ताज्या घडामोडी

आचार्य अत्रे पुरस्कार मधु मंगेश यांना उमद्या मनाच्या रामभाऊ यांच्या हस्ते…

आचार्य अत्रे पुरस्कार मधु मंगेश यांना
उमद्या मनाच्या रामभाऊ यांच्या हस्ते…

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 7/8/2023 :
१३ ऑगस्टला आचार्य अत्रे यांची १२५ वी जयंती. गेली अनेक वर्षे या दिवशी ‘आत्रेय’ संस्थेकडून ॲड. राजेंद्र पै यांच्यातर्फे एका महनीय व्यक्तीला ‘साहित्य सम्राट आचार्य अत्रे जीवन गौरव पुरस्कार’ दिला जातो. गतवर्षी कवीश्रेष्ठ ना. धो. महानोर यांना जळगाव येथे कार्यक्रम करून हा पुरस्कार दिला गेला. अशोक जैन यांनी सगळा कार्यक्रम अंगावर घेतला आणि प्रभावीपणे यशस्वी केला.
यावर्षीचा पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झालेला आहे. मधु मंगेश यांचे वय अधिकृतपणे ९१ आणि खरे वय ९३. म्हणजे काय गंमत आहे…? त्यांचा जन्म झाला तो २८ एप्रिल १९३१ ला. त्यांच्या आजोबांनी खडूने ती तारीख घराच्या भालावर लिहून ठेवली आहे. पण ज्या माणसाने त्यांना शाळेत पहिल्या दिवशी नेले त्याने चुकून तारीख सांगितली की, २८ एप्रिल १९३३. त्यामुळे मधु मंगेश आपल्या जन्मतारखेपुढे २८ एप्रिल १९३१/१९३३ असे लिहितात. दोन जन्मतारखा लिहिणारा हा जगातला एकमेव लेखक. आणखी एक वैशिष्ट्य : अधिकृत तारखेप्रमाणे यांचे वय सध्या ९१. अनधिकृत तारखेप्रमाणे ९३. अगदी ९१ वर्षे धरले तरी आजच्या तारखेला त्यांच्या नावावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या ८१ आहे. किती? ८१… कादंबऱ्या १३, कथासंग्रह ४२ ,८ ललित लेख, ३ व्यक्तीचित्र, १ चरित्र, संकिर्ण ३, कवितासंग्रह १, नाटकं २, अनुवादित १, आत्मचरित्र १, बाल वाडं:मय ४, संपादित केलेली पुस्तके ६ अशी ही एकूण बेरिज करा…
सगळी पुस्तकं एका तागडीत टाकली तर कोकणी भाषेत एक मण होतात.. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या ४० आहे. या लेखकाने ६० वर्षे सतत लेखन केले. हा व्याप करत असताना मराठी साहित्य संमेलन कोकणात का नको? मराठी साहित्य परिषदेची शाखा कोकणात का नको? हवीच… हा आग्रह धरून १९९१ साली कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन केली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मधु मंगेश यांनी कोकणी माणसांना गाठून शाखा स्थापन केली. ज्याला ‘को. म. सा. प.’ असे म्हणतात. अशी १५ विभागीय साहित्य संमेलने त्यांनी भरवली. त्यातून १९९० साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी येथे भरवले. त्याचे अध्यक्ष मधु मंगेश हेच झाले. महाराष्ट्र शासनाचे ‘साहित्य संस्कृती मंडळ’ आहे त्याचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे होते. त्या पदावर मधु मंगेश यांची नियुक्ती शासनाने केली आणि सलग ७ वर्षे ते अध्यक्ष होते. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय विद्या परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. साहित्य अकादमीचे ते सल्लागार झाले. मुंबई मराठी साहित्य संघ या ख्यातनाम संस्थेचे अध्यक्ष झाले. नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ या ख्यातनाम संस्थेचे अध्यक्षही मधु मंगेशच… याच संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘जनस्थान’ पुरस्कार मधु मंगेश यांना अध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांना दिला गेला. त्यांच्या साहित्यामधील विद्यापीठीय अध्यासक्रमात अनेक विषय समाविष्ट केलेले आहेत. एम.