ताज्या घडामोडी

प्रज्ञावंत तर्कतीर्थांचे पुण्यस्मरण…

प्रज्ञावंत तर्कतीर्थांचे पुण्यस्मरण…

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State. India.
Mo.98 60 95 97 64

मुंबई दिनांक 22/05/2024 :

सोमवार, दिनांक २७ मे २०२०४ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीजींची ३० वी पुण्यतिथी आहे. त्याच दिवशी सकाळ उजाडत असताना शास्त्रीजींना झोपेतच नियतीने गाठले होते. ज्ञाानाची तपस्या करणाऱ्या ब्रह्मऋषीला पुण्याचेच मरण आले असे मरण यायला भाग्य लागते. ९४ व्या वर्षी झोपेमध्येच शास्त्रीजींनी चिरविश्रांती घेतली.
महाराष्ट्राच्या या प्रकांडपंडिताची आणि प्रज्ञाावंताची ओळख महाराष्ट्र विसरलेला आहे. पण, वाईची प्रज्ञा पाठशाला आणि त्यातील विश्वकोषाचे १८ खंड ही महाराष्ट्राची ज्ञाानगंगा आहे. कृष्णामाईच्या तीरावर प्राज्ञापाठशालेची वास्तू ९६ वर्षांपूर्वी उभी राहिली. आता नवीन इमारतही झाली. या वास्तुमध्ये १२ हजारांपेक्षा अधिक ग्रंथ हे महाराष्ट्राचे मोठे धन आहे.
यशवंतराव चव्हाण १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १ नोव्हेंबर १९६० ला म्हणजे बरोबर ६ महिन्यांनी यशवंतरावांनी साहित्य-संस्कृती मंडळाची स्थापना केली. त्याचे अध्यक्षपद कोणाला द्यायचे? महाराष्ट्रात विद्वानांची कमी नाही. महाराष्ट्राची निर्मिती ख्रिस्तपूर्व ८ व्या शतकात झाली. ज्ञाानकोषकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी ‘इनस्ाायक्लोपीडीया’ या इंग्रजी शब्दाचा ‘ज्ञाानकोष’ हा प्रतिशब्द प्रमाणित केला. त्या ज्ञाानकोषकार केतकरांची परंपरा महाराष्ट्रात ज्यांनी पुढे चालवली ते लक्ष्मणशास्त्री आहेत. केतकर यांच्याही एक पाऊल पुढे जाऊन शास्त्राचा अर्थ सांगताना शास्त्रीजींनी पहिल्या प्रथम हे जाहीर केले की, हिंदू धर्मशास्त्रामध्ये अस्पृश्यतेला कुठेही आधार नाही. महात्मा गांधी यांच्या समोर त्यांनी हा विचार स्पष्ट केला होता. सतीच्या चालीला धर्मशास्त्राचा आधार नाही. असाही तर्क शास्त्रीय पुरव्यांनी शास्त्रीजींनीच पहिल्याप्रथम जाहीरपणे सांिगतला. अशा या शास्त्रीजींची आठवण यशवंतरावांना नेमकी आणि नेमक्यावेळी झाली. १९३० साली यशवंतराव जेव्हा तरुण वयात स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले होते त्यावेळी शास्त्रीजींचे भाषण त्यांनी ऐकले होते. शास्त्रीजी विद्वान आहेत, हे सर्वांना माहिती होते. पण, गांधीजींच्या असहकार आंदोलनात उतरल्यावर शास्त्रीजींनी घोषणा दिली होती… ‘शास्त्र हे शस्त्र बनले पाहिजे….’ यशवंतरावांच्या कानात ते शब्द तब्बल ३० वर्षे घुमत असले पाहिजेत… यशवंतरावांनीच शास्त्रीजींना अध्यक्ष होण्यासाठी विनंती केली आणि महाराष्ट्राच्या ज्ञाानसंपदेचा हा फार मोठा ठेवा त्यामुळे शास्त्रीजींच्याकडून निर्माण झाला. त्याचे श्रेय जसे शास्त्रीजींना आहे, तेवढेच यशवंतरावांनाही आहे. कारण ज्ञाानाची आणि गुणांची पूजा कुठे करता येईल याचा पत्ता माहिती असणे हेसुद्धा सुसंस्कृत नेतृत्त्वाचे सगळ्यात मोठे लक्षण आहे! शास्त्रीजींनी सुरुवातीला नकार दिला होता. आणि कारण असे सांगितले होते की, ‘माझ्या कामात तुम्ही रोज फोन करून असं करा…. तसं करा… असे सांगणार…’ यशवंतराव म्हणाले की, ‘शास्त्रीजी मी कसलाही हस्तक्षेप करणार नाही.’ आणि मग देशामध्ये पहिल्याप्रथम साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती महाराष्ट्रात झाली. त्यावेळच्या भाषणात यशवंतरावांनी सांगितले होते, ‘सरकारला दोन डोळे असतील तर… त्यतील एक डोळा ‘सांस्कृतिक’ असला पाहजे….’ यशवंतरावांचे हे भाषण चालू असताना शास्त्रीजींनी टेबलावर टिचकी वाजवून त्यांना थांबवले आणि बसल्या बसल्या शास्त्रीजी म्हणाले, ‘दोन डोळे असतील तर ठीक आहे… पण, सरकारला एकच डोळा असला तर…’ यशवंतरावजी क्षणात म्हणाले, ‘एक डोळा असला तर तो ‘सांस्कृतिक’ असेल तर दुसरा डोळा उघडू शकेल….’ यशवंतरावांच्या या वाक्यावर उपस्थित असलेल्या मोजक्या बुद्धिवंतांनी वाजवलेल्या टाळ्या आजही आठवतात… अशा सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांनी शास्त्रीजी यांच्यावर दिलेली जबाबदारी शास्त्रीजींनी कठोर परिश्रम, मेहनत, संशोधन अशी दोन तपे म्हणजे तब्बल २४ वर्षे काम करून फार मोठे संचित महाराष्ट्रासाठी निर्माण केले. ज्यांनी प्राज्ञा पाठशाला पाहिली असेल, तेथील १२ हजार ग्रंथ कसे जपून ठेवले आहेत… अधुनिक ज्ञाान-विज्ञाानाची गंगाेत्री मराठीत भाषांतरीत होऊन कृष्णा काठावर कृष्णामाईच्या साक्षीने आज सर्वांना उपलब्ध आहे. अशा शास्त्रीजींची तिसावी पुण्यतिथी महाराष्ट्र किती दखल घेईल, माहिती नाही. महाराष्ट्रातील आजचे राजकीय, सामाजिक वातावरण हे सुसंस्कृत नाही… तसेच ज्ञाान-विज्ञाानाच्या बाबतीत अनुकूल नाही. काहीसे धटींगण झालेले आहे. या वातावरणात शास्त्रीजी, त्यांची प्राज्ञा पाठशाला याचे महत्त्व सरकारला वाटणे जवळपास अशक्य आहे. त्यासाठी यशवंतरावांसारखाच कुशल नेता असावा लागतो. फार थोड्या नेत्यांना या कामाचे मोल माहिती आहे. त्याची जाणीव आहे. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर सौ. प्रतिभाताईंसह त्यांनी शास्त्रीजींच्या भेटीकरिता प्राज्ञा पाठशाला गाठली. दोन तास चर्चा केली. सुधाकरराव नाईकही प्राज्ञा पाठशालेत गेले हाेते. मनोहर जोशीही मुख्यमंत्री असताना गेले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी ८ व्या विश्वकोषाचे अनावरण केले होते. आणि ते म्हणाले होते की, ‘विश्वकोष कोषात राहू नये….’ त्यानंतर सरकारी मदतीने या सर्व ग्रंथांचे ‘डिजीटायझेशन’ ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागली. सध्या काय परिस्थिती आहे, माहिती नाही… सध्याचा सांस्कृतिक मंत्रीही प्रज्ञाा शाळेत कधी पोहोचलेला नाही. ते असो… सध्या महाराष्ट्राची चाल ज्ञाान-विज्ञाानाच्या वाटेने नाही, त्यामुळे ही अपेक्षाही नाही. पण, यशवंतराव, शरदराव, मनोहर जोशी, विलासराव, यांच्यासारखे नेते आता विरळ आहेत. अनेक राजकीय नेत्यांना महाराष्ट्रातील ‘वाई’ हे गाव कशाकरिता प्रसिद्ध आहे, याचीही माहिती नसेल. अजितदादा पवार साताराचे पाच वर्षे पालकमंत्री होते. पण, प्राज्ञा पाठशालेत कधी फिरकल्याची नोंद नाही.कदाचित किसन वीर यांच्याशी दादांचे जमत नसल्यामुळे असेल… पण त्यांनी जायला हवे होते. अर्थात त्यामुळे शास्त्रीजींच्या कामाला किंवा प्राज्ञा पाठशालेला कसलाही उणेपणा येत नाही. महाराष्ट्राकरिता ज्ञाान-विज्ञाानाचे हे मोठे धन हीच खरी महाराष्ट्राची संपत्ती आहे. यशवंतरावांनी शास्त्रीजींची गुणवत्ता जाणली होती. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे….
गुणी गुणं वेत्ति न वेत्ति निर्गुणः
बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बल:।
पिको वसन्तस्य गुणं न वायस:
करी च सिंहस्य बलं न मूषक:

