‼️ आर.सी.सी.बी. ‼️

‼️ आर.सी.सी.बी. ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14/09/2025 :
विजेची गळती होत असल्यास वीजपुरवठा खंडित करून शॉक बसलेल्यास वाचविण्यासाठी “अवशिष्ट करंट सर्किट ब्रेकर” (Residual Current Circuit Breaker : आरसीसीबी) हे विद्युत सुरक्षा उपकरण आहे. मात्र, अनेकांना दुर्घटना होई पर्यंत त्याचे महत्त्व समजत नाही.
आरसीसीबी हे असे उपकरण आहे, जे विद्युत शॉक आणि विद्युतप्रवाहामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत करते. हे उपकरण सर्किट मधील गळतीचा प्रवाह शोधून काढते आणि जर हा प्रवाह निर्धारित मर्यादे पेक्षा जास्त झाला असेल, तर ते सर्किट मधील वीजपुरवठा त्वरित खंडित करते. ज्यामुळे जीवितहानी किंवा उपकरणांचे नुकसान होत नाही. हे उपकरण विद्युत शॉक लागण्यापासून संरक्षण करते.
सामान्य ऑपरेटिंग परिस्थितीत आरसीसीबी हे सर्किट मधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचे निरीक्षण करते. येणारा विद्युत प्रवाह (लाइव्ह वायर) परत येणाऱ्या प्रवाहाशी (न्यूट्रल वायर) जुळतो का ते तपासते. तरीपण, चुकून जिवंत वायरला किंवा खराब झालेल्या वायरला स्पर्श केला, तर काही विद्युतप्रवाह तटस्थ वायर मधून परत येण्या ऐवजी जमिनीवर गळू शकतो. यामुळे विद्युतप्रवाह असंतुलित होतो. पण, जेव्हा आरसीसीबी ला विद्युत प्रवाह असंतुलितपणा जाणवतो, तेव्हा ते आपोआप सर्किटची वीज बंद करते. ही क्रिया एका सेकंदाच्या काही अंशात घडते. प्रवाह खंडित झाल्याने विजेचा धक्का रोखला जातो. त्यामुळे ते उपकरण जिवंत वस्तूला स्पर्श केल्यावर होणाऱ्या विजेच्या झटक्या पासून बचाव करते, ज्यामुळे दुखापत किंवा धोका कमी होतो.
जेव्हा एखादी व्यक्ती किंवा प्राणी विद्युतवाहक तारेला चुकून स्पर्श करते, तेव्हा सर्किट मध्ये अधिक गळतीचा प्रवाह तयार होतो. अशा वेळी आरसीसीबी त्वरित वीज प्रवाह खंडित करून दुर्घटना टाळतो. तेव्हा सर्वांनी शॉक लागून मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी, आरसीसीबी उपकरण बसवून घ्यावे.
सुनील माने
अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर