ताज्या घडामोडी

⭕जरांगे फॅक्टर मुळापासून समजुन घ्या! 🔹भाग-1 प्रास्ताविक @ ओबीसीनामा- 44

⭕जरांगे फॅक्टर मुळापासून समजुन घ्या!
🔹भाग-1 प्रास्ताविक
  ♦️ ओबीसीनामा- 44

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 16/9/2025 :
बर्‍याच कार्यकर्त्यांनी जरांगेच्या मुंबई आंदोलनाच्या काळात मला फोन केलेत व प्रश्नही विचारलेत. पहिला प्रश्न हा होता की, ‘सर तुम्ही मराठा आरक्षणावरील प्रत्येक मुद्दयावर व प्रत्येक घटनेच्या वेळी खूप कृतीशिलता व विचारशिलता दाखवित होतात. परंतू जरांगेच्या मुंबई आंदोलनाच्या काळात तुमची उपस्थिती कुठेच दिसली नाही. ना मार्गदर्शक लेख, ना व्याख्यान आणि ना एखादे आंदोलन! तुमच्यातला आक्रमक व बेधडक नेता शांत कसा? यावरही मार्गदर्शन झाले तर सत्य काय ते कळेल. कारण ओबीसीतले बहुतेक नेते हे कोणत्या ना कोणत्या गॉडफादरच्या दावणीला बांधलेले असतात, त्यामुळे ते पूर्ण सत्य कधीच सांगत नाहीत.’
अशा प्रश्नांना काय उत्तर द्यावे, या संभ्रमात मी होतो. कारण जे मी सांगू ईच्छित नव्हतो, तेच माझ्या लेखणीकडून वा तोंडाकडून वदवून घेण्याचा प्रयत्न हे ओबीसी कार्यकर्ते करीत होते. असेच प्रश्न विचारणारा व अशीच गळ घालणारा फोन मला काल दिल्लीच्या ‘फॉरवर्ड प्रेस’चे संपादक नवल कुमार यांनी केला. त्यांना मी कारणे सांगितलीत परंतू ती कारणे त्यांना थांबवू शकली नाहीत. त्यांनी मला अनेक सिद्धांत, अनेक उदाहरणे देऊन पटवून दिले की, मी आज लिहिलेच पाहिजे. मी न लिहीण्याची कारणे सांगूनही नवल कुमार थांबले नाहीत, ते पुढे बोलतच राहीलेत. ते फोनवर पुढे म्हणाले की, ‘‘तुमचे आजचे लेख वा व्याख्याने आजचे लोक वाचणार नाहीत, एकणार नाहीत, वाचले तर समझणार नाहीत, समजले तरी तसे वागण्याची हिम्मत ते करू शकणार नाहीत, आणी ज्यांच्यात हिम्मत आहे, ते आपापल्या गॉडफादरच्या दबावाखाली असतील. पण उद्याची पिढी कदाचित तुमच्यापेक्षा जास्त आक्रमक व बेधडक असेल व ती पिढी तुमचे आजचे लेख वाचून उद्या तसे वागण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्यासाठी तरी तुम्ही लिहीलेच पाहिजे.’’
मी त्यांना लिहीण्याचे आश्वासन दिले व फोन बंद केला. परंतू या निमित्ताने एक जुना प्रसंग आठवला. कार्यकर्त्यांशी चर्चा करतांना हे मुद्दे मांडले गेलेत. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व बाबासाहेब डॉ. आंबेडकरांच्या काळातही असाच प्रश्न कुणी तरी विचारला असेल काय? ‘‘तात्यासाहेब-बाबासाहेब, कोणासाठी लिहित आहात तुम्ही? किती दलित-बहुजन शिक्षित आहेत? तुमचे लिखाण तर ब्राह्मणच जास्त वाचतात व सतर्क होतात.’’ तेव्हा या प्रश्नाचे उत्तर असेच दिले गेले असेल कि ‘उद्याची पिढी वाचेल व चळवळ पुढे नेईल.’
परंतु आजची पिढी पाहून फार काही समाधान वाटत नाही. आज 200-250 वर्षांनंतर तात्यासाहेब-बाबासाहेबांच्या पुस्तकांची विक्रमी छपाई व विक्रमी विक्री होते आहे. यावरून हे सिद्ध होते की आजची पिढी वाचते आहे व समजतेही आहे. तात्यासाहेब-बाबासाहेब वाचून काय समजली आजची पिढी? आजची पिढी हे समजली की, तात्यासाहेबांनी-बाबासाहेबांनी लेखणीतून जी हत्यारे दिली आहेत, ती हत्यारे वापरून क्रांती करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, त्याग करावा लागेल व प्रसंगी कफल्लकही व्हावे लागेल. त्या पेक्षा ही हत्यारे प्रस्थापित मराठा-ब्राह्मणांकडे गहाण ठेवली तर आपण जास्त पैसे कमवू शकतो व जास्त सूख सोयी मिळवू शकतो. लढण्यापेक्षा गहाण पडणे जास्त फायदेशीर असते. क्रांतीपेक्षा प्रतिक्रांतीच जास्त फायदेशीर आहे. लढवैय्या नेत्यापेक्षा गहाण पडलेल्या नेत्याला जास्त सत्ता, संपत्ती व सन्मान मिळतो. एका पक्षाचा संस्थापक-अध्यक्ष खाजगीत सांगतो की, ‘‘आपल्या पक्षाचे आमदार-खासदार निवडून आणण्यापेक्षा त्यांना पाडून दुसर्‍या प्रस्थापित पक्षांचे आमदार-खासदार निवडून आणण्यात मला जास्त फायदा मिळतो.’’ आर.एस.एस. चे उमेदवार असलेले नितीन गडकरी यांना निवडून आणण्यासाठी त्याच मतदारसंघात 18 बौद्ध लोक निवडणूक लढवतात. तात्यासाहेबांचे फक्त नाव वापरून करोडो रूपयांची संपत्ती कमविता येते, मग त्यासाठी सर्व मराठे ओबीसीमध्ये घुसलेत तर चिंता करण्याचे काही कारण नाही. बाबासाहेबांना विकून केन्द्रात मंत्रीपद मिळविता येते.
