
इ. स. 1957 पर्यंत खान्देश
महाराष्ट्राच्या नेतृत्व स्थानी होता!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
(मध्यार्ध)
अकलूज दिनांक 7/8/2023 :
इ. स. 1936 ला फैजपूर येथे 27, 28, 29 डिसेंबर ला जे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन झाले ते खांदेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते तसेच देशाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनेही महत्वाचे होते.
त्या काळात भारत अखंड होता म्हणजे आताचा भारत, पाकिस्तान, भुतान आणि बांगला देश हे एकत्र होते. त्याला ब्रिटिश इंडिया म्हणत. या ब्रिटिश इंडियात त्या काळात सुमारे 7 लाख खेडी होती. या सात लाख खेड्यातून फैजपूरची निवड होणं हे खान्देशच्या दृष्टीने अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे. या अधिवेशनाने खान्देशला पहिल्या फळीतील राजकारणी दिले. त्यात भाऊसाहेब हिरे, श्रीपाद अमृत डांगे, जीं डी माळी बापू, दादासाहेब राऊळ, मधुकरराव चौधरी, डॉ उत्तमरावं पाटील, लिलाताई पाटील, शिवाजीरावदादा पाटील, व्यंकटरावं धोबी, डीगंबर पांडु माळी, सोनुसिंग धनसिंग पाटील, नवल पाटील, चुडामन आनंदा पाटील, विष्णुभाऊ पाटील अशी स्वातंत्र्य सैनिकांची आणि राजकारण्यांची पलटण दिली.
पहिल्या भागात मी म्हटले होते कीं, स्वातंत्र्य पुर्व काळातील काँग्रेस वेगळी आणि आताचा काँग्रेस पक्ष वेगळा. त्या काँग्रेसमध्ये, काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, भाजप(जनसंघ) या सर्वच विचाराचे लोक सामील होते. गाडगेबाबा विनोबा भावे सारखे संत त्यात होते.
फैजपूर येथे झालेले काँग्रेस अधिवेशन हे खेड्यातील पहिले अधिवेशन होते. तसेच हे 50 वे म्हणजे सुवर्ण मोहत्सवी अधिवेशन होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष पं जवाहरलाल नेहरू निवडले गेले ते पहिले पंतप्रधान झाले. 49 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद होते ते पहिले राष्ट्रपती झाले. 51 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष नेताजी सुभाष चंद्रबोस होते. 49 आणि 51 व्या अधिवेशनाच्यामध्ये हे 50 वे महत्वाचे अधिवेशन होते. यात सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस आचार्य कृपलानी, संत गाडगे बाबा, संत विनोबा भावे, साने गुरुजी, असे दिग्ज सहभागी होते. संपूर्ण भारतातून लाखभर तरी लोक आले असतील.
अधिवेशनासाठी शेतकऱ्यांनी आपली शेतं रिकामी करून दिली. ती सर्वं श्रमदानाने समतल केली. त्या स्थळाला टिळकनगर नावं दिले. प्रवेश द्वाराला छ शिवाजी महाराज महाद्वार नावं दिलं. खर्चाचा खूप मोठा विषय होता. ती जबाबदारी जळगावाचे मोठे व्यापारी राजमलं लखीचंद शेठ यांनी घेतली. तेच या अधिवेशनाचे खजिनादार होते.
आजूबाजूच्या सर्वं खेड्यातील महिला आपापल्या गावात स्वयंपाक करत असत आणि ते अन्न बैलगाड्या भरून अधिवेशन स्थळी पोहचविले जातं असे. त्याची संपूर्ण देखरेख स्वतः कस्तुरबा आणि जानकीदेवी बजाज या जातीने करत होत्या.
अधिवेशनाचे अध्यक्ष पं जवाहरलाल नेहरू रेल्वेने सावदा स्टेशन वर उतरले. तिथे त्यांची 50 बैलगाड्यातून फैजपूर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
गोकुळदास संस्कृत पाठ शाळेतून ध्वज ज्योत काढण्यात आली होती. ती घेऊन काही तरुण मुंबई वरुन चालत आले होते. त्यांचं स्वागत जळगावात साने गुरुजी यांनी केले. नंतर ती ध्वज ज्योत साने गुरुजी यांच्या नेतृत्वात फैजपूर येथे नेण्यात आली. तिथे नेहरुनी तीच स्वागत केले. ही ध्वज ज्योत संपूर्ण अधिवेशन काळात तेवत ठेवली होती. या ठिकाणी 127 फूट उंच ध्वज उभारण्यात आला होता. त्यावर नेहरू ध्वज फडकवायला गेले तर तो मधेच अडकला. तिथे rss चा किसन राजपूत हां तरुण होता. किसन राजपूत शिरपूरचे. त्यांना लोक बंदा पाटील या नावाने ओळखत असत. हां 15/16 वर्षाचा तरुण मुलगा, खारी सारखा सर सर ध्वज दंडा वर चढला आणि त्यांनी तो अडकलेला झेंडा काढला. टाळ्यांचा कडकडाट झाला. पं नेहरुनी त्यांच्या शेरवानी वरील गुलाबाच फुल काढून बंदा पाटील यांच्या सदऱ्यावर लावले. असा खान्देश आपल्या विविध गुणांनी अधिवेशनात शोभा आणत होता.
अधिवेशन अत्यंत उत्तम झाले. या अधिवेशनात. भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा ठरावं पहिल्यांदाच मांडण्यात आला आणि तो सर्वं संमत झाला.
या अधिवेशनातून महाराष्ट्र आणि एकूणच मराठी मुलखासाठी एका हुशार, कार्यक्षम आणि समर्थ नेतृत्व मिळालं. ते म्हणजे भाऊसाहेब हिरे. भाऊसाहेब आणि त्यांना कायम स्वरूपी साथ देणारे दोन विश्वासू साथीदार. ग द माळी बापू आणि ज दौ राऊळ दादासाहेब! बघू या तिघांची घट्ट राजकीय मैत्री पुढच्या भागात!
बापू हटकर.