⭕ जरांगे फॅक्टर मुळापासून समजुन घ्या! 🟪(भाग-3) ओबीसीनामा-46 🅾️ आंदोलन प्रतिगामी की पुरोगामी?
⭕ जरांगे फॅक्टर मुळापासून समजुन घ्या! 🟪(भाग-3)
ओबीसीनामा-46
🅾️ आंदोलन प्रतिगामी की पुरोगामी?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 19/09/2025 :
ओबीसी विरूद्ध मराठा संघर्षात जे अनेक मुद्द मांडले जातात व त्या मुद्द्यांवर होणारी भांडणे ज्या पद्धतीने लढली वा लढवली जातात हे सर्व मुळ विषयाला भरकटवणारे असतात. काही काही वेळा दोन्ही डगरीवर हात ठेवणारे लोक इतका संभ्रम निर्माण करतात की, काय खरे आणी काय खोटे हे सर्वसामान्य माणसाला कधीच कळत नाही. जाणीवपूर्वक भरकटवणारी माणसे दोन्ही बाजूला अशा पद्धतीने पेरली जातात की त्यांच्या भांडणात मूळ मुद्दा कुठल्याकुठे हरवून जातो. अलिकडे घडलेली उदाहरणे सांगीतली पाहिजेत कारण उदाहरणे दिली तरी जे समजायला महिने लागतात, उदाहरण दिलेच नाही तर अनेक वर्षातही सुतराम काही समजेल असे वाटत नाही. ‘त’ म्हणता तपेले’ हे फक्त ब्राह्मणांनाच समजते. परंतू बहुजन समाजाच्या डोक्यात आख्खं तपेले हाणून मारले तरी त्यांना ना ‘त’ समजतो ना ‘तपेले’! म्हणून नाईलाजास्तव प्रत्येक मुद्दा उदाहरणे देऊन समजून सांगावा लागतो.
पेशवा फडणवीसांचं सरकार आल्यानंतर म्हणजे 2015 नंतर सरकारच्या छत्रछायेखाली मराठ्यांचे लाखांचे मोर्चे निघायला लागलेत. या मोर्च्यावर केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात व तुरळक प्रमाणात देशाबाहेरही क्रिया-प्रतिक्रिया उमटल्या! काय होत्या या प्रतिक्रिया? गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी, फुले-आंबेडकरवादी, पुरोगामी वगैरे म्हणविणारे मोठ-मोठे विद्वान यावर प्रतिक्रिया देऊ लागलेत. कोणी या मोर्च्याच्या मूकपणावर भाळलेत, कोणी शिस्तबद्धपणावर भाळलेत, कोणी मुसलमानांच्या मदतीमुळे प्रेमात पडलेत, कोणी लाखांच्या संख्येवर फिदा झालेत तर कोणी मोठ-मोठ्या राजकीय-सामाजिक नेत्यांच्या मोर्च्याच्या पाठीमागे चालण्यावर संमोहित झालेत, तर काही विद्वानांची मती मोर्च्यासमोर पांच वर्षाच्या मुलीने दिलेल्या विद्वत्तापूर्ण भाषणात गुंग झाली. भाळणारे, मती गुंग होणारे व संमोहित होणारे हे विद्वान समाजासाठी किती घातक असतात, याची अनेक उदाहरणे तुम्हाला इतिहासातही दिसतील.
एरवी कोणत्याही छोट्या-मोठ्या मुद्द्यावर चर्चा करतांना हे विद्वान तुम्हाला अमेरिका, चीन जपान देशातून फिरवून आणतात, बिल क्लिंटन पासून पूतिनपर्यंतच्या व मार्क्स पासून माओ पर्यंतच्या महान लोकांच्या भेटी घडवून आणतात. परंतु मराठ्यांच्या लाखांच्या मोर्च्यावर किंवा जरांगे फॅक्टरवर चर्चा करतांना यांची भली मोठी विद्वत्ता कोणत्या छटाकभर लोकांना खांद्यावर घेऊन कोणत्या गल्ली-बोळात फिरत असते हे त्यांनाही कळत नाही. मराठ्यांच्या लाखांच्या मोर्च्यावर चर्चा करतांना कोणत्या वैचारिक व तात्त्विक मुद्द्यांवर भर दिला पाहिजे हे पहिल्यांदा मी महाराष्ट्राला समजावून सांगीतले. महाराष्ट्रातील वैचारिक-तात्विक त्रैमासिक ‘‘परिवर्तनाचा वाटसरू’’ चा 16 ते 30 नोव्हेंबर 2016 चा अंक मराठा मोर्चा विशेषांक होता. या अंकात माझा लेख (पान नंबर 50 ते 60) प्रकाशित झाल्यावर भल्या-भल्यांची भंबेरी उडाली. माझ्या लेखानंतर महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांनी व विद्वानांनी माझ्याकडे प्रतिक्रिया व लेख पाठविले. या लेखांचे संकलन करून मी ‘‘ओबीसी मराठा बहुजन मोर्चे-प्रतिमोर्चे व पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक फरफट’’ या नावाचा महाग्रंथ संपादित केला.