‘तर्कतीर्थ’ ही शास्त्रीजींची पदवी त्यांना वयाच्या २२ व्या वर्षी काशी येथे देण्यात आली होती. वेदशास्त्राचे अध्ययन करायला ते काशीमध्ये हाेते. २२ व्या वर्षी ‘तर्कतीर्थ’ ही पदवी मिळवणारे या देशातील ते एकमेव आहेत. वेद आणि वेदांचा अर्थ, धर्म आणि धर्मशास्त्राचा अर्थ अनेकवेळा विकृतपणे सांगितला जातो. पण शास्त्रीजींचे पांड्ित्य पुस्तकी नव्हते. कृतीशील होते. १९३३ साली शास्त्रीजींनी त्यांच्या घरात एका अस्पृश्य मुलाला संस्कृत अध्ययनासाठी ठेवून घेतले होते आणि या मुलाला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शास्त्रीजींकडे पाठवले होते. त्याचे राहणे, जेवणखाण हे सर्व शास्त्रीजींच्या घरी असायचे. एका अस्पृश्य मुलाला संस्कृतचे पाठ देणारे शास्त्रीजी. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी वाईच्या एकदिवस शास्त्रीजींच्या या पुरोगामी विचारांची जाहीर सभेत स्तुती केली होती. शास्त्रीजींच्या घरातील स्वयंपाकिण सावित्री गायकवाड ही अस्पृश्य समाजाची हाेती. शास्त्रीजींची ‘तर्कतीर्थ’ पदवी किती पुरोगामी विचारांची होती याची प्रत्यय देणारी ही उदाहरणे आहेत. अशा या शास्त्रीजींनी साहित्य-संस्कृती मंडळाचे आणि विश्वकोषाचे एवढे प्रचंड काम उभे करून ठेवले आहे.
वाईची ही परंपरा आहे. वाई या शब्दाचा दुसरा पर्यायी शब्द…. ‘आई’ हाच असू शकतो, असे मी मानतो. कारण जन्मलेल्या प्रत्येक मुलाची पहिली शिक्षिका त्याची माताच असते. वाई ने ही परंपरा जपली आहे. त्यामुळेच प्राज्ञा पाठशालेत पूर्वी म्हणजे १९ व्या शतकात ‘अॅथल्लो, कोलंबसाचा वृत्तांत, पदार्थ विज्ञाानशास्त्र अशी पुस्तके महादेवशास्त्री कोल्हटकरांनी प्रसिद्ध केली. विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार त्यांनीही केला होता. आप्पाशास्त्री राशीवडेकर आणि महादेवशास्त्री दिवेकर यांनी धर्मबाह्य शुद्धीकरण, अस्पृश्यतेचे उच्चाटण, बुवाबाजी याच्यावर प्रहार केले होते. ही सगळी पुराेगामी परंपरा पुढे नेणारे शास्त्रीजीच होते. त्यांनी वाईमध्ये प्राज्ञा पाठशालेच्या कामासाठी एका भव्य अशा प्रिंटींग प्रेसची निर्मिती केली. गोरखपूर येथील ‘गीता प्रेस’ जेवढा भव्य आहे त्याचप्रमाणे वाईमधील पाठशालेचे शाळेचा प्रिटींग प्रेस अद्ययावत आहे. गेल्या ५०० वर्षांतील सहा हजार ग्रंथ या प्रज्ञा पाठशाळेमध्ये किती काळजीने जपून ठेवले आहेत… एकूण १२ हजार ग्रंथांची सूची पाठशालेत आहे. श्री. अनिल जोशी या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाने शास्त्रीजींपासून प्रेरणा घेवून प्राज्ञापाठशालेची कामगिरी पुस्तक रूपाने महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली. प्रख्यात पत्रकार रामभाऊ जोशी यांचे ते नातू आहेत. शास्त्रीजींच्या सोबत त्यांनी काम केले आहे. त्यांच्या अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यामुळे शास्त्रीजींच्या कामाची माहिती महाराष्ट्रात पोहोचवण्याचे काम अनिलभाऊंनी मनस्वीपणे केले आहे. महराष्ट्र त्यांचाही कृतज्ञा आहे.
मी स्वत:ला असा भाग्यवान समजतो की, माझ्या पत्रकारितेच्या ६५ वर्षांत शास्त्रीजींना भेटता आले. यशवंतरावजींकडे शास्त्रीजी यायचे, ग. दी. माडगूळकर यायचे. बाबुराव पारखे यायचे… आणि साहित्याची जी मैफल जमायची अशा मैफली आता होणे नाहीत. ते नेतेही होणे नाहीत…. शास्त्रीजींसारखे विद्वानही नाहीत. यशवंतरावांच्या अनेक राजकीय भूमिकांत शास्त्रीजींनी मार्गदर्शकाची भूमिका अितशय शांतपणे पण निश्चयाने निभावलेली आहे. अनेकांना हे माहिती नसेल की, यशवंतराव विरोधी पक्षनेते म्हणून लोकसभेत असताना त्यांच्या मवाळ भूमिकेबद्दल शास्त्रीजींनी त्यांना सांगितले होते की, ‘विरोधी पक्षनेता हा आक्रमकच असायला लागतो.’ इंदिरा काँग्रेसच्या प्रवाहापासून यशवंतराव अलग झाले तेव्हा ‘तुम्ही स्वगृही गेले पाहिजे,’ हा यशवंतरावांना पहिला सल्ला शास्त्रीजींनीच दिला होता. आणि नंतरच यशवंतराव इंिदरा काँग्रेसमध्ये टीका सहन करून दाखल झाले.
‘साहित्यिकांच्या संमेलनात शासकीय हस्तक्षेप असावा की नसावा,’ ‘शासकीय अनुदानावर साहित्य संमेलने व्हावीत की होऊ नयेत’ याबद्दलही शास्त्रीजींनी आपली मते ठामपणे मांडलेली होती. १९५२ च्या पुणे येथील साहित्य संमेलनात दुर्गाबाईंच्या भाषणामुळे संमेलनात जो गांेधळ झाला त्यावरचे शास्त्रीजींचे विश्लेषण त्यांच्या व्यापक भूमिकेचे निदर्शक आहे. १९७५ साली कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाबाई होत्या. त्यांनीच यशवंतरावांना स्वागताध्यक्षाचे निमंत्रण दिले हाेते. त्यानंतर २४ जून १९७५ ला आणीबाणी जाहीर झाली. मग दुर्गाबाईंनी भूमिका बदलली. ‘यशवंतरावांना व्यासपीठावर येऊ देणार नाही.’ यशवंतराव संमेलनाला गेले… स्वागताध्यक्षाचे भाषणही त्यांनी केले. त्यापूर्वी ते पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्या शेजारी लक्ष्मणशास्त्री होते. कराडचे नगराध्यक्ष पी. डी. पाटील होते. प्रतापराव भोसले हाेते. स्वागताध्यक्ष म्हणून भाषण करताना यशवंतरावांनी तेव्हा सांगितले हाेते की, ‘समोर शास्त्रीजी बसलेले आहेत. त्यांना साक्ष ठेवून सांगतो की, या संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून आमंत्रण स्वीकारताना मी केंद्रीय मंत्री म्हणून आमंत्रण स्वीकारलेले नव्हते. कराडचा नागरिक आणि मराठी साहित्याचा रसिक-वाचक या नात्याने मी संमेलनाला आलो आहे. शिवाय हे संमेलन संगमावर आहे. ‘संगम’ म्हणजे काय….? इथे कृष्णा नदी कोयना नदीत मिसळते… ती मिसळत असताना आपले ‘मी’ पण विसरते. आणि कोयना कृष्णेत मिसळते तेव्हा तीही आपले ‘मी’ पण विसरते. मराठी साहित्यिकांनी आपले ‘मी’पण थोडेसे विसरायला शिकले पाहिजे…’ स्वागताध्यक्षांच्या भाषणाने संमेलन जिंकले. असा तो अभूतपूर्व प्रसंग पाहण्यास समक्ष शास्त्रीजी समोर हाेते. त्यांनीच यशवंतरावांच्या भाषणावर पहिली टाळी वाजवली. त्याचे वृत्तसंकलन करायला मीही पत्रकार कक्षात होतो. ‘सागर’चे संपादक नाना जोशी हेही होते.


