ्यांनाच आमदार व्हायचे आहे. आमदार झाल्यानंतर लगेच मंत्री व्हायचे आहे. मंत्री झालेल्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे… १९५२ साली आमदार झालेले वसंतदादा पाटील १९७२ साली मंत्री झाले. २० वर्षे पक्षाचे काम करत राहिले. आज कोणाची २० दिवसही थांबायची तयारी नाही. अशा निसरड्या राजकारणात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना ‘महाविकास आघाडी’ने आगोदर त्या-त्या पक्षाचे उमेदवार निश्चित करून टाकावेत… सूत्र ठरवावे.. वेळ कमी असल्यामुळे आणि समोर प्रचंड साधने असलेले विराेधक आहेत. लोकसभा निवडणुकीत एका मतदारसंघात निकालानंतर आलेल्या एका वृत्तपत्राच्या अग्रलेखात चक्क ‘पोत्याने पैसा ओतला…’ असा उल्लेख आला आहे… त्यामुळे केंद्रातील मोदी आणि शहा आता महाराष्ट्रात स्वत:ची फजिती करून घ्यायला, फार सभा घेतील, असे वाटत नाही… पण भरपूर साधने त्यांच्यावजळ आहेत. पुन्हा अनेक वृत्तपत्रांना ‘पैसा ओतला’ असे लिहावे लागेल…. आिण तीच वृत्तपत्रे महायुतीच्या जाहिराती निवडणुकीच्या आगोदर छापत राहतील… त्यात पुन्हा तेच फोटो… तेच मोदी… तेच शहा… भरीला भर म्हणून नितीश कुमार आणि चंद्रबाबू आणि खाली विठोबाची मूर्ती घेतलेले शिंदे, दादा आणि फडणवीस… पहिले पान…. दुसरे पान…. तिसरे पान…. सगळ्यात खूश राहतील ती मुंबईतील वृत्तपत्रे…
त्या मानाने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहिरात अघाडीवरही दुबळे ठरतील… शिवाय प्रचाराला दिवस कमी आहेत. कोकणात सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस आहे. तेव्हा महाराष्ट्रात महायुतीचा पराभव करायचा असेल तर मतदारसंघवार आखणी करून जेष्ठ नेत्यांनी ही निवडणूक आता स्वत: हातात घ्यावी… लोकसभेची निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती. म्हणून उमेदवाराचा विचार न करता, दणका देण्याचा निर्णय मतदारांनीच घेतलेला होता. ते वातावरण विधानसभा निवडणुकीत निर्माण होणे इतके साेपे नाही. सर्व जेष्ठ नेत्यांच्या राजकीय क्षमतेची पूर्ण जाणीव असतानाही महाराष्ट्रात थोडासा विस्कळीत पणा येऊ शकतो… तो येऊ नये म्हणून जे मनात आले ते लिहिले… नेते म्हणाले त्याप्रमाणे ‘सत्ताबदल अटळ’ व्हावा, हीच इच्छा आहे.. त्यात ‘पण’, ‘परंतु’ बरेच आहेत.

 

📞9869239977

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.