जरांगेच्या अनेक उपोषणांवर व आंदोलनांवर मी त्या त्या काळात भरपूर लिहिले आहे. लाखांच्या मोर्च्याप्रमाणेच जरांगेच्या आंदोलनात भले-भले पुरोगामी व आंबेडकरवादी यांनी जरांगेची भलावण केली. काही भाडोत्री (Paid) समाजवादी पत्रकारांनी जरांगेंवर लेख लिहिलेत व मुलाखती वगैरे घेउन छटाकभर जरांगेला मणभर मोठा करण्याचा प्रयत्न केला. काही आंबेडकर आडनाव असलेले महापुरूष जरांगेच्या उपोषण मंडपात जाऊन त्याच्या पायाशी बसलेत. त्यातील काहींनी जरांगेला ‘‘मराठ्यांचा बाबासाहेब’’ म्हणून गौरविले. महाराष्ट्रातील जाणता राजा जरांगेच्या पायाजवळ जाउन बसला. बडे-बडे अधिकारी, न्यायाधिश जरांगेच्या मंडपात जाउन त्याला हात जोडीत होते. कट्टर ब्राह्मणवादी संभाजी भीडेपासून कांशीरामशिष्य जानकरांपर्यंत व समाजवाद्यांपासून मार्क्सवाद्यांपर्यंत सगळ्यांची अक्षरशः रीघ लागलेली होती. कोणतीही सार्वजनिक कृती अथवा आंदोलन एक तर प्रतिगामी असेल किंवा पुरोगामी! एखादे सामाजिक-राजकीय आंदोलन सर्व पुरोगामी-प्रतिगामी विचारसरण्यांना कसे गुंडाळून घेऊ शकते? आणी एकाच गाठोड्यात गुंडाळल्या जाणार्या विचारसरण्या कोणत्या लायकीच्या असतील? असा साधा प्रश्न एकाही पुरोगाम्याला पडू नये?
मराठ्यांच्या लाखांच्या मोर्च्यात बुद्ध, मार्क्स व फुलेआंबेडकरी क्रांती पाहणारे आमचे एक मित्र सत्यशोधक कम्युनिस्ट होते. आज काहींना जरांगेमध्ये ब्राह्मणशाही विरोधात लढणारे फुले शाहू आंबेडकर दिसतात व गुलामगिरी विरुद्ध लढणारे क्रांतिकारक ‘स्पार्टाकस’ सुद्धा दिसतात. महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणीचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी (IPS) आहेत. माननीय सुरेश खोपडे त्यांचे नांव! एक मराठा विषय जर सोडला तर ते दुसर्या कोणत्याही विषयावर लिहीतांना पुरोगामीच नव्हे तर क्रांतिकारी वाटतात. परंतू सुरेश खोपडे यांना जरांगेमध्ये कोणत्या एंगलने फुलेशाहू आंबेडकर व स्पार्टाकस दिसतात, याचे स्पष्टीकरण देतांना ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये स्पार्टाकसवरील सिनेमाचे उदाहरण देऊन लिहीतात- ‘‘मानव इतिहासातील नोंद झालेले गुलामांचे पहिले बंड असावे. जरांगे पाटील यांचे हे आरक्षणाच्या निमित्ताने इथल्या ब्राह्मणशाही विरोधी आंदोलन पाहून त्या सिनेमाची आठवण झाली.’’ (सुरेश खोपडे, फेसबुक, 2 सप्टेंबर 2025) या फेसबुक पोस्टवर कॉमेंट बॉक्समध्ये मी त्यांच्या समोर काही मुद्दे ठेवले तर त्यांनी ही चर्चा भलतीकडेच भरकटवत नेली.
