निरोप
निरोप
Akluj Vaibhav News Network.
🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/07/2024 :
टाळ वीणा पखवाज
सारे थांबले आवाज
विठ्ठलाशी गळाभेट
एकादशीचा रिवाज
तृप्त झाले वारकरी
पाहुनीया गोड हरि
जो तो निरोप घेऊन
सोडू लागला पंढरी
निरोपात भक्त म्हणे
काही वाटलेच उणे
तरी लेकरू म्हणोनी
विठू सांभाळून घेणे
तुझी दगदग झाली
नाही उसंत मिळाली
कर आराम विठ्ठला
वारी माघारी निघाली
देवा सांभाळ स्वतःला
नको त्रासवू जीवाला
डोळा पाणी नको विठू
भेटू येत्या कार्तिकीला
कसे सांग हरि राहू
पाट लागलेत वाहू
रोपं वाढायाच्या आत
थोडे शिवारही पाहू
दरवर्षी हेच होते
मन हेलावून जाते
तुझे भरलेले डोळे
घोर दुःख जीवा देते
सारं तुला कळतंय
परी नाही वळतयं
मन कशास विठ्ठला
भक्तापाठी पळतयं
ताजी घेतली भाकरी
बघ बांधली शिदोरी
विठू निघायच्या आधी
पुन्हा भेटू उराउरी
आम्ही सावकाश जाऊ
नको वेशीवर येऊ
जड पावल तशीही
आता ओढतच नेऊ
तुझ्याविना चैन नाही
जीव पंढरीत राही
तुझी आठवण येता
होते काळजात काही
ओस वाटेल पंढरी
घरी जाता वारकरी
परि काळजी नसावी
विठू भेटू लवकरी
प्राची गडकरी
(डोंबिवली)