फिल साठी त्यांचेच साहित्य लावलेले आहे. बालभारतीची चौथी ते नववीसाठी मधु मंगेश यांची पुस्तके लावलेली आहेत. मुंबई विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठाने ‘माहीमची खाडी’ही त्यांची कादंबरी अभ्यासासाठी लावलेली आहे. औरंगाबादचे डॉ. महेश खरात यांनी ‘मधु मंगेश कर्णिक – व्यकि्तमत्त्व आणि वाडंमयीन कर्तृत्त्व’ हा प्रबंध लिहिला… ग्रंथरूपाने तो प्रकाशित झाला. त्याला मराठवाडा विद्यापीठाने ‘पी. एच. डी.’ दिली. शिवाजी विद्यापीठानेही दिली. मधु मंगेश यांच्या साहित्यातील ‘स्त्री जीवन’ या विषयावर मुंबई विद्यापीठाने स्मिता पोपट यांना एम. पी. एलसाठी सन्मानित केले. प्रख्यात दिग्दर्शक प्रकाश मेहरा (जंजीर फेम) यांच्या ‘घुंगरू’ या चित्रपटाची पटकथा मधु मंगेश कर्णिक यांची आहे. दूरदर्शनवर त्यांच्या कथा संग्रहावरती आधारित अनेक कार्यक्रम प्रसारित होतात.
आता आणखीन एक अभिनंदनीय असा विषय पहा…. मधु मंगेश यांनी भरपूर लेखन केले… पण या लेखकावर १३ जणांनी स्वतंत्र पुस्तके लिहिली. त्यात सुभाष भेंडे यांच्यासारखा लेखक आहे.
असे हे मधु मंगेश कोकणातील करूळ या गावचे. त्यांच्या वडिलांचे नाव मंगेश. कर्णिक हे त्यांचे आडनाव नाही… पेशव्यांकडून त्यांना जी सनद मिळाली त्या सनदीला कर्णिक म्हटले जायचे. त्यातून आडनाव कर्णिकच पडले. ज्या करुळ गावात त्यांचा जन्म झाला. ते गाव अडीचशे वर्षांपूर्वी कर्णिकांच्या पूर्वजांनी वसवले. कर्णिक यांचे शिक्षण फक्त मॅट्रीकपर्यंत आपण उच्च शिक्षण घेवू शकलो नाही याची त्यांना कायम खंत आहे. पण त्यांचे कुठेच अडले नाही. जीवनाची सुरुवात महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळात प्रसिद्धी विभागात झाली. मग ते पी. आर. ओ. झाले. पुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वसंतराव नाईक आल्यानंतर त्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून त्यांनी मधुमंगेश यांना घेतले. नंतर महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणूनही त्यांनी नेमणूक झाली. आणखी एक गंमत म्हणजे या धडपड्या माणसाने कोकणात एक काच कारखाना काढण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयोग फसला. तो कारखाना त्यांना चालवता आला नाही. आयुष्यात एकाच विषयात त्यांना अपयश आले. तेव्हापासून ‘कांच’ म्हटले की, ते जरा लांब राहतात. त्यांचा ‘झुंबर’ नावाचा कथासंग्रह आहे. त्यात एक कथा आहे… लेखक त्याच्या मित्रासह गावाला गेल्यावर समुद्र किनाऱ्यावर लाटांमध्ये जाऊन उभा राहतो.. पायजमा वर करतो… त्याच्या पायाला जखम झाल्याची जाणीव होते… पाय उचलतो तर रक्ताची धार लागलेली. … पायाखाली काय आले हे बघायला जातो… पाण्यात पडलेली अर्धी फुटलेली काचेची दारूची बाटली तळपाय चिरून जाते. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर येतात… ‘जखम पायाला झाली नाही… माझ्या हृदयाला झाली आहे…’ त्यातून ‘जखम’ ही कथा शब्दरूप घेते. मधुमंगेश यांच्या सर्व कथांमध्ये असे स्वानुभव आहेत. त्यांचे शब्द त्यामुळेच मनाला भिडतात.
