मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/11/2025 :
अशांतता किंवा गोंधळ* हा जगात सर्वांच्या डोक्याला त्रास देणारा मुद्दा आहे. सर्वत्र आवाज, कलकलाट. गाड्यांचे आवाज, कर्णकर्कश्य भोंगे, हृदयाची धडधड वाढवणाऱ्या DJ च्या भिंती अन् ढोल-ताशे.
अती ध्वनी प्रदूषणाने डोके जड होते, भणभणते नव्हे फुटते का काय असे वाटते. अक्षरशः कशावर तरी डोके आपटावे इतक्या तीव्र भावना होतात. हे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे, मानसशास्त्रीय निष्कर्ष आहेत.
हे मानवाकडून मानवाला होणारे त्रास कमी व्हावेत म्हणून मानवांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. शांतपणे, सौम्य आवाजात आनंद, सण, उत्सव साजरे होऊ शकत नाहीत का? त्यासाठी फटाक्यांच्याच माळा आणि स्पीकर्सच्या भिंतीच लागतात का?
आजचा संकल्प
आपण प्रत्येकाने सामाजिक शांतता राखण्याच्या मानसिकतेतून वैयक्तिक पातळीवर काही बंधने पाळली पाहिजेत. स्वतःच्या बुद्धीचा वापर करून योग्य-अयोग्य काय ते ठरवू व शांतता टिकवण्याचा प्रयत्न करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