आणी केवळ तात्यासाहेब-बाबासाहेब यांचेच उदाहरण देऊन भागणार नाही. प्रत्येक जातीतील विद्वानांनी इतिहास-पुराणातून आपापल्या जातीचे संत, महात्मे व महापुरूष शोधून काढले आहेत. श्रीमंत चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर, महादेवाची पींड हातात घेतलेली महाराज्ञी अहिल्यामाई होळकर, संत गाडगे महाराज, संत सेना महाराज, संत रईदास, संत सावता, संत नामदेव असे असंख्य आहेत. जातीच्या संघटना वा पक्ष स्थापन करायचे व आपापल्या जातीच्या संत-महापुरूषांना रेट बोर्डप्रमाणे विकून धंदा करायचा! हा रेट बोर्ड ब्राह्मण-मराठ्यांनी आधीच तयार करून ठेवलेला आहे व तो बाजारातील चौकात लावलेला आहे. महापुरूषांचे फोटो व मुर्त्या विकण्यापेक्षा खुद्द महापुरूषांनाच विकले तर जास्त किंमत मिळते. महापुरूष विकून धंदा करणारे नेते इतके चतूर असतात की ते आपल्या महापुरूषाची किंमत जास्त कशी मिळेल याचीही युक्ती शोधून काढतात. भाजीपाला विकणारा व्यापारी आपल्या मालाबद्दल बाजारात ओरडून सांगतात की ‘ताजा भाजीपाला, हिरवागार भाजीपाला’ असे मोठ्याने ओरडून सांगतो. फुले-आंबेडकरांची किंमत चांगली मिळावी यासाठी आपले धंदेवाईक व्यापारी बाजारात मोठ-मोठ्याने ओरडून सांगतात की, ‘फुले-आंबेडकर हे ब्राह्णांच्या विरोधात नव्हते तर ते ब्राह्मणवादाच्या विरोधात होते.’ ‘बाबासाहेबांनी मराठ्यांनाही आरक्षण देऊ केले होते.’ ‘तात्यासाहेब तर खासा मराठा म्हणून त्यांनाही शूद्र मानत होते.’ असे मोठ्याने ओरडून सांगीतले की बाजारातील ब्राह्मण-मराठा नेते माल खरेदीसाठी येतात व चांगली किंमत देउन जातात. तलवारीच्या धाकाने ब्राह्मण-पेशव्यांना आसमान दाखवणारी क्रांतीकारी महाराज्ञी अहिल्यामाई होळकर यांच्या हातात तलवार देण्याएवजी महादेवाची पींड दिली की प्रस्थापित खरेदीदार खूश होतात. आण्णा भाऊ साठे यांना ‘कॉम्रेड’ पदावरून खाली ओढून ‘लोकशाहीर’ पदावर बसविले की किम्मत चांगली मिळते. बाजारात उभे राहून मार्क्सची स्तूती करतांना ‘‘वर्ग नष्ट झालेत की जाती आपोआप नष्ट होतील’’ असे सांगीतले की ब्राह्मणांना वाटते मार्क्सवादामुळे जातीव्यवस्थेला काहीच धक्का बसणार नाही, आपला ब्राह्मणवाद अबाधित राहील, याची खात्री पटल्यावर मोठ्या प्रमाणात ब्राह्मण येतात व मार्क्सला डोक्यावर घेउन बँड बाजा लावून मिरवत मिरवत घरी नेतात. शुद्रादिअतिशूद्रांचे राजे कुळवाडी कुळभूषण छत्रपती शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ म्हणून स्वीकारून मराठ्यांनी किती मोठी किंमत ब्राह्मणांकडून वसूल केली आहे, आजही करीत आहेत. ब्राह्मणांच्या मांडीला-मांडी लावून मराठे गेल्या अर्धशताकाहून जास्त काळ महाराष्ट्राची सत्ता भोगत आहेत व अजूनही पुढे किती वर्षे सत्ता भोगत राहतील हे सांगू शकत नाहीत.
आता हे प्रास्तविक पुराण बंद करून आपण जरांगे प्रकरणाकडे वळू या! लेखाच्या उत्तरार्धात जरांगे फॅक्टर व दोन जी.आर. याची चर्चा करू या! आता तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की, प्रास्ताविकातील विश्लेषणाचा जरांगे फॅक्टरशी काय संबंध? तर याही प्रश्नाचे उत्तर आपण लेखाच्या दुसर्‍या भागात शोधू या!
तो पर्यंत जयजोती, जयभीम, सत्य कि जय हो!

प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्क नं.- 8177861256 किंवा 75 88 07 2832
======================

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button