त्यांच्या वागण्या- बोलण्यात साधेपणा आहे. त्यांचा जन्म करूळ गावचा म्हणून त्यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे नाव ‘करुळचा मुलगा’ असेच आहे. जीवनातील अनेक दु:खे सहन करून आज मधु मंगेश कोकण मराठी साहित्य परिषदेचा व्याप आपल्या खांद्यावर घेवून अजूनही काम करत आहेत. कवी केशवसुतांचे मालगुंड येथील स्मारकाचे सर्व श्रेय मधु मंगेश यांना जाते. केशवसूत, श्री. ना. पेंडेसे, र. वा. दिघे, दत्तो वामन पोतदार, विंदा करंदिकर, त्र्यं. चि. खानोलकर हे सगळे कोकणी साहित्यिक पण ९१ व्या वर्षीपर्यंत जगलेले आणि लिहित राहिलेले मधुमंगेशच… आणि तेही पोटच्या पोराच्या भयानक मृत्यूचे दु:ख पचवून . कल्पना करू शकतो का आपण….
काय घडले होते माहिती आहे….? त्यांचा मुलगा दादरला राहत होता. मधु मंगेश राहतात अंधेरीला. एका रविवारी दुपारी जेवायला येतो, असा त्याचा फोन आला… जेवणाची तयारी झाली… पाने वाढून ठेवली… ११.३० वाजता दादरहून निघालेला मुलगा १२.३० पर्यंत अंधेरिला येणारच… अंधेरी लोकलनेच निघाला होता…एक वाजला…. दोन वाजले… मुलगा आला नाही… ताटं वाढून ठेवलेली… आणि पोलीस स्टेशनमधून फोन आला… ‘पाय घसरून दोन स्टेशनच्या मध्ये पडलेल्या तरुण मुलाचा मृतदेह मिळाला असून, त्याचे आडनाव कर्णिक आहे… ’
फोनवर हे शब्द ऐकल्यावर ८६ वर्षांच्या मधु मंगेश यांची अवस्था काय झाली असेल… परवाच्या रविवारी मधु मंगेश माझ्या घरी जेवायला आले होते… छान गप्पा रंगल्या.. निघताना माझ्या मुलीला म्हणाले, ‘डॉ. मृदुला, आणि त्यांना एकदम रडू कोसळले…. मुलाची आठवण आली…’ थोड्याच क्षणात आपले दु:ख आवरून त्यांनी स्वत:ला सावरले… सोपी गोष्ट नाही. ९१ व्या वर्षी अशी दु:ख पचवून हा लेखक मराठी साहित्यामध्ये राहिलेल्या ७ वर्षांच्या आयुष्यात ८१ पुस्तकांवरून १०० गाठेल… पुस्तकांचीही आणि त्यांची स्वत:चीही…
फार झपाट्याने लिहणाऱ्या एका लेखकाला आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला… आज अत्रेसाहेब असते तर असंच म्हणाले असते, ‘एवढ्या झपाट्याने लिहिणारा लेखक १० हजार वर्षात झाला नाही…. ’
मधुभाई, तुमचे अभिनंदन… पु. ल. देशपांडे यांना ‘भाई’ म्हणत… त्यांनाही राष्ट्रपतींतर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पु. लं. च्या नंतर अनंत काणेकर, आणि त्यानंतर तुम्ही या पुरस्काराने सन्मानित झालात… पद्मश्री पुरस्कार मोठाच… पण, साहित्य सम्राट आचार्य अत्रे पुरस्कार पद्मश्री पुरस्कारा एवढाच मोठा आहे. १३ ऑगस्टला तुम्हाला त्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.. मनापासून सांगतो… हा तुमचाच नव्हे तर, मराठी साहित्याचा सन्मान आहे. आणि माझ्यासारख्या तुमच्या मित्राला मनापासून वाटते की, आज मी ही सन्मानित झालो आहे.

राज्यपाल रामभाऊ मुख्यमंत्री अखिलेशचे अभिनंदन करतात तेव्हा…

अलिकडे फार मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या नावे पुरस्कार देताना तो कोणाला द्यायचा? हा प्रश्नच पडतो. आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार किंवा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा पुरस्कार… अशा व्यक्तिंच्या नावाचा पुरस्कार देता येईल आणि तो पुरस्कार शोभून दिसेल, अशा व्यक्ती फार थोड्या आहेत. इथून पुढे असे पुरस्कार कोणाला द्यायचे, हा प्रश्नच पडेल… आणि त्याच्या पुढचा प्रश्न… असा पुरस्कार कोणाच्या हस्ते द्यायचा… पुरस्कार देणारी व्यक्ती, त्या पुरस्कार देण्याच्या सन्मानाएवढी मान्यताप्राप्त आणि आदरणीय असायला हवी. सुदैवाने ज्यांना पुरस्कार दिला ते मधु मंगेश कर्णिक अत्रे पुरस्काराचे योग्य मानकरी आहेत. आणि ज्यांच्या हस्ते आपण पुरस्कार देत आहोत, ते रामभाऊ नाईक हे व्यक्तीमत्त्वही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील सन्माननीय व्यक्तीमत्त्व आहे. ते तीनवेळा आमदार होते म्हणून नव्हे… खासदार होते म्हणून नव्हे… रेल्वे राज्यमंत्री, पेट्रोलियम मंत्री आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल ही पदे काही लहान नाहीत… पण, त्या पदांपेक्षाही त्या पदांना मोठे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून रामभाऊ यांच्याकडे पाहिले पाहिजे.
महाराष्ट्र विधानमंडळात १९५७ ते १९७७ पर्यंत रामभाऊ म्हाळगी नंतर रामभाऊ कापसे, १९७८ पासून रामभाऊ नाईक हे पूर्वीचा जनसंघ आणि नंतर भाजपाचे तीन राम… पण ‘राम’ या नावाला या तिघांनीही सार्थ ठरवले, असे हे तीन राम… रामभाऊ चिवट… अभ्यासू… प्रश्नांचा पाठपुरावा करताना त्यांची दमछाक कधी झाली नाही. १९९४ साली कॅन्सरसारख्या असाध्य दुखण्यावर मात करणारा हा ‘राम’ आणि त्या दुखण्याचा बाऊ न करणारा राजकीय नेता.
एक घटना मुद्दाम सांगतो. रामभाऊ नाईक यांना १९९४ साली कॅन्सरचे निदान झाले… उपचार सुरू झाले.. वर्ष-दोन वर्षे गेल्यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी रामभाऊ यांना भेटून चौकशी केली. मोठा धीर दिला. त्यानंतर शरद पवारसाहेबांनी रामभाऊ यांना फोन केला आणि त्यांना म्हणाले की, ‘एका मित्राला कॅन्सर निदान झालेले आहे. तर तुम्ही काय उपचार करता…. वैगेरे माहिती घ्यायला मी तुम्हाला भेटायला येतो…’ रामभाऊ म्हणाले, ‘आपल्यासारख्या मोठ्या नेत्याने माझ्याकडे येण्यापेक्षा मीच आपल्याकडे येतो…’ रामभाऊ दिल्ली येथे शरद पवारसाहेबांच्या घरी गेले… थोडीशी चर्चा झाल्यावर रामभाऊ शरद पवार यांना म्हणाले, ‘तुमच्या ज्या मित्राला कॅन्सर निदान झालेय, तो कुठे आहे…’ पवारसाहेब शांतपणे म्हणाले, ‘तुमच्यासमोर जो बोलत आहे… त्यालाच निदान झाले आहे…’ पुढे रामभाऊंनी त्यांच्या उपचाराचा सगळा तपशील सांगितला. रामभाऊंनी या असाध्य रोगावर मात केली आणि नंतर पवारसाहेबांनीही केली.
विधानसभा सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी ‘राष्ट्रगीत’ गायले जाते आणि अधिवेशन संपताना ‘वंदे मातरम’ म्हटले जाते, त्याचे सगळे श्रेय रामभाऊ नाईक यांचे आहे. या गिताची सुरुवात मुंबई राज्याच्या पहिल्या विधानसभेत म्हणजेच १९३७ साली पुण्यात झाली होती. तेव्हा ‘वंदे मातरम’ म्हटले गेले होते. रामभाऊ यांनी मागचे सगळे संदर्भ काढून प्रस्तावच मांडला आणि त्यावेळच्या सरकारने तो स्वीकारला.. असे हे रामभाऊ… राजकारणात राहून राजकारण अंगाला चिटकवून न घेणारे आणि आपण जे काम करतो, त्याचा लेखा-जोखा… कामाचा अहवाल प्रत्येक वर्षाला सादर करणारे रामभाऊ हे पहिले आमदार…
आणखी एक त्यांचे वैशिष्ट्य मला वाटते, आजच्या राजकारणात विरोधकांना शत्रू किंवा देशद्रोही समजण्यापर्यंत अतिशय हिणकस पद्धतीने भाषा वापरली जाते. मनाचे मोठेपण राजकारणात कुठेच दिसत नाही. या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून २०१४ पर्यंत जे मनस्वी मोकळे वातावरण होते, ते आज राहिलेले नाही. पण रामभाऊ नाईक हा वेगळा माणूस आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना त्या राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे भाजपाच्या विराेधातले…. पंतप्रधान मोदींच्या विरोधातले… पण, अखिलेशच्या वाढदिवसाला रामभाऊ नाईक मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांनी अखिलेश यादव यांचे मनस्वी अभिनंदन केले. ही आजच्या राजकारणात सोपी गोष्ट नाही. आपले राज्यपालपद… त्याचे काय होईल? दिल्लीला काय वाटेल? गृहमंत्र्यांना काय वाटेल? असल्या फालतू काल्पनिक भयाला थारा न देता, रामभाऊंनी जो उमदेपणा दाखवला, या एकाच कसोटीवर रामभाऊ फार मोठ्या मनाचा माणूस आहे, असे मी मानतो. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील… त्यांचे शिक्षण कराडच्या टिळक विद्यालयातील… त्यांच्या संस्कारात या विद्यालयाचा वाटा आहेच. त्यामुळे आचार्य अत्रे पुरस्कार तुमच्या शुभहस्ते कर्णिक यांना द्यायला रामभाऊ, तुम्ही एकदम योग्य आहात… हीच सर्वांची भावना आहे. आपण आमंत्रण स्वीकारलेत… आपल्या सुकन्या आजारी असतानाही आपण सामाजिक जीवनातील कार्यक्रमांचे महत्त्व जाणता… तुमच्या सुकन्येला लवकर आराम पडो, ही प्रार्थना… कर्णिक ९१ वर्षांचे. तुम्ही ८९ वर्षांचे. तुमची आणि मधु मंगेश यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचे भाग्य महाराष्ट्राला मिळो, अशी यानिमित्ताने प्रार्थना. तो समारंभ पहायला मीपण आहेच… आणि तसा समारंभ होईल तेव्हा लेख लिहायला मी आहेच… सध्या एवढेच..

मधुकर भावे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.