शास्त्रीजी, यशंवतराव, किसन वीर, वसंतदादा असे सातारा जिल्ह्यातील त्यावेळचे राजकारण, साहित्य यातील सर्व दिग्गज महाराष्ट्राचे वैभवच हाेते. शास्त्रीजींच्या तोडीची आणि कतृत्त्वाची माणसे आता होणार नाहीत. पण, त्यांनी उभे केलेले काम त्याच निष्ठेने पुढे नेण्याचा संकल्प महाराष्ट्राने जपला पाहिजे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींना आयुष्यात किती पुरस्कार मिळाले… त्याची यादी एवढी मोठी आहे की, त्या माणसाचे मोठेपण त्या पुरस्कारामुळे नाही तर पुरस्कारांना शास्त्रीजींमुळे मोठेपणा आला. शास्त्रीजी पद्मविभूषण होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. न्यूयॉर्क येथे त्यांचा सत्कार झाला होता. मास्को येथील प्राच्यविद्या धर्म परिषदेला ते भारताचे प्रतिनिधी होते. १९५४ सालच्या दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हाेते. मुंबई विद्यापीठाने त्यांना एल. एल. डी. पदवी दिली होती. पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्या संस्थेचे ते अध्यक्ष होते. फाय फाऊंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळालेला होता. आणि हे सर्व पुरस्कार मिळत असताना त्यांनी स्वत:चे ११ ग्रंथ निर्माण केले. आणि विश्वकोषाचे ११ ग्रंथ त्यांनीच निर्माण केले. लोकमान्य टिळक यांनी ज्यांच्या पाठीवर हात ठेवला होता, असे शास्त्रीजी…. शास्त्रीजी यांनी धर्मशास्त्राचा पुरोगामी अर्थ महाराष्ट्रात हिरीरिने मांडला आणि अस्पृश्यतेच्या विरोधात या धर्म पंडिताने धर्मशास्त्राचा आधार दिला. अनेक विधवांना पुन्हा संसारात आणले. आणि त्यालाही धर्मशास्त्राचा आधार दिला. ‘सतीची चाल माणुसकीचा घात करणारी आहे.’ असे स्पष्ट सांगणाऱ्या पुरोगामी शास्त्रीजींना महाराष्ट्र विसरला तर नाही ना? त्यांच्या ३० व्या पुण्यतिथीला त्यांना अभिवादन करताना शास्त्रीजींच्या सर्व पुरोगामी परंपरा महाराष्ट्राने पुढे नेल्या पाहिजेत, एवढीच अपेक्षा…
सध्या एवढेच.

मधुकर भावे
📞9766995904

🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button