ताज्या घडामोडी

रानभाजी – भुईआवळा

रानभाजी – भुईआवळा

शास्त्रीय नाव : Phyllanthus amarus
कुळ : Euphorbiaceae

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क

संग्राहक : प्रवीण सरवदे /आकाश भा.नायकुडे

दिनांक 19ऑगस्ट 2024 :
भुईआवळा ही वनस्पती मोठ्या प्रमाणात औषधे बनविण्यासाठी वापरली जाते. ‘फायलॅन्थस ऍमरस’ या नावाने वनस्पति विश्‍वात आणि ‘भुई आम्लकी’ या नावाने वैद्यक शास्त्रात या वनस्पतीस ओळखले जाते. भुईआवळा, भुईआमला, जंगली आवळा या प्रचलित नावांनी या वनस्पतीस ओळखले जाते. आवळा वनस्पतींच्या ‘इफोर बीएशी’ या कुळातील ही वनस्पती आहे. भूईआवळाच्या पानांची आणि फांद्यांची भाजी करतात. या भाजीचा खोड फांद्या गोलाकार असतात. ही भाजी आयुर्वेदिक असते. लघवी कमी होणे मुतखडा जंतुसंसर्ग या प्रकारच्या आजारांवर भुईआवळी च्या भाजीचा चांगला गुण येतो. भारता मध्ये समुद्र सपाटी पासून ७०० मीटर पर्यंत ही वनस्पती आढळते. पावसाळ्यात उगवून येते आणि त्या नंतर दोन-तीन महिन्यांत फुला फळांवर ही वनस्पती येते. महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, ओरिसा आणि बंगाल इ. ठिकाणी ही वनस्पती आढळून येते. भुई आवळीचे औषध मूत्रल आहे, तसेच जिवाणू व बुरशी जन्य रोगां मध्येही उपयुक्त ठरले आहे. चित्रका हरितकी, मधूया सत्यादी तेल, पिपल्लादी घृत, च्यवनप्राश इ. आयुर्वेदिक औषधां मध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. निसर्गतः अनेक प्रकार च्या म्हणजे आम्ल, अल्कली धर्मीय जमिनी मध्ये ही वनस्पती आढळून येते. बऱ्याचदा शेतांमध्ये तण म्हणून ही वनस्पती आढळून येते. खडकाळ, मुरमाड माळरानातही ही वनस्पती सापडते. पाणथळ, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीतही ही वनस्पती आढळते. कमी पाण्याची ठिकाणे व कमीत कमी तापमान असणारी ठिकाणे या वनस्पतीस मानवत नाहीत.
भुई आवळ्या बियां पासून लागवड केली जाते. एक हेक्‍टर साठी एक किलो बियाणे लागते. लागवडीसाठी जमीन आडवी-उभी नांगरून, त्यात शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत टाकून तयार करून घ्यावी. सरी-वरंबे अथवा गादी वाफे करून दोन झाडांत 15 सेंमी अंतर ठेवून लागवड करावी. मे महिन्यात पेरणी केल्यास उगवण क्षमता चांगली मिळते. रोपे करूनही लागवड होते, परंतु ते परवडत नसल्याने बियाणे मातीत फेकून मिसळावे. उगवून आलेल्या झाडांमध्ये तण राहणार नाही याची दक्षता घ्यावी, सेंद्रिय खते देऊनच उत्पादन घ्यावे. बऱ्याचदा पावसाळ्यातच लागवड होत असल्याने पाण्याची गरज भासत नाही. पाणी शेतात भरलेले असले तरी ही वनस्पती तग धरते. या वनस्पतीची पावसाळ्या नंतरच काढणी करावी. पावसाळ्यात काढणी केल्यास बुरशी जन्य रोगामुळे औषधी गुणधर्म नष्ट होण्याची शक्‍यता असते. परिपक्व झाडे पाना मागील फळां मध्ये बियाणे तयार झाले की काढणी योग्य आहे असे समजावे. उपटताना मुळांमध्ये माती राहणार नाही याची काळजी घ्यावी. सावलीत वाळवून पंचांगाचा रंग हिरवाच राहील असे पाहावे. सप्टेंबर महिना काढणी साठी चांगला समजला जातो. पंचांगा मध्ये फाय लॅन्थीन, हायफो फाय लॅन्थीन, सिक्‍युरीन, निरू साईड इ. रसायने आढळतात. लागवडी वेळी फायलॅथस निरूरी अथवा फाय लॅथस ऍमरस या प्रजातीचेच बियाणे वापरावे. बऱ्याच दा फ्रॅटर्नस, युरीनारीया, सिप्लेक्‍स, मदरा पॅटेनॅन सीस इ. प्रजातींचे मिश्रित बियाणे मिळते. लागवडी नंतर चार महिन्यांनी उत्पादन मिळते. वाळलेल्या पंचांगांस चांगला दर मिळतो. एक हेक्‍टर मधून दोन ते तीन टन वाळलेले पंचांग मिळते.
उपयोग
१) कविळी मध्ये या ही वनस्पती स्वच्छ धुवून रस काढला जातो आणि ताका सोबत दिला जातो. २) मुका मार लागल्यास सुजेवर याचा पाला काळे मीठ सोबत कुटून लावला जातो. ३) पाळीच्या त्रासात अंगावरून जास्त जात असेल तर या झाडाचा पाला आणि अडुळसाची पाने याचा काढा करून उपाशी पोटी घेता येतो. ४)खोकला तसेच अस्थमाच्या त्रासात याचा ताजा रस खडी साखरे सह घेतल्यास आराम मिळतो. ५) च्यवनप्राश मध्ये टाकल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती पैकी ही एक अतिमहत्वाची वनस्पती आहे. यामुळे कमी साखरेत तयार केल्या जाणाऱ्या च्यवनप्राशला गोड-तुरट चव व रुची येण्यास मदत होते. ६)सतत तहान लागणे, घशात जळजळणे, डोळ्यात जळजळ, थुंकीतून रक्त पडणे यात याचा काढा कामदुधा या गोळी सोबत घेल्यास आराम मिळतो. ७)त्वचाविकारांवर सुद्धा ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button