कोणतेही आंदोलन वा सार्वजनिक कृती पुरोगामी वा क्रांतिकारक आहे की प्रतिगामी वा प्रतिक्रांतिकारक आहे हे ठरविण्यासाठी दोन किंवा तीन कसोट्या पुरेशा असतात. पहिली व प्राथमिक कसोटी ही असते की या आंदोलाच्या वा सभेच्या स्टेजवर कोणत्या महापुरूषांचे फोटो आहेत? जर स्टेजवर फुले आंबेडकरांचे फोटो असतील तर प्राथमिक दृष्ट्या ही सभा वा आंदोलन पुरोगामी वा फुलेआंबेडकरवादी समतावादी जनतेची आहे, असे समजायला जागा आहे. एखाद्या सभेच्या स्टेजवर गोलवळकर-हेडगेवार किंवा अटल बिहारी वाजपेयी वगैरेंचा फोटो दिसला तर समजायचे की हा कार्यक्रम मनुवादी ब्राह्मणवाद्यांचा आहे. स्टेजवर जर मार्क्सचा फोटो वा मार्क्सवादी पक्ष-संघटनांचा बॅनर असेल तर समजायाचे कि हा कार्यक्रम वर्गव्यवस्था विरोधी, भाडवलशाहीविरोधी समतावादी क्रांतिकारी जनतेचा आहे. त्यानंतर त्या सभेत वा आंदोलनात कोण प्रमुख नेते आहेत? त्या सभेचं किंवा आंदोलनाचं नेतृत्व जर आदिवासी, दलित, ओबीसी, कामगार, शेतकरी कॅटेगिरीतील व्यक्ती करत असतील तर ती सभा वा आंदोलन संविधानाने मान्य केलेल्या शोषित-पिडित जनतेच्या हिताची आहे व पुरोगामी आहे, असे मानता येईल. तिसरी महत्वपूर्ण कसोटी ही आहे की या सभेत वा आंदोलनात संविधानमान्य पुढारलेल्या वर्ग वा जाती म्हणजे प्रस्थापित शासक-शोषकांच्या विरोधात विचार मांडले जात असतील, शोषित-पिडितांच्या हिताच्या घोषणा दिल्या जात असतील व तसे ठराव किंवा निर्णय मंजूर करवून घेतले जात असतील तर निश्चिपणे ती सभा वा आंदोलन पुरोगामी वा क्रांतिकारक म्हटले पाहिजे. सर्वात निर्णायक कसोटी आहे ती ही कि, त्या सभेला आलेली जनता किंवा गोळा करून आणलेली जनता ही संविधान मान्य शोषित कॅटेगिरितील आहे की नाही, म्हणजे तशी शोषित-शासित ओळख (Identity) घेऊनच आलेली आहे कि नाही? जर मोर्च्याचे नावच जर ‘‘मराठा मोर्चा’’ असेल तर स्वाभाविकपणे त्या मोर्च्याला आलेले सर्व लोक केवळ ‘मराठा’ म्हणून आलेले आहेत. पाठींबा म्हणून आलेले इतर लोक हे अपवादात्मक असतात. मराठा ही जात संविधानमान्य पुढारलेल्या जातीच्या कॅटेगिरीत येते. त्याचप्रमाणे मोर्च्याचे नाव दलित मोर्चा, आदिवासी मोर्चा, ओबीसी मोर्चा, कामगार मोर्चा, शेतकरी मोर्चा यांची उदाहरणे देता येतील. या कॅटेगिरीतील मोर्च्यांना त्या त्या कॅटेगिरीचीच जनता मोठ्या संख्येने येईल. पाठींबा देणार्यांची कॅटेगिरी वेगळी असू शकते, पण ती अपवादात्मक असते. कामगारांच्या मोर्च्याला एखाद-दुसरा भांडवलदार पुरोगामी म्हणून येउ शकतो पण तो अपवाद म्हणूनच येत असतो. तसे नसते तर त्या पुरोगामी भांडवलदाराने कामगारांच्या हितासाठी भांडवलदारांचाच मोर्चा काढला असता. पण ते कधीच शक्य नाही, हेही तेव्हढेच खरे आहे.
या कसोट्या मराठ्यांच्या लाखांच्या मोर्च्याला व जरांगेच्या आंदोलनाला लावल्या तर काय सिद्ध होते, हे आपण लेखाच्या चौथ्या भागात पाहू या
तो पर्यंत जयजोती, जयभीम, सत्य कि जय हो!
प्रा. श्रावण देवरे,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्क नंबर- 81 77 86 12 56 किंवा 75 88 07 2832
##################