माझी गोधडी झाली जुनी | तिला धुवूनी आणा कोणी ||

माझी गोधडी झाली जुनी |
तिला धुवूनी आणा कोणी ||
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 19/12/2025 :
ईश्वराने दिलेला हा देह म्हणजे एक अनमोल साधन आहे. ज्याचा उपयोग आत्मिक उन्नती, परमार्थ साधना आणि जीवन यशस्वी करण्यासाठी होतो. हा देह पंचतत्वापासून बनलेला असून याच्या मदतीनेच आपण ईश्वर प्राप्तीचा मार्ग शोधू शकतो. म्हणून या शरीराला केवळ हाड-मांस न मानता एक पवित्र मंदिर मानून त्याची काळजी घेणे आणि त्याचा सदुपयोग करणे हेच या देहाचे खरे महत्व आहे. जेणेकरून चौऱ्यांशी लक्ष योनीनंतर मिळालेल्या ह्या मानवी जीवनाचा उद्धार करून घ्यावा. मनुष्य देहाचे महत्व सर्वच संतांनी वर्णन केले. मानवाला जन्म देऊन त्याला आध्यात्मिक प्रगतीची एक संधी उपलब्ध करून दिली जाते. जर मानवाने या देहाचा दुरुपयोग केला तर त्यांना हजारो वर्षे हा मनुष्य मिळणे शक्य नाही.
माझी गोधडी झाली जुनी |
तिला धुवूनी आणा कोणी ||धृ||
वरील भजन कोणत्या कविने लिहिले ते माहित नाही पण या भजनाचा अर्थ ओतप्रत भरलेला आहे. हा गोधडी रुपी देह आपल्याला कर्म करण्याची संधी देतो. आपण शरीररुपी गोधडी मार्फत चांगले कर्म करून आपल्या नशिबाला आकार देऊ शकतो आणि या जन्मात पुण्य मिळवू शकतो. देहरुपी गोधडी म्हणजे आपले शरीर हेच गोधडी सारखे आहे. ज्यात जीवनातील विविध अनुभवाचे रंगीबेरंगी कापड शिवले जाते. तसेच आपल्या आयुष्यातील चढ-उतार आणि आठवणी शरीरामध्ये साठलेल्या असतात, जे आपल्याला उब आणि अनुभव देतात म्हणजेच शरीर हेच अनुभवाचे आणि आठवणीचे एक सुंदर, शिवलेले वस्त्र आहे. जशी गोधडी थंडीत उब देते तसेच शरीर आपल्याला आधार देते. ही शरीररुपी गोधडी जीर्ण झाली तरी हरीच्या नामस्मरणाने पवित्र होते. “हरीच्या नामस्मरणाने, हरीचे तेज ये अंगी | मनाची दुष्टता नासे, रमे मन ही हरी रंगी ||” मनाची दुष्टता नाहिशी होऊन शरीरात हरीचे तेज निर्माण होते. निःस्वार्थ भावनेने नामस्मरण केले तर हरीच्या रंगात रंगून जाते. संत एकनाथ महाराज म्हणतात, “जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेचि झाले अंगे हरि रुप |” वासना हरिरुप झाल्यास मोक्ष मिळतो. मुखात हरीचे नाम असल्यास सर्व चिंता हरपतात. आणि पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. माणसाला वासनेमुळेच पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. सतत हरीचे ध्यान आणि स्मरण केल्याने माणूस हरीरुप होतो. त्या गोधडीला वासनांनी, व्यसनांनी दुषित करु नका, अपवित्र करु नका, तिला मळवू नका. तिला स्वच्छ करा.
ती धुतली हरिचंद्र राजांनी |
तारामती, रोहिदासांनी |
तिला मळवू नका कोणी ||1||
या गोधडीचा वापर हरिचंद्र राजा, तारामती तसेच रोहिदासांनी केला. सत्यनिष्ठ राजा हरिचंद्र आणि राणी तारामती यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही सत्य आणि धर्म सोडला नाही. हरिचंद्राची पत्नी तारामती सत्यनिष्ठा आणि त्यागाच्या कसोटीच्या काळात त्या़च्या सोबत खंबीरपणे उभी होती. महर्षी विश्वमित्रांनी हरिचंद्राची सत्य निष्ठा पाहण्यासाठी कठोर परिक्षा घेतली. त्यांनी हरिचंद्राला राज्य सोडून जाण्यास भाग पाडले. सर्व संपत्ती दान करण्यास लावले आणि त्यांना स्मशानात चांडाळाच्या हाताखाली काम करण्यास लावले. हरिचंद्राला स्मशानातूनही कर वसूल करावा लागला. त्यांचा पुत्र रोहिताश्व सर्पदंशामुळे मरण पावला, तेव्हा तारामतीने मृत मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी हरिचंद्राकडे कर मागितला. हरिचंद्राने न डगमगता कर भरला. या कठोर परिक्षेत यशस्वी झाले. त्यांना त्यांचे राज्य परत मिळाले. अशाप्रकारे हरिचंद्र – तारामतीने आपली शरीररुपी गोधडी प्रेम, त्याग, कर्तव्य, सत्याचे पालन करून स्वच्छ केली. आपण सुद्धा योग्य न्यायाने वागावे आणि तिला कोणीही मळवू देऊ नका.
संत रोहिदास एक महान संत होते. जे चर्मकार असूनही भक्ती, समानता आणि ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा उपदेश देत असत. त्यांनी कर्म आणि भक्तीला जोडले. समाजातील जातीभेद दूर केला. त्यांच्या रचना गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. ज्यामुळे संत रोहिदास शीख आणि हिंदू दोन्ही धर्मामध्ये पूजनीय आहेत. त्यांनी आपली शरीररुपी गोधडी आपल्या व्यवसाया सोबतच विष्णू भजन करून कर्म हीच ईश्वर सेवा मानून स्वच्छ केली. आपण सुद्धा त्या शरीररुपी गोधडीला मळवू देऊ नका.
ती धुतली श्रीपाळ राजानी |
चांगुणेने, चिलया बाळानी |
तिला मळवू नका कोणी ||2||
श्रीपाळ राजा आणि चांगुणा देखील भक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहेत. चिलया बाळ हे लहान वयातच भक्ती आणि आत्मिक शुद्धतेचे उदाहरण आहे. राजाकडे येणारा कोणताही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे. चांगुणा आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत असे. श्रीपाळ राजा भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता. शंकराने दानशूर, श्रद्धाळू भक्त श्रीपाळ राजाची सत्व परिक्षा घेतली. शंकराने घेतलेल्या परिक्षेत दोघेही खरे उतरले. त्यांची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले. श्रीपाळ राजाला औट घटकेचा राजा म्हणतात. त्याने साडेतीन घटकेत राज्याचे पूर्ण भंडार दानधर्म करून टाकले होते. राजाने भक्ती, त्याग, श्रद्धेने शरीर रुपी गोधडी (देह) पवित्र केला. आपणही शरीररुपी गोधडी अपवित्र करु नका. तिचे पावित्र्य जपा, वाईट कामासाठी वापरु नका. म्हणजेच देहाचा सदुपयोग करा. तिला मळवू देऊ नका.
ती धुतली तुकड्या दासानी |
संत सज्जन चरण दलानी |
तिला मळवू नका कोणी ||3||
तुकड्यादास म्हणजेच तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे महान संत आणि समाज सुधारक होते. त्यांचे ग्रामगीता हे ग्रामविकासाचे तत्वज्ञान सांगणारे प्रसिद्ध काव्य आहे. ज्यात त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीयतेचा त्याग आणि आत्म संयमन यासारख्या मूल्यांचा प्रचार केला. त्यांचे भजने आजही लोकप्रिय आहेत. सामाजिक सुधारणा, अध्यात्म, राष्ट्रसेवेसाठी त्यांचे जीवन समर्पित होते. माणसाला माणूस बनविण्यासाठी त्यांनी मानवतेची शिकवण दिली. सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. राष्ट्रसंतानी संताच्या चरण धुळीने आपली शरीररुपी गोधडी पवित्र केली. राष्ट्रसंतानी एवढे ज्ञान भरभरून दिले. त्यांच्या ज्ञानमय विचार अंगिकारा आणि आपली शरीररुपी गोधडी स्वच्छ करा. तिला मळवू देऊ नका.
हे भजन म्हणजे मानवी शरीराच्या पावित्रवर आणि त्याचा योग्य वापर करण्याच्या गरजेवर भर देते. शरीर हे देवाची देणगी आहे आणि हे अनेक संताच्या आणि थोर व्यक्तीच्या पवित्रतेने पावन झाले आहे. म्हणून त्याला वाईट विचारांनी किंवा कृतींनी भ्रष्ट करु नये. तर ते सदैव शुद्ध आणि पवित्र ठेवावे, हाच या भजनाचा गाभा आहे.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